पुणे :-सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ राज्यातील नामांकित विद्यापीठ आहे. विद्यापीठाला उज्वल परंपरा लाभली आहे. शैक्षणिक गुणवत्तेच्या बाबतीत विद्यापीठ जागतिक क्रमवारीत सुद्धा आहे, याचा संपूर्ण महाराष्ट्राला अभिमान आहे. परंतु, याच विद्यापीठात कुलगुरू आणि प्र-कुलगुरू यांच्या आशीर्वादाने तब्बल ३०० कोटींची रूपयांची अनियमितता झाली असून तशी कागदपत्रे आपल्याकडे उपलब्ध आहेत, असा गंभीर आरोप ॲड.कौस्तुभ पाटील यांनी पत्र परिषदेद्वारे विद्यापीठ प्रशासनावर केला आहे.
सावित्रीबाई फुले यांच्या नावाने असलेल्या या विद्यापीठात असा प्रकार घडणे, हे अत्यंत दुर्दैवी आहे. त्यामुळे या प्रकरणाच्या मुळाशी जाण्यासाठी आम्ही वेळोवेळी माहितीच्या अधिकाराद्वारे पाठपुरावा केला आणि संबंधित अनियमिततेची कागदपत्रे मिळवली आहेत. त्यानुसार विजय ढवळे हे तृतीय श्रेणी सिविल ओव्हरसीयर कर्मचारी आहेत. त्यांची नियुक्ती कार्यकारी अभियंता पदावर करता येत नाही. तरीही सुरेश गोसावी यांनी त्यांना स्थापन विभागाचे कार्यकारी अभियंता म्हणून नियुक्त केले. वास्तविक पाहता या तृतीय श्रेणी कर्मचाऱ्याला प्रथम श्रेणीचा पदभार देता नाही. तरीही, सुरेश गोसावी यांनी मनमानी पद्धतीने त्यांची नेमणूक केली. त्यामुळे गोसावी यांच्या आशीर्वादाने विजय ढवळे यांनी निविदा प्रसिद्ध करणे, प्रलंबित देयके मंजूर करणे, संबंधित विभागाचा पत्रव्यवहार करणे, आणि कामे केली. त्यातून गेल्या तीन वर्षात जवळपास ३०० कोटींची बिले अधिकार नसतानाही ढवळे यांनी मंजूर केली आहेत, असेही ॲड.कौस्तुभ पाटील यांनी स्पष्ट केले.
विद्यापीठासारख्या महत्त्वाच्या शैक्षणिक संस्थेत अशा प्रकारचा भ्रष्टाचार होणे, ही बहुदा दुर्मिळातील दुर्मिळ घटना आहे. विशेष म्हणजे संस्थेचे प्रमुख असणाऱ्या कुलगुरू आणि प्र-कुलगुरूंनी अशा प्रकाराला अभय देणे, हे महाराष्ट्राचे दुर्दैव आहे. त्यामुळे आपल्याला प्राप्त झालेल्या कागदपत्रांच्या आधारे पोलीस प्रशासन आणि न्यायालयाकडे तक्रार करण्यात येणार असल्याचेही ॲड.कौस्तुभ पाटील यांनी आवर्जून सांगितले.
विद्यापीठाचे प्र-कुलगुरू पराग काळकर यांच्यावर यापूर्वी सुद्धा आर्थिक गुन्हा अर्थात फसवणूक प्रकरणी पिंपरी चिंचवड पोलीस स्टेशनला कलम ४०६, ४०९ आणि ४२० नुसार गुन्हा नोंद आहे. मात्र, त्यांनी नियुक्तीवेळी विद्यापीठ प्रशासनाला सादर केलेले प्रतिज्ञापत्र बेकायदेशीर आहे. कारण, त्यात त्यांनी आपल्यावर कोणताही गुन्हा नसल्याचे स्पष्ट केले आहे. तरीही, विद्यापीठ प्रशासनाने कोणतीही शहानिशा केली नाही. उलट, त्यांची प्र-कुलगुरू म्हणून नियुक्ती केली, असेही ॲड.कौस्तुभ पाटील यांनी स्पष्ट केले. दरम्यान, या गंभीर आरोपानंतर विद्यापीठ प्रशासन काय भूमिका घेणार, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.