महाराष्ट्र

गुणवंत विद्यार्थ्यांच्या पंखांत ‘सेवा सहयोग फाऊंडेशन’चे बळ ,अडीच हजार विद्यार्थ्यांना २७ कोटींची शिष्यवृत्ती

ठाणे -आर्थिक दुर्बल कुटुंबातील विद्यार्थ्यांच्या पंखात ‘सेवा सहयोग फाऊंडेशन’ या संस्थेने मोठे बळ भरले आहे. संस्थेच्या माध्यमातून गेल्या १७ वर्षांत राज्यभरातील २ हजार ३९६ गरजू विद्यार्थ्यांना २७ कोटी ३१ लाख रुपयांच्या शिष्यवृत्तीचे वाटप केले आहे. संस्थेने इंजिनीयरिंग आणि मेडिकलच्या विद्यार्थ्यांसह अन्य व्यावसायिक शिक्षण घेण्याऱ्या विद्यार्थ्यांची पूर्ण फी भरलेली आहे. दहावीमध्ये ९० टक्के आणि बारावीमध्ये ७० टक्के गुण मिळवलेल्या गरजू विद्यार्थ्यांनी या शिष्यवृत्तीसाठी अर्ज करावेत, असे आवाहन फाऊंडेशनच्या वतीने करण्यात आले आहे.

‘सेवा सहयोग फाऊंडेशन’चे संस्थापक अध्यक्ष रवींद्र कर्वे यांनी २००८ मध्ये ठाणे जनता सहकारी बँकेतून विशेष कार्यकारी अधिकारी या पदारून निवृत्ती घेतल्यानंतर विद्यार्थी विकास योजनेच्या नावाने हा उपक्रम सुरू केला. गरीब कुटुंबातील मुलांना इंजिनीयरिंग, मेडिकल आणि अन्य क्षेत्रांतील व्यावसायिक शिक्षण घेण्यासाठी अडचणी येऊ नयेत, इतर विद्यार्थ्यांप्रमाणेही त्यांनाही दर्जेदार शिक्षण घेता यावे यासाठी सेवा सहयोग फाऊंडेशनने शिष्यवृत्ती देण्यास सुरुवात केली. सुरुवातीला शिष्यवृत्तीचे स्वरूप हे मर्यादित होते. मात्र आता या संस्थेच्या कार्याचा विस्तार संपूर्ण राज्यभर झाला आहे. संस्थेच्या आर्थिक मदतीतून एक हजार ३६४ विद्यार्थ्यांचे शिक्षण पूर्ण झाले आहे. सध्या एक हजार ३२ विद्यार्थी राज्यभरातील विविध नामांकित महाविद्यालयांत शिक्षण घेत आहेत.

विद्यार्थ्यांनी केली ६३ लाखांची मदत

‘सेवा सहयोग फाऊंडेशन’ने शिक्षणासाठी आर्थिक मदत केलेले अनेक विद्यार्थी नामांकित कंपन्यांमध्ये काम करीत आहेत. त्यामध्ये टाटा समूह, इन्फोसिस, महिंद्रा अॅण्ड महिंद्रा, एल अॅण्ड टी, सिप्ला, एचएसबीसी, आयसीआयसीआय आदी नामांकित कंपन्यांचा समावेश आहे. या माजी विद्यार्थ्यांनी सामाजिक बांधिलकी म्हणून सध्या शिक्षण घेत असलेल्या विद्यार्थ्यांची फी भरण्यासाठी ६३ लाख ५७ हजार रुपयांचा निधी संस्थेला दिला आहे.

जिल्हा प्रतिनिधींशी संपर्क साधा

दहावीमध्ये ९० टक्के आणि बारावीत ७० टक्के गुण मिळवलेल्या आणि व्यावसायिक शिक्षण घेण्याऱ्या गरजू विद्यार्थ्यांनी सेवा सहयोग फाऊंडेशनच्या या शिष्यवृत्तीसाठी जिल्हा प्रतिनिधींशी https://bit.ly/VVY-mentors या संकेतस्थळावर संपर्क साधावा. गुणवत्ता आणि गरज या संस्थेतर्फे दिल्या जाणाऱ्या मदतीचे निकष आहेत. त्याचे काटेकोरपणे पालन करून गरजू विद्यार्थ्यांना शिष्यवृत्ती देण्यात येणार आहे. विद्यार्थ्यांनी या योजनेचा लाभ घ्यावा, असे आवाहन संस्थेचे अध्यक्ष रवींद्र कर्वे यांनी केले आहे

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button