फलटण – मुसळधार पाऊस आणि नदी नाले यांना आलेल्या पुरामुळे संकटात सापडलेल्या नागरिकांसाठी प्रशासनाबरोबरच दोन्ही गटाचे नेते मंडळी कार्यकर्त्यांना घेऊन प्रत्यक्ष मदतीसाठी धावून आल्यामुळे काही अंशी आपतग्रस्त नागरिकांना दिलासा मिळाला आहे.दोन्ही गटाच्या नेतेमंडळींनी जनतेशी असलेली बांधिलकी यानिमित्ताने दाखवून दिली आहे.मात्र नगरपालिका प्रशासन सुस्त दिसून आले.
फलटण शहर व तालुक्यात गेल्या चार-पाच दिवसापासून पावसाने हाहाकार माजविला आहे. गेले तीन दिवस सलग पाऊस लागून राहिल्याने अनेकांच्या घरात पाणी घुसले होते. नदी ,नाले, ओढे यांना पूर आल्यामुळे पुराच्या विळख्यात अनेक घरे सापडली होती. बाणगंगा नदीला पूर आल्यामुळे नदीकाठच्या गावात आणि शहरात घरात पाणी शिरले होते. या पावसामुळे संपूर्ण तालुका संकटात सापडला असताना त्यांना दिलासा देण्यासाठी व मदतीचा हात देण्यासाठी प्रशासनाबरोबरच फलटण तालुक्यातील दोन्ही गटाची नेते मंडळी मदतीसाठी तातडीने धावून आली. विधान परिषदेचे माजी सभापती रामराजे नाईक निंबाळकर, माजी खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर यांनी कधीही हाक मारा फोन करा मदतीसाठी तत्पर असल्याचे आवाहन केले. विद्यमान आमदार सचिन पाटील ,माजी आमदार दीपक चव्हाण ,माजी जिल्हा परिषद अध्यक्ष संजीवराजे नाईक निंबाळकर, रघुनाथराजे नाईक निंबाळकर यांनीही जागोजागी जाऊन पाहणी केली.धीर दिला. माजी खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर यांनीही अनेक गावांचा व शहराचा दौरा करून नागरिकांना दिलासा देण्याचे काम केले. दोन्ही गटाचे नेते मंडळी आणि त्यांचे कार्यकर्ते गावोगावी फिरल्यामुळे प्रशासन गतिमान झाले. नागरिकांनी त्यांच्या समस्या व्यक्त केल्या. फलटण कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती रघुनाथराजे नाईक निंबाळकर यांनी त्यांच्या संस्थेची शाळा आपतग्रस्तांना राहण्यासाठी उपलब्ध करून दिली. अनेक आपतग्रस्तानी मदतीसाठी नेतेमंडळींना फोन केल्यावर त्यांनी तत्परता दाखविल्याने लोकांना काही अंशी दिलासा मिळाला आहे. या मुसळधार पावसाने फलटण तालुक्याचे प्रचंड नुकसान झाले आहे. लोक संकटात सापडले आहेत अनेकांच्या घरात व शेतात पाणीच पाणी झाले असून संसार उपयोगी साहित्य वाहून गेले आहे. अनेकांचे संसार उघडे अडले आहेत.अनेकजण अद्यापही पुराच्या विळख्यात आहेत.लोकांना भविष्याची चिंता लागून राहिली आहे अशा कठीण परिस्थितीत या पुढील काळात नेते मंडळींनी राजकारण विसरून आपल्या कर्तृत्वावर प्रत्येकाला सक्षमपणे उभे करण्यासाठी प्रयत्न करण्याची अपेक्षा नागरिकांमधून व्यक्त होत आहे.
दुसरीकडे फलटण प्रशासन पण अलर्ट झाले होते प्रांत अधिकारी प्रियांका आंबेकर,तहसीलदार डॉ अभिजित जाधव, नायब तहसीलदार अभिजित सोनवणे यांनीही जागोजागी जाऊन नागरिकांना मदत केली.हे एकीकडे होत असताना फलटण नगर पालिका प्रशासन सुस्त दिसून आले.नगर पालिका प्रशासनाचा कारभार सुस्त चालला असल्याने नागरिकांमधून नाराजी व्यक्त होत आहे.