फलटण – अनेक दिवसांपासून नगरपालिका व पंचायत समिती निवडणूकसाठी बाशिंग बांधून बसलेल्या इच्छुकांना निवडणुका होणार असल्याने दिलासा मिळाला असून इच्छुकांच्या हालचालींना वेग आला आहे. अनेकजण जनसंपर्क वाढविण्याच्या तयारीला लागले आहेत.
गेले तीन वर्षाहून अधिक काळ स्थानिक स्वराज्य संस्थांवर मध्ये प्रशासकीय राजवट चालू आहे नगरपालिका जिल्हा परिषद व पंचायत समितीमध्ये तीन वर्षे झाले लोकप्रतिनिधी नसल्याने प्रशासकांचे अधिकार चालत होते. मात्र काल सर्वोच्च न्यायालयाने येत्या चार महिन्यात स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका घेण्याचे आदेश निवडणूक आयोगाला दिले आहेत. तसेच ओबीसी आरक्षण सुद्धा आहे तसे ठेवल्याने निवडणुकांचा मार्ग मोकळा झाला आहे. गेल्या तीन वर्षाहून अधिक काळ निवडनुकीसाठी बाशिंग बांधून बसलेले इच्छुक खुश झाले आहेत. यावेळी आपण निश्चितच लोकप्रतिनिधी होणार या अपेक्षेने त्यांनी मोर्चे बांधणी सुरू केली आहे. निवडणुका जाहीर होणार असल्याने अनेकांचा आनंद गगनात मावेनासा झाला आहे. निवडणुकीसाठी वेळ असल्याने आता जनसंपर्क कसा वाढवायचा मतदारांवर प्रभाव कसा टाकायचा याची व्युहरचना सुरू झाली आहे.
यापूर्वी निवडणुका होतील म्हणून अनेकांनी मोठा खर्च केला होता मात्र निवडणुका सतत पुढे ढकलत गेल्याने त्यांची ही निराशा झाली मात्र आता निवडणूक सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशानुसार होणारा असल्याने आता अनेक जण खर्च करण्याच्या तयारीला लागले आहेत.नेतेमंडळींचे आपल्यावर लक्ष राहावे म्हणून अनेकजण आता वेगवेगळ्या क्लृप्त्या वापरण्याच्या तयारीत आहेत.निवडणुकीसाठी अनेक वर्षे वाट पाहिली असल्याने आता यंदाची निवडणूक जिंकायचीच असा पण काहींनी केला आहे.त्यामुळे इच्छुकांच्या हालचाली अंतर्गत वाढलेल्या आहेत.ज्याच्या त्याच्या तोंडी आता निवडणूक हा शब्द ऐकू येऊ लागला आहे.
फलटण नगर परिषदेच्या 25 नगरसेवक व एक नगराध्यक्ष पदासाठी निवडणूक होणार आहे.तर जिल्हा परिषदेच्या 7 व पंचायत समितीच्या 14 जागांसाठी निवडणूक होणार आहे. मागील एक वर्षापासून बदललेली तालुक्याची राजकीय परिस्थिती पाहता यावर्षीची निवडणूक खूप वेगळी आणि नेतेमंडळींच्या प्रतिष्ठेची असणार आहे.