फलटण : आपण वारकरी सांप्रदायाचे पाईक असून आपल्यावर लहान पणापासून वारकरी सांप्रदायाचे संस्कार झाले असल्याचे आवर्जून सांगत आपल्या मतदार संघातील या गुरुकुलचा आपल्याला निश्चित अभिमान आहे. या ठिकाणी विद्यार्थ्यांना नियमित शिक्षणाबरोबर अध्यात्मिक, कृषी, उद्योग, क्रीडा विषयक शिक्षण देवून विद्यार्थ्याला स्वतःच्या पायावर उभे करण्यासाठी ह.भ.प. बंडा तात्या कराडकर यांच्या मार्गदर्शनाखाली सुरु असलेले प्रयत्न नव्या पिढीसाठी उपयुक्त असल्याचे स्पष्ट करीत गुरुकुलला सर्वतोपरी मदत करण्याची ग्वाही आ. सचिन पाटील यांनी दिली.

राष्ट्रबंधू राजीव दीक्षित गुरुकुल व व्यसनमुक्त युवक संघ महाराष्ट्र मध्यवर्ती कार्यालय पिंप्रद, ता. फलटण येथे दि. ३ ते ७ मे दरम्यान आयोजित सामुदायिक निळोबाराय गाथा पारायण व कीर्तन महोत्सवाचा शुभारंभ आणि ६० फूट उंचीचा ध्वज स्तंभ उभारणी व त्यावर लावण्यात आलेल्या प्रचंड मोठ्या धर्मध्वजाचे पूजन व उभारणी प्रसंगी विशेष अतिथी म्हणून आ. सचिन पाटील, पंढरपूर येथील ज्येष्ठ कीर्तनकार ह.भ.प. शंकर महाराज बडवे, ॲड. आशुतोष बडवे, व्यसनमुक्त युवक संघांचे संस्थापक युवक मित्र ह.भ.प. बंडातात्या कराडकर, व्यसनमुक्त युवक संघांचे अध्यक्ष दिपक जाधव, दशरथ (आबा) बोबडे, ह.भ.प. नंदकुमार कुमठेकर महाराज, सिने कलाकार भरत शिंदे, यांच्यासह पिंप्रद व पंचक्रोशीतील सरपंच, उपसरपंच, सोसायटी चेअरमन अन्य मान्यवर, ग्रामस्थ, वाचक, भाविक उपस्थित होते.
आळंदी – पंढरपूर – महाड राष्ट्रीय महामार्ग (पालखी महामार्ग) ते पवारवाडी या रस्त्याच्या अपूर्ण कामाची पूर्तता करून पवारवाडी ते नाईकबोमवाडी हा नव्याने मंजूर रस्ताही तातडीने पूर्ण करण्याचे आश्वासन देत या गुरुकुलातील सर्व सुविधा, शिक्षण पद्धती, येथील व्यवस्था मनाला समाधान देणारी असून आपल्या मतदार संघातील या गुरुकुलचा आपल्याला सार्थ अभिमान असल्याची ग्वाही आ. सचिन पाटील यांनी दिली.
ज्येष्ठ कीर्तनकार व व्यसनमुक्त युवक संघांचे संस्थापक युवकमित्र ह.भ.प. बंडातात्या कराडकर यांनी सुमारे १२ वर्षांपूर्वी राष्ट्रबंधू राजीव दीक्षित गुरुकुलची स्थापना केली असून इयत्ता ५ वी ते १० वीपर्यंत शिक्षणव्यवस्था असलेल्या या गुरुकुल मध्ये विद्यार्थ्यांना पोहण्यासाठी जलतरण तलाव, नियमित व्यायाम, अभ्यासिका, संगणक लॅब, तबला, पेटी, मृदंग वाजविण्यासाठी मार्गदर्शन, आहारात संपूर्ण सेंद्रीय अन्न पदार्थ आणि दूध दिले जात असल्याचे प्रास्ताविकात व्यसन मुक्त युवक संघाचे अध्यक्ष दिपक (आबा) जाधव यांनी निदर्शनास आणून दिले.
प्रारंभी ह.भ.प. नंदकुमार कुमठेकर महाराज यांनी सर्वांचे स्वागत केले. यावेळी सर्व मान्यवर मंडळी यांचा व्यसनमुक्त युवक संघटना व फलटण तालुका वारकरी संघ यांचे वतीने यथोचित सन्मान करण्यात आला.
यावेळी ह.भ.प. शंकर महाराज बडवे व ॲड. आशुतोष बडवे यांनी भागवत धर्मध्वज व छत्रपती शिवाजी महाराज यांच्या इतिहासावर आपले विचार व्यक्त केले.
ह.भ.प. बंडा तात्या कराडकर यांनी शुभाशीर्वाद दिले.
या सोहळ्यात कीर्तनानंतर दररोज रात्री शासकीय अधिकारी यांच्या हस्ते आरती करण्यात येते, त्यामध्ये निवासी नायब तहसीलदार अभिजित जाधव, सहाय्यक निबंधक (सहकारी संस्था) फलटण जे. पी. गावडे व त्यांच्या सुविद्य पत्नी, गुणवरे ग्रामपंचायत माजी सरपंच सौ. शशिकला गावडे यांनी आरतीचा लाभ घेतला.
Back to top button
