फलटण -“धैर्य आणि श्रद्धा हीच खरी संपत्ती आहे, जी कोणत्याही परिस्थितीत मदत करते.”.या विचारांमधून स्वामी समर्थ आपल्याला आत्म-समर्पण, भक्तिभाव, आणि विश्वास ठेवण्याची शिकवण देतात. ते आपल्याला जीवनातील अडचणींवर मात करण्यासाठी आणि शांती मिळवण्यासाठी मार्गदर्शन करतात.आज जगाला स्वामींचे विचारच तारू शकणार आहेत असे प्रतिपादन आध्यात्मिक क्षेत्रातील परमपूज्य राजनकाका देशमुख महाराज यांनी केले.
श्री स्वामी समर्थ महाराजांच्या पुण्यतिथीनिमित्त श्री स्वामी समर्थ सेवा मंडळ, बुधवार पेठ,शिवाजी रोड फलटणच्या वतीने नवलबाई मंगल कार्यालय येथे प. पूज्य राजनकाका देशमुख महाराज यांचे उपस्थितीत विविध धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते त्यावेळी ते बोलत होते.
रोजच्या जगण्यात आपण कसेही जगतो. पण आपल्या आयुष्यात काय बरोबर आणि काय चूक आहे या गोष्टी आपण ठरवणे अत्यंत गरजेचे आहे. स्वामी समर्थांचे विचार आपल्याला प्रेरणा देणारे आणि सकारात्मक उर्जा देणारे ठरतात
डोळे बंद केले म्हणून संकटे जात नाहीत,संकटे आल्या शिवाय डोळे उघडत नाहीत ,राग आल्यावर थोडं थांबलं आणि चुक झाल्या वर थोडं नमलं तर जगातील अनेक समस्या दूर होतील असे परमपूज्य राजनकाका देशमुख महाराज यांनी स्पष्ट केले.
आज प्रत्येकजण पैशाच्या मागे पळत आहे मात्र पळताना त्याला देवाचा भक्तीचा विसर पडल्याने त्याचे मन स्वार्थी झाले आहे.स्वार्थापायी त्याचे हातून चुका घडल्याने नेहमी तो आतून दुखी आणि असमाधानी आहे.त्याला झोप लागत नाही.याच्या उलट कष्ट करून खाणारा आणि देवाचे नामस्मरण करणारा सुखी आहे.आनंदात जगत आहे. त्यामुळे जगात परमेश्वराच्या नामा शिवाय पर्याय नसल्याचे देशमुख महाराज यांनी सांगितले.
यावेळी ह.भ.प.नवनाथमहाराज शेलार यांचेही मार्गदर्शनपर प्रवचन झाले.
श्री स्वामी समर्थ यांच्या पुण्यतिथीनिमित्त श्रीं चा अभिषेक, महाआरती, मंत्र ,नामस्मरण त्यानंतर वास्तुशास्त्र,पितृषास्त्र,संख्याशास्त्र,शिवसरोदय शास्त्र याविषयी प. पू. राजनकाका देशमुखमहाराज यांचे प्रवचन झाले. त्यानंतर महाप्रसाद कार्यक्रम झाला.दिवसभर सुरू असलेल्या या कार्यक्रमासाठी हजारो भक्तांनी उपस्थिती दर्शविली.