पुणे – कोणताही उद्योग हा एखाद्या कौशल्याने होत नाही तर तो मनाच्या प्रचंड अशा इच्छाशक्तीने होतो. उद्योग उभारताना अनेक अडचणी येतात. त्या अडचणींना धैर्याने सामोरे जाऊन प्रश्न सोडवता येतात. याप्रसंगी नैराश्य येते, अपयशाची भीतीही वाटते पण याला सकारात्मक राहून सततचा संघर्ष करून उद्योगात यशस्वी होता येते, असा मोलाचा सल्ला क्यूकहिल टेक्नॉलॉजी चे व्यवस्थापकीय संचालक शिवश्री डॉ. कैलाश काटकर यांनी दिला.
मराठा सेवा संघ प्रणित मराठा उद्योजक विकास आणि मार्गदर्शन संस्थेचा पुणे जिल्हा कक्षाचा प्रथम वर्धापन दिन नामांकित उद्योजकांच्या मार्गदर्शन व उपस्थितीत बालगंधर्व रंगमंदिर येथे साजरा झाला, यावेळी ते बोलत होते. याप्रसंगी व्यवसायात यशस्वी झालेल्या उद्योजकांचा विशेष सन्मान मानवरांच्या हस्ते करण्यात आला. यावेळी शिवजल इन्फ्राचे व्यस्थापकीय संचालक शिवश्री सचिन भोसले, येवले अमृततुल्यचे व्यस्थापकीय संचालक नवनाथ येवले, शिवश्री सचिन भोसले, मराठा सेवा संघाचे प्रवीण गायकवाड व मराठा उद्योजक पुणे कक्ष अध्यक्ष अर्जुन ख़ामकर आदी उपस्थित होते.
डॉ. वायाळ म्हणाले, उद्योजक घडविणे ही काळाची गरज आहे, असे सांगून आपल्या उद्योगात महिलांना प्राधान्य दिल्याचे सांगितले तसेच येवले अमृततुल्येचे शिवश्री नवनाथ येवले म्हणाले की, उद्योग उभारताना स्वतःवर विश्वास हवा. प्रामाणिकपणा हवा, उद्योगाची सुरुवात छोट्या गोष्टीने करा. ब्रॅण्डिंग व नेटवर्किंग केले पाहिजे. व्यवसाय करताना गोल अतिशय महत्त्वाचा आहे. कष्टाला पर्याय नाही आणि कष्ट प्रामाणिक असेल तर यशाला पर्याय नाही.
शिवश्री सचिन भोसले म्हणाले की, कोणताही उद्योग उभारताना अडचण ही ठरलेली असतेच तिला संकट न मानता संधी म्हणून पाहिले तर पुढे जाऊन प्रगती करता येते. कोणत्याही उद्योगात शिक्षण अडसर ठरत नाही. संघर्ष शिवाय प्रगती नाही, उद्योग वाढीस युनिटी अतीशय महत्वाची आहे.
प्रवीण गायकवाड म्हणाले, मराठा युवकांनी छत्रपती शिवरायांची प्रेरणा घेऊन उद्योगात पुढे यावे व जगावर अधिराज्य गाजवावे, आरक्षणाच्या पाठीमागे लागण्यापेक्षा उद्योगात यश मिळवावे. जे परदेशात राहून आपल्या उद्योगात पुढे जाऊन प्रगती करत असून महाराष्ट्राचा तसेच देशाचा नावलौकिक वाढवीत आहेत.
मराठा उद्योजक पुणे कक्ष अध्यक्ष अर्जुन ख़ामकर यानी आवाहन केले, की मराठा उद्योजकांनी उद्योजक कक्षाशी जवळीक साधावे. जेणेकरून व्यवसायासाठी लागणारे सर्व मार्गदर्शन नव उद्योजकांना लाभेल.
याप्रसंगी अभिजीत घाटगे, दादा भापकर व इतर उद्योजकांनी सुरेख मार्गदर्शन केले. या प्रसंगी मोठ्या प्रमाणावर मराठा बंधू भगिनी उपस्थित होत्या.
कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी बालासाहेब कोबल, रोहित जगताप, शंकर मांजरे, बालाजी चाव्हान, मुकेश पाटिल, महेश अंबाड, स्वप्निल इंदुलकर, गणेश औताडे, सुरेश वालंज, सचिन वटाने विशेष परिश्रम घेतले. कार्यक्रमाची प्रस्तावना अर्जुन खामकर यांनी केली तर कार्यक्रमाचे सूत्रसंचालन अक्षय मोरे यांनी केले. आभार जितेंद्र बाजी मानले.