स्थानिक

भारतीय संगीताचा कधीही न मावळणारा सूर्य म्हणजेच किशोर कुमार – शाहीर खंडागळे

पुणे पत्रकार भवनात रंगली सदाबहार गीतांची मैफल : युवा गायक सुदेश वाघमारे यांनी उपस्थितांना केले मंत्रमुग्ध 

पुणे (प्रतिनिधी):-आपल्या दर्दभर्‍या आवाजातून रसिकांच्या थेट काळजात शिरणारे गायक म्हणून प्रसिध्द गायक किशोर कुमार यांची ओळख आहे. त्याच्या त्या खास ठेवणीतल्या पिचलेल्या आवाजाने रसिकांच्या हृदयाला कायम हात घातला आहे. आपल्या रोमँटिक गाण्यातून रसिकांना अवर्णनीय आनंद देणार्‍या किशोरच्या दर्दभर्‍या गाण्यांनी रसिकांच्या भावविश्वातील दु:खाला चंदेरी किनार दिली. किशोरकुमार हा खरे तर अवलिया कलाकार होते. मात्र, त्यांनी संगीताचे कसलेही शास्त्रशुध्द प्रशिक्षण घेतले नव्हते. त्यांचा आवाज हीच त्यांची देन होती. त्याच गोड आवाजाने त्यांनी सर्व भाषांमध्ये जवळपास १५०० गाणी गायली आहेत. त्यामध्ये मराठी, आसामी, बंगाली, गुजराती, कन्नड, भोजपुरी, मल्याळम अशा विविध भाषांमधील गीतांचा समावेश आहे. ते उत्तम गायक असण्याबरोबरच लेखक, चित्रपट निर्माता आणि पटकथा लेखक देखील होते. त्यांनी १४ चित्रपटांची निर्मिती केली आणि काहींचे त्यांचे लेखन करून त्यात संगीत दिले. त्यापैकी ६ चित्रपट अपूर्ण राहिले. तर, ५ चित्रपटांच्या पटकथा लिहिल्या असून त्यापैकी २ अपूर्ण राहिले. तसेच १२ चित्रपटांचे दिग्दर्शन केले. त्यापैकी ४ अपूर्ण राहिले. त्यामुळे चित्रपटसृष्टीत त्यांचे अमूल्य असे योगदान आहे. परिणामी, भारतीय संगीताचा कधीही न मावळणारा सूर्य म्हणजेच किशोर कुमार, असे प्रतिपादन शाहीर महादेव खंडागळे यांनी केले. 

शहरातील पत्रकार भवन येथे कल्चर इव्हेंट्सच्या वतीने आयोजित २४ क्यारेट किशोर कुमार या सदाबहार कार्यक्रमाच्या समारोप प्रसंगी ते बोलत होते. याप्रसंगी युवा गायक सुदेश वाघमारे यांच्यासह विविध गायकांनी किशोर कुमार यांची लोकप्रिय २४ गाणी सादर करून प्रेक्षकांची मने जिंकली. विशेषत: सुदेश वाघमारे यांच्या आवाजाने कार्यक्रमात रंगत आणली. त्यामुळे त्यांच्या प्रत्येक गाण्याला वन्समोअर म्हणत प्रेक्षकांनी सुध्दा खुल्या मनाने चांगली दाद दिली. या सदाबहार कार्यक्रमात ‘मेरा जीवन कोरा कागज’, ‘‘जिंदगी के सफर में गुजर जाते’, ‘ये जो मोहब्बत है’, ‘तुम बिन जाऊ कहां’, ‘कुछ तो लोग कहेंगें’, ‘ये क्या हुआ, कैसे हुआ’, ‘तेरे बिना जिंदगी से शिकवा तो नहीं’, ‘हम बेवफा हरगिज न थे’ आणि ‘दिल ऐसा किसीने मेरा तोडा’ यासह विविध गाणी सादर करून किशोर कुमार यांच्या संगीत प्रवासाला उजाळा देण्यात आला. याप्रसंगी प्रसिध्द युवा गायक सुदेश वाघमारे यांना गायक आनंद काजुळकर, सुनील शिंदे, गायिका अपर्णा काजुळकर, रूपाली अभंग, डॉ.उन्नती निंबाळकर, पूर्वा केसकर, मोहिनी सुर्यवंशी यांनी साथ दिली. तसेच कार्यक्रमाचे औचित्य साधून गायक सुदेश वाघमारे यांच्या पत्नी अपेक्षा वाघमारे, आई मीना वाघमारे, बहीण बबिता वाघमारे यांच्यासह संस्कृती डिझायनर्सचे नामदेव पाटील, शाहीर महादेव खंडागळे, युवा व्याख्याते सागर सोनकांबळे, स्मार्ट सखीच्या वृषाली महाजन, सीमा सुतार, समेधा म्युजिकल्सच्या दीपाली नाईकनवरे, स्वर मंगलच्या मंगल लोहोर, स्वर गंधारच्या अश्विनी वडके, स्वरमालाच्या सई जाधव, स्वरगुंजनच्या वासंती वायचाळ यांचाही सन्मान करण्यात आला.  

यावेळी युवा गायक सुदेश वाघमारे म्हणाले की, एखाद्या व्यक्तीला कला, कौशल्य हे गॉड गिफ्टेड आहे, असे आपण अनेकदा म्हणतो. क्रिकेटमध्ये जसा सुनील गावसकर तसा पार्श्वगायनात किशोर कुमार होता. संगीताचे कुठलेही शिक्षण न घेतलेल्या किशोर कुमार यांनी जे गायले आहे, त्याचे वर्णन कसे करावे, हा मोठा प्रश्नच आहे. कुदरत चित्रपटातील ‘हमें तुमसे प्यार कितना’ हे किशोर कुमार यांचे गाणे शांतपणे ऐकले की त्याने काय गायले हे लक्षात येते. तरीही शास्त्रीय गाणे जमत नाही, याची उणीव किशोर कुमार यांना जाणवत होती. साठच्या दशकापासून, तरुणांच्या मनावर राज्य करणारे किशोरदांचे राज्य आजही कायम आहे. त्यांचा आवाज अजरामर आहे. आजचे तरुणही त्यांच्या गाण्यांसाठी तितकेच वेडे आहेत. जेवढे साठच्या आणि सत्तरच्या दशकातील तरुण होते. ‘ओ मेरे दिल के चैन’, ‘भीगी भीगी रातों में’, ‘नीले नीले अंबर पर’ या गाण्यांनी तर इतका कहर केला आहे कि, या गाण्यांसाठी असणारे तरुणाईचे वेड जवळजवळ अर्धशतक होऊन गेले तरी काही कमी झाले नाही आहे. त्यामुळे भारतीय संगीतासाठी आपले संपूर्ण आयुष्य पणाला लावणारे हाडाचा कलाकार म्हणून किशोर कुमार यांची संपूर्ण जगभर ख्याती आहे. 

ज्याला अख्खी दुनिया किशोर कुमार नावाने ओळखते. त्या अवलीयाचे खरे नाव होते आभासकुमार गांगुली! अभिनेता आणि गायक म्हणून किशोरची हजारो गाणी लोकप्रिय झाली. पडद्यावर राजेश खन्ना, संगीत आरडी बर्मन यांचे आणि किशोर कुमारचा आवाज हे समीकरण झाले होते. ‘आराधना’ चित्रपटातील ‘मेरे सपनो की रानी कब आएगी तू’ या गाण्यानंतर किशोर कुमार हिंदी सिनेसृष्टीत बहरला तो कायमचाच. तोपर्यंत मोहम्मद रफींचा आवाज सर्वांना हवाहवासा वाटे. असे असले तरी किशोर कुमार रफीसाहेबांचे निस्सीम चाहते होते. त्यांची खूप चांगली मैत्री होती. त्यामुळे रफीसाहेबांच्या निधनानंतर किशोर कुमार पायाजवळ बसून धोधो रडत होता. नेहमी खट्याळ असणार किशोर कुमार इतके संवेदनशील होते. त्यामुळे भारतीय चित्रपटसृष्‍टीचा इतिहास लिहायचा झाल्‍यास किशोरकुमार या नावाशिवाय तो पूर्णच होऊ शकणार नाही. बॉलीवूडला पहिला सूपरस्‍टार राजेश खन्ना यांच्‍या रुपाने मिळाला. मात्र, त्‍यामागेही किशोरदांचा खास योडली आवाजच होता, हे नाकारून चालणार नाही, असे कल्चर इव्हेंट्सच्या संचालिका अपेक्षा वाघमारे यांनी आवर्जून सांगितले.

दरम्यान, कार्यक्रमाचे अत्यंत देखणे नियोजन, शिस्तबध्द आणि सूत्रबध्द कार्यक्रम यामुळे उपस्थितांनी समाधान व्यक्त करून युवा गायक सुदेश वाघमारे यांचे कौतुक केले. तसेच उपस्थित रसिकांसाठी ठेवलेल्या पाण्याच्या बाटल्यांना सुध्दा कार्यक्रमाचे स्टिकर, खास पिशव्या, आकर्षक सन्मानचिन्हे, फुलांची सजावट, रंगीत स्क्रीन यामुळे कार्यक्रमाच्या लौकिकात चांगली भर पडली. कार्यक्रमाचे प्रास्ताविक सागर सोनकांबळे आणि सूत्रसंचालन धनंजय झोंबाडे यांनी केले. तर, आभार युवा गायक सुदेश वाघमारे यांनी मानले. कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी दादासाहेब फाळके फिल्मसिटी व बॉलिवूड पार्क, संस्कृती डिझाईनर्स, सारद मजकूर, मल्हार आर्ट, आर.एल मीडिया, मॉस युटीलिटी प्रा.लि, सा.रक्षक रयतेचा, महाराष्ट्र टूरिझम आणि डीपी डिजिटल ॲंण्ड पीआर एजन्सी यांनी आर्थिक मदतीसह विशेश परिश्रम करून मोलाची भूमिका बजावली.  

चौकट क्रमांक १

फूलों का, तारों का सबका कहना है, एक-हजारों मेरी बहना हैं!

२४ क्यारेट किशोर कुमार या सदाबहार गीतांच्या कार्यक्रमात युवा गायक सुदेश वाघमारे यांनी आपल्या लाडक्या बहिणीसाठी गीतकार आनंदी बक्षी आणि संगीतकार आर.डी.बर्मन यांचे हरे रामा हरे कृष्णा चित्रपटातले ‘फूलों का, तारों का, सबका कहना है, एक हजारों में मेरी बहना है, सारी उमर, हमें संग रहना है’ हे गीत सादर केले. तेव्हा बहिण बबिता हिच्यासह संपूर्ण सभागृह भावूक झाले होते. त्याचवेळी पाठीमागे बसलेल्या सुदेश यांच्या आई मीना वाघमारे यांनाही अश्रु अनावर झाले होते. तर, ‘देखो हम तुम दोनों हैं इक डाली के फूल मैं ना भूला, तू कैसे मुझको गई भूल आ मेरे पास आ, कह जो कहना है’ या कडव्याने उपस्थितांचेही डोळे पाणावले होते.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button