फलटण : अस्मिता राज्यस्तर ज्युनिअर महिला हॉकी स्पर्धेमध्ये दि हॉकी सातारा महिला संघाने कोल्हापूर संघाचा दोन एकने पराभव करत तृतीय क्रमांक पटकावून सातारा जिल्ह्याच्या संघटना स्पर्धांमध्ये आणखी एक सन्मान प्राप्त केला.
मेजर ध्यानचंद हॉकी स्टेडियम पिंपरी चिंचवड, पुणे येथे हॉकी महाराष्ट्र व स्पोर्ट्स ॲथॉरिटी ऑफ इंडिया (साई) यांच्या संयुक्त सहभागाने अस्मिता राज्यस्तर ज्युनिअर महिला हॉकी स्पर्धांचे आयोजन करण्यात आले होते. या स्पर्धेमध्ये मुंबई, पुणे, कोल्हापूर, नागपूर, अहिल्यानगर, जळगाव, संभाजीनगर व सातारा या जिल्ह्यातील महिला खेळाडूंच्या संघांनी सहभाग घेतला होता.
उत्कृष्ट खेळाडू म्हणून दि हॉकी सातारा महिला संघातील तेजस्विनी कर्वे, सिद्धी केंजळे व वेदिका वाघमोडे यांना हॉकी स्टिक देऊन गौरविण्यात आले.
सातारा जिल्ह्याच्या महिला खेळाडू सब ज्युनिअर वयोगटातील असून सुद्धा ज्युनिअर संघाचा अत्यंत चुरशीने पराभव करत लीग स्पर्धांमध्ये विजय मिळविल्याबद्दल त्यांचे विविध स्तरावरुन अभिनंदन करण्यात आले.
या स्पर्धा पॉलीग्रास (कृत्रिम गवत) मैदानावर घेण्यात आल्या होत्या, सेमी फायनल मध्ये कायम स्वरुपी पॉलीग्रास मैदानावर सराव करणाऱ्या बलाढ्य मुंबई संघाबरोबर सातारा जिल्ह्याच्या महिला संघाने पॉलीग्रास मैदानावर सराव नसताना सुद्धा अत्यंत चुरशीच्या लढतीत एक झिरो ने लीड घेतले, त्यानंतर सामना बरोबरच सुटून सातारा जिल्ह्याचा महिला संघ झिरो एकने पराभूत झाला. खेळाडूंनी अत्यंत उत्कृष्ट खेळ करत सामना पाहायला आलेल्या आंतरराष्ट्रीय खेळाडूंची तसेच प्रेक्षकांची मने जिंकली.
सामना पहायला आलेल्या सर्व आंतरराष्ट्रीय खेळाडूंनी स्वतः येऊन पॉलीग्रास मैदानावर तुमचा सराव नसताना सुद्धा तुम्ही उत्कृष्ट खेळ केलात व मुंबईला निसटता विजय मिळाला असे महिला सांगून ऑलिंपियान धनंजय महाडिक, विक्रम पिल्ले यांनी खेळाडूंचे तोंड भरुन कौतुक केले. फलटण सारख्या तालुक्याच्या ठिकाणी एवढे उत्कृष्ट खेळाडू तयार होत असतील तर पॉलीग्रास मैदान किंवा ॲस्ट्रो टर्फ (astro turf) मैदान तेथे उपलब्ध करुन देणे आवश्यक असल्याचे नमूद करीत आपण स्वतः फलटणला आपल्या ग्राउंडला नक्कीच भेट देणार असल्याची ग्वाही या मान्यवरांनी दिली.
स्पर्धेचा बक्षीस समारंभ केंद्र सरकार क्रीडा खाते भारतीय खेल प्राधिकरणचे रिजनल डायरेक्टर चाटे यांच्या हस्ते करण्यात आला.
बक्षीस समारंभासाठी भारतीय पुरुष संघाचे माजी हॉकी प्रशिक्षक क्लारेन्स लोबो, ओलंपियन अजित लाकरा, विक्रम पिल्ले, धनंजय महाडिक, ज्येष्ठ आंतरराष्ट्रीय खेळाडू रमेश पिल्ले उपस्थित होते.
सदर राज्य स्पर्धा यशस्वी पणे पार पाडण्यासाठी व योग्य आयोजन, नियोजन हॉकी महाराष्ट्रचे वरिष्ठ उपाध्यक्ष मनोज भोरे यांनी उत्कृष्टपणे केले होते. तसेच त्यांनी सातारा जिल्ह्याच्या महिला हॉकी खेळाडूंना बोलावून उत्कृष्ट खेळ केल्याबद्दल शाबासकी दिली.
दि हॉकी सातारा महिला संघाला महाराष्ट्रचे वरिष्ठ राष्ट्रीय हॉकी प्रशिक्षक तथा संघटनेचे सचिव महेश खुटाळे, हॉकी प्रशिक्षक सचिन धुमाळ, बी. बी. खुरंगे यांचे मार्गदर्शन लाभले.
दि हॉकी सातारा संघटनेच्या विजयी खेळाडू व प्रशिक्षकांना आ. श्रीमंत रामराजे नाईक निंबाळकर, माजी आमदार दिपकराव चव्हाण, कृषी उत्पन्न बाजार समितीचे चेअरमन श्रीमंत रघुनाथराजे नाईक निंबाळकर, महाराष्ट्र खो-खो असोसिएशनचे अध्यक्ष श्रीमंत संजीवराजे नाईक निंबाळकर, मुधोजी हायस्कूलचे प्राचार्य शेडगे, दि हॉकी सातारा संघटनेचे अध्यक्ष बाहुबली शहा, सदस्य प्रवीण गाडे, महेंद्र जाधव, विजय मोहिते, पंकज पवार, सचिन लाळगे, माजी राष्ट्रीय हॉकी खेळाडू सुजीत निंबाळकर यांनी अभिनंदन केले.