फलटण : नीरा – देवघर धरण बांधण्यासाठी आपण परिश्रम घेतले, धरण बांधून पाणी अडवण्याचे काम आपण केले आणि कालव्याची कामे सुरु झाल्यावर ते म्हणतात सगळे आम्हीच केले, साधं सोपं गणित आहे धरण झाले नसते तर कालवा झाला असता का असा सवाल करून चांगला चाललेला श्रीराम कारखाना उध्वस्त करण्याचा विरोधकांचा डाव असल्याचा आरोप आ. श्रीमंत रामराजे नाईक निंबाळकर यांनी केला.
जाधव वस्ती, राजाळे, (ता. फलटण )येथे जाधव कुटुंबाचा राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष प्रवेश व कार्यकर्ता मेळाव्यात मार्गदर्शन करताना आ. श्रीमंत रामराजे नाईक निंबाळकर बोलत होते, यावेळी माजी आमदार दीपक चव्हाण, माजी सरपंच संभाजी निंबाळकर, माजी पंचायत समिती सदस्य पोपटराव बुरुंगले, श्रीराम साखर कारखाना चेअरमन सुखदेव बेलदार पाटील, गणेश भगत, राहुल इवरे यांची प्रमुख उपस्थिती होती.
आपलं पाणी कमी करुन हे सांगोल्याला पाणी द्यायला निघालेत, असे झाले तर ३६ गावचं पाणी कमी होईल त्याचा परिणाम उसाच्या क्षेत्रावर पर्यायाने इथल्या साखर कारखान्यावर होईल हे आ. श्रीमंत रामराजे नाईक निंबाळकर यांनी निदर्शनास आणून दिले.
आम्ही मोठ्या कष्टाने वाचवलेल्या शेतकऱ्यांच्या मालकीच्या श्रीराम सहकारी साखर कारखान्यावर प्रशासक नेमून त्या माध्यमातून हा सुस्थितीत आलेला साखर कारखाना बंद पाडायचा, कारखाना बंद पाडला की ऊस स्वतःच्या खाजगी कारखान्याकडे न्यायचा हा विरोधकांचा साधा हिशोब असल्याचे सांगत अशावेळी शेतकऱ्यांनी जागरुकतेने या कडे लक्ष द्यावे असे आवाहन करताना काहीही झाले तरी कारखाना उद्ध्वस्त करण्याचा विरोधकांचा हा बेहिशोबी डाव यशस्वी होऊ देणार नसल्याचे आ. श्रीमंत रामराजे नाईक निंबाळकर यांनी आवर्जून सांगितले.
आ. श्रीमंत रामराजे म्हणाले, जे स्वतःचा ऊस इतर कारखान्यांना घालतात विशेषत: तुमच्या गावचे श्रीराम कारखान्या विरोधात बोलणारे पुढारी त्यांनी कारखान्याच्या विरोधात न्यायालयात याचिका दाखल केली आहे, हे बाळ फार गुनाचं आहे. त्यांचे विविध कारनामे माझ्याकडे आहेत. त्यांनी श्रीरामच्या निवडणुकीला उभं रहावच त्यांची जागा त्यांना दाखवून दिल्याशिवाय राहणार नाही.
सत्ता बदलानंतर तालुक्यातील अधिकारी बदल्यांसाठी अर्ज करत आहेत, काय चाललंय असा सवाल करीत तुमचं तुम्ही ओळखा असे सांगत ऊस लवकर जावा म्हणून इथल्या अनेक शेतकऱ्यांनी उपळव्याच्या कारखान्याला ऊस घातला. उसाचे पैसे मिळाले का ? असा सवाल यावेळी आ. श्रीमंत रामराजे यांनी उपस्थित करुन त्यांचा खाजगी कारखाना वेळेवर पैसे देत नसल्याचे सांगत उपळव्याच्या बादशहाने स्वतःचा कारखाना नीट चालवावा मग श्रीराम मध्ये लक्ष घालावे, तुम्ही श्रीराम मध्ये लक्ष घातले तर मी उपळव्याच्या कारखान्यात लक्ष घालीन मला तर तिथलं सगळंच माहित असल्याचे आ. श्रीमंत रामराजे यांनी निदर्शनास आणून दिले.
पक्षप्रवेश केलेल्या कार्यकर्त्यांना उद्देशून बोलताना, आज तुम्ही आपल्याकडे प्रवेश केला आहे, काळजी करु नका. शेवटपर्यंत मी तुमच्या सोबत असेल. आमच्याकडे तुमचं नुकसान होणार नाही. याची खात्री बाळगा.
चौकट :
*वादळ जवळ आले आहे सावध रहा : इशारा*
इतके दिवस हा फुटला, तो फुटला असं सुरु होते, पण आता आमच्याकडे इनकमिंग सुरु झाले आहे. वादळापूर्वीची ती शांतता होती, आता वादळ जवळ आले आहे. आता तुम्ही सावध रहा. असा इशारा विरोधकांना देत आ.श्रीमंत रामराजे म्हणाले पैसा, सत्ता आणि प्रशासकीय अधिकाऱ्यांना हाताशी धरुन निर्माण केलेली दहशत लोक जास्त दिवस सहन करत नाहीत.