फलटण – विधानसभा निवडणुकीत सत्ता परिवर्तन झाल्यानंतर भाजपकडे अनेकांचा ओढा वाढला असून फलटण शहरानजीक असलेले महत्त्वाचे कोळकी गावातील अनेक दिग्गज लवकरच माजी खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर यांच्या नेतृत्वावर विश्वास ठेवत भाजपमध्ये प्रवेश करणार असल्याचे समजते.
दोन महिन्यापूर्वी झालेल्या विधानसभा निवडणूकीत फलटण तालुक्यात तीस वर्षानंतर सत्ता परिवर्तन होऊन महायुतीचे उमेदवार आणि माजी खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर यांचे विश्वासू सहकारी सचिन पाटील हे निवडून आले होते.
यापूर्वी फलटण तालुक्यात गेली 30 वर्षे विधान परिषदेचे माजी सभापती आमदार रामराजे नाईक निंबाळकर यांच्या नेतृत्वाखाली राजे गटाची एक हाती सत्ता होती. या सत्तेला विधानसभा निवडणुकीत मोठा हादरा बसून महायुतीचे सचिन पाटील विजय झाले. यानंतर पुढील राजकारणाचा वेध घेत अनेक कार्यकर्ते आणि नेते मंडळी भाजपमध्ये प्रवेश करू लागले आहेत. माजी खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर कार्यकर्त्यांना चांगली ताकद देऊ लागल्याने राजे समर्थक कार्यकर्त्यांचा ओढा भाजपकडे वाढू लागला आहे. आतापर्यंत कोळकी गाव आणि ग्रामपंचायत एकतर्फी राजे गटाकडे होती. संपूर्ण गाव राजे गटाला साथ देत होते मात्र विधानसभा निवडणुकीत सत्ता परिवर्तन होताच भाजपचे जिल्हा सरचिटणीस जयकुमार शिंदे यांनी अनेकांना भाजपमध्ये आणण्याचा चंग बांधून मोर्चे बांधणी सुरू केली आहे. यापूर्वी काहींनी भाजपमध्ये सुद्धा प्रवेश केला आहे.लवकरच अनेक दिग्गज भाजपमध्ये प्रवेश करणार असून ते जयकुमार शिंदे यांच्या संपर्कात असल्याचे समजते.