स्थानिक

सावित्रीबाई फुले सामाजिक क्रांतीच्या जनक – शाहीर खंडागळे,आंबे-शिवणसई येथे अभिवादन कार्यक्रम : विधी महिला उद्योगातील महिलांचा उत्स्फूर्त सहभाग 

पनवेल :-स्त्रियांना चूल आणि मूल तसेच अनिष्ट रूढी, परंपरेच्या जोखडातून बाहेर काढून त्यांना शिक्षणाच्या माध्यमातून स्वातंत्र्य देणाऱ्या क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले या देशातील सामाजिक क्रांतीच्या जनक आहेत, असे प्रतिपादन विधायक सामाजिक संस्थेचे संस्थापक अध्यक्ष शाहीर महादेव खंडागळे यांनी केले.

पनवेल तालुक्यातील मौजे.आंबे-शिवणसई येथे क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले यांच्या १९४ व्या जयंती निमित्त आयोजित कार्यक्रमाचे अध्यक्ष म्हणून ते बोलत होते. विधायक सामाजिक संस्था व विधी महिला उद्योग यांच्या संयुक्त विद्यमाने या अभिवादन कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. याप्रसंगी अनेक महिलांनी आपापली मनोगत व्यक्त करून सावित्रीबाईंच्या कार्याचा आढावा घेतला.‌ 

पुढे बोलताना शाहीर खंडागळे म्हणाले की, क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांनी अनेक हालअपेष्टा सहन करून स्त्रियांनी शिकावे, सावरावे आणि सुशिक्षित व्हावे यासाठी आपले जीवन वेचले. आजची महिला पुरुषांच्या खांद्याला खांदा लावून प्रत्येक क्षेत्रात कार्य करीत आहे. एक स्त्री म्हणून आपली कुठे, कशी, किती गरज आहे हे ओळखून ती काम करते. हे काम करत असताना त्यांना आपल्या कर्तव्याचा विसर पडू नये. क्रांतीज्योती सावित्रीबाईंचे विचार आजही आपल्याला ऊर्जा व प्रेरणा देतात.

याप्रसंगी काजल सिंग म्हणाल्या की, क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले व महात्मा फुले यांनी जगाला समतेची शिकवण दिली. सध्या समाजामध्ये जातीभेदाचे राजकारण होत आहे. परंतु मानवता हाच खरा धर्म असून सर्वांनी महात्मा फुले व सावित्रीबाई फुले यांच्या विचारांचे अनुकरण केल्यास एक सदृढ समाज निर्माण होईल.

सावित्रीबाई फुले यांचे कार्य वर्तमान समाजामध्ये प्रवाहित होण्यासाठी प्रत्येक घरातील स्त्रीने सावित्रीबाईंची शिकवण आचरणात आणावी. सध्या ढासळत्या समाज मूल्यांना बलवान करण्यासाठी अशा विचारांची सामूहिक चळवळ होणे काळाची गरज आहे, असे मत पत्रकार धनंजय झोंबाडे यांनी व्यक्त केले. 

आजच्या आधुनिक युगामध्ये पुरुषांच्या बरोबरीने स्त्रिया प्रत्येक क्षेत्रात योगदान देत आहेत. मात्र, पूर्वीच्या काळी स्त्रियांना घराबाहेर पडणे अवघड होते. या स्त्रियांना शिक्षणातून सक्षम घडवणाऱ्या क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांचे जीवनकार्य सदैव प्रेरणादायी असल्याचे गौरवोद्गार प्रकल्प अधिकारी उमेश वानखेडे यांनी काढले

ज्या काळामध्ये सावित्रीबाईंनी स्त्री शिक्षणासह समाज परिवर्तनाच्या क्रांतिकारी विचारांची मशाल हाती घेतली. तो काळ आता राहिला नसला तरी, आता सामाजिक दृष्ट्या महिला अत्यंत असुरक्षित जीवन जगत आहेत. विवाह खर्चात अनावश्यक वाढ होत आहे. कौटुंबिक हिंसाचार, व्यसनाधीनता, सामाजिक विचारांचे प्रदूषण, बेकारी, महागाई अशा गोष्टींच्या उपद्रवाने घराघरांतील सावित्री प्रभावित झाली आहे. त्यामुळे स्त्री जन्माचे स्वागत करा, याबरोबरच स्त्रीला सन्मानाने व सुरक्षित जीवन जगू द्या, असे मत प्रकल्प संचालिका प्रियदर्शनी बेंद्रे यांनी व्यक्त केले. 

कार्यक्रमाचे प्रास्ताविक प्रकल्प संचालिका प्रियदर्शनी बेंद्रे यांनी तर सूत्रसंचालन काजल पाटील यांनी केले. आभार सुविधा पलांडे यांनी मानले. यावेळी विधायक सामाजिक संस्थेचे सचिव महादेव खंडागळे, स्टार यूनियन दाई-इची लाईफ इन्शुरन्सच्या राज्य उपाध्यक्षा काजल सिंग, पत्रकार धनंजय झोंबाडे, प्रकल्प अधिकारी उमेश वानखेडे, अरुणा पाटील, सोनाली पाटील, प्रांजल भोपी, सुवर्णा पाटील, विजेता पाटील, ज्योती खंडवी, संगीता गटखळ यांच्यासह पंचक्रोशीतील महिला मोठ्या संख्येने उपस्थित होत्या.‌ 

चौकट क्रमांक १

सावित्रीबाईंनी स्वाभिमानाने जगणं शिकवलं – काजल सिंग 

ज्या सावित्रीबाईने मला या स्टेजवर बसण्याची संधी दिली, तिने आम्हाला शिक्षणाचा वसा दिला आणि तिनेच वेळप्रसंगी दगड धोंडे अंगावर घेतले. अगदी शेण सुद्धा अंगावर घेतले. पण आज महिलांना स्वाभिमानाने जगणं शिकवलं. त्या सावित्रीबाई फुले यांच्या समोर आदराने नतमस्तक व्हायला हवे, असे मत काजल सिंग यांनी व्यक्त केले. 

चौकट क्रमांक २

गाण्याने जिंकली उपस्थितांची मने, महिला सुध्दा झाल्या काहीशा भावूक!

कार्यक्रमाचे औचित्य साधून शाहीर महादेव खंडागळे यांनी अनेक गीतांचे दाखले देऊन उपस्थित महिलांचे चांगले प्रबोधन केले. या दरम्यान त्यांनी ‘नको गं माय जल्दी लगीन करू नको, बला म्हणू नको, माझी चिंता करू नको’ हे गीत सादर करून उपस्थितांची मने जिंकली. तेव्हा उपस्थित महिला काहीशा भावूक झाल्या होत्या.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button