पुणे ~ पुणे शहरातील निलेश तापकीर फाउंडेशनच्या वतीने ७८ व्या स्वातंत्र्य दिनानिमित्त ‘भारतीय वीरांच्या धाडसाचा आणि बलिदानाचा सन्मान’ या देशभक्तीपर संकल्पनेस अनुसरून वीरसैनिक सन्मान सोहळ्याचे भव्य आयोजन करण्यात येणार आहे. त्यामध्ये महाराष्ट्राची उज्ज्वल परंपरा जपण्यासाठी योगसान आणि मर्दानी खेळांच्या विविध स्पर्धा सुध्दा घेतल्या जाणार आहेत. या देशभक्तीपर कार्यक्रमास जागतिक मार्शल आर्ट विद्यापीठाचे अध्यक्ष डॉ.जगदीशसिंग खत्री, ॲडमास्टर क्रेझी कॉडराज (युरोप) यांच्यासह केंद्रीय मंत्री, भारतीय सैन्यातील वरिष्ठ अधिकारी, माजी पोलीस अधिकारी आणि विविध क्षेत्रातील मान्यवरांची उपस्थिती असणार आहे. शिवाय, हा सोहळा पुण्यातील नामांकित सभागृहात पार पडणार असून, देशासाठी प्राण अर्पण करणाऱ्या शूरवीर सैनिकांच्या कुटुंबियांचा गौरव करणे आणि व्यसनमुक्त व गुन्हेगारीमुक्त युवक घडविणे यासह स्त्री स्वरक्षणाचा प्रचार आणि प्रसार करणे हा या उपक्रमाचा मुख्य उद्देश आहे. या उपक्रमातंर्गत ५ वर्षापासून ते ९४ वर्षाचे नागरिक आपले कलाकौशल्य मर्दानी खेळाच्या आणि योगासनाच्या माध्यमातून नेत्रदिपक, कला सादर करणार आहेत, अशी माहिती सामाजिक कार्यकर्ते तथा युवानेते निलेश तापकीर यांनी पत्र परिषदेत दिली.

या सन्मान सोहळ्यात देशाच्या विविध भागातून आलेल्या माजी सैनिक, शहीद जवानांचे कुटुंबीय आणि संरक्षण दलातील मान्यवर अधिकारी उपस्थित राहणार आहेत. कार्यक्रमात त्यांच्या कार्याचा गौरव करत सन्मानचिन्ह, मानपत्र आणि विशेष स्मृतिचिन्ह प्रदान केले जाणार आहे. त्यांच्या शौर्यकथांचे सादरीकरणही करण्यात येणार आहे. त्यातून उपस्थितांमध्ये देशभक्तीची भावना जागृत होईल, असा विश्वास आयोजकांनी व्यक्त केला आहे. निलेश तापकीर फाउंडेशनने या आधीही अनेक सामाजिक, शैक्षणिक आणि आरोग्यविषयक उपक्रम यशस्वीपणे राबवले आहेत. मात्र, स्वातंत्र्य दिनाच्या निमित्ताने भारतीय सेनेच्या वीरांचा सन्मान हा त्यांच्या उपक्रमांमधील अत्यंत मानाचा आणि हृदयस्पर्शी सोहळा मानला जात आहे. युवकांमध्ये राष्ट्रभक्तीची प्रेरणा निर्माण व्हावी, यासाठी या कार्यक्रमाचे सोशल माध्यमांद्वारे थेट प्रक्षेपणही करण्यात येणार आहे.
फाउंडेशनचे अध्यक्ष निलेश तापकीर यांनी सांगितले की, आपली स्वातंत्र्याची वाट शौर्याने आणि बलिदानाने सजलेली आहे. हे बलिदान केवळ शब्दांमध्ये नव्हे, तर कृतीतून मान्य करण्याची ही वेळ आहे. त्यांनी सर्व पुणेकरांना या कार्यक्रमाला मोठ्या संख्येने उपस्थित राहून वीरांना मानवंदना देण्याचे आवाहन केले आहे. या कार्यक्रमाचे विशेष आकर्षण म्हणजे लष्करातील निवृत्त अधिकारी आणि युद्धात भाग घेतलेल्या जवानांच्या अनुभवकथांचे जिवंत सादरीकरण. कार्यक्रमाच्या शेवटी देशभक्तिपर गीते, कवायती आणि राष्ट्रगीताच्या सामूहिक गायनाने संपूर्ण वातावरण राष्ट्रप्रेमाने भारले जाणार आहे. पुणेकरांना अभिमान वाटावा, असा हा सन्मान सोहळा नक्कीच लक्षात राहणारा ठरेल, असाही विश्वास सामाजिक कार्यकर्ते तथा युवानेते निलेश तापकीर यांनी व्यक्त केला.
Back to top button
