स्थानिक

निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर आखाडा पार्ट्यांना ऊत,अनेक हॉटेल पण होतायेत हाऊस फुल

फलटण : आखाड महिन्याचा उत्तरार्ध सुरु झाला असून फलटण तालुक्यात ‘आखाड पार्ट्यां’नी जोर धरला आहे. विविध मांसाहारी हॉटेलात खवैय्यांची गर्दी होत असून शेतांमध्येही आखाड पार्ट्या रंगू लागल्या आहेत.आगामी नगरपालिका ,जिल्हा परिषद,पंचायत समितीच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर इच्छुकांनी आखाड्याच्या माध्यमातून मतदारांना खुश करण्याचा आणि नाव चर्चेत ठेवण्याचा चांगला योग साधला आहे.

आषाढ महिन्यात (आखाड) मोठ्या प्रमाणात मांसाहारी पदार्थ खाण्यावर भर असतो. अनेक जण घरगुती मांसाहाराचा बेत करुन आखाड साजरा करतात. मात्र गेल्या काही वर्षात आखाड महीना इव्हेंट झाला आहे. सध्या कुटुंबीय, मित्र-मंडळी, कार्यालयातील सहकारी यांच्यासोबत एकत्र येऊन आखाड साजरा करण्याकडे कल वाढला आहे.
येत्या दोन ते तीन महिन्यात नगरपालिका आणि पंचायत समिती जिल्हा परिषदच्या निवडणुका होत असून या निवडणुकांसाठी इच्छुक असणाऱ्या अनेक जणांनी आपला हात मोकळा सोडण्यास सुरुवात केली असून आपली नावे चर्चेत राहण्यासाठी आखाडाच्या माध्यमातून दारूचा पूर आणि जेवणावळी सुरू केली आहे. या जेवणावळी अत्यंत गुप्त पद्धतीने सुरू असून जास्त बोभाटा होऊ दिला जात नाही.
इतरत्र अनेकजण आखाड साजरा करण्यासाठी विविध मांसाहारी हॉटेलांना पसंती देत आहेत. फलटण परिसर मांसाहारी हॉटेलांसाठी प्रसिद्ध आहे. त्यामुळेच या भागातील मांसाहारी हॉटेलात खवैय्यांची गर्दी वाढू लागली आहे. तर अनेक जण गावरान पद्धतीने शेतांमध्ये आखाड पार्ट्या करण्याला पसंती देत आहेत. त्यामुळेच या भागातील शेतांमध्ये आखाड पार्ट्या रंगू लागल्या आहेत. आखाड महीना संपण्यास पाच दिवस बाकी असल्याने आखाड पार्ट्यांनी जोर धरला आहे.

तुपातलं मटन, गावरान कोंबडा, तांबडया आणि काळ्या रस्स्यातील मटन, मटन-चिकन दम बिर्याणी, तंदूर, मच्छी फ्राय या पदार्थांना हॉटेलांमधुन मागणी आहे. तर अनेकजण शेतात चुलीवर गावरान पद्धतीने बनविलेल्या मटन भाकरीवर ताव मारून आखाड साजरा करत आहेत.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button