स्थानिक
नामात मोठी ताकत असल्याने नाम हेच माझे गुरू – प.पूज्य राजनकाका देशमुख महाराज

फलटण – गुरु हे आपल्या जीवनातील अज्ञानाचा अंधार दूर करून ज्ञानाचा प्रकाश पसरवणारे दीपस्तंभ आहेत. त्यांच्या मार्गदर्शनामुळे आपले जीवन घडते आणि आपल्याला योग्य दिशा मिळते त्यामुळे जीवनात गुरुला महत्वाचे स्थान आहे.गुरूशिवाय तुमचे जीवन अपुरे आहे.नामात मोठी ताकत असल्याने नाम हेच माझे गुरू असल्याचे मत आध्यात्मिक क्षेत्रातील परमपूज्य राजनकाका देशमुख महाराज यांनी व्यक्त केले.
गुरु पौर्णिमेनिमित्ताने श्री स्वामी समर्थ सेवा मंडळ, बुधवार पेठ,शिवाजी रोड फलटणच्या वतीने नवलबाई मंगल कार्यालय येथे प. पूज्य राजनकाका देशमुख महाराज यांचे उपस्थितीत विविध धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते त्यावेळी ते बोलत होते.यावेळी ह. भ. प नवनाथ महाराज शेलार उपस्थित होते.
सृष्टीची निर्मिती झाल्यापासून गुरूंची अस्तित्व निर्माण झालेले आहे. प्राचीन काळापासून गुरूंचे मार्गदर्शन घेतले जात आहे गुरु हा आपल्याला दिशा दाखवणारा आणि जीवनात यशस्वी करणारा असतो. गुरुची महती अगाध आहे.प्रत्येक गुरुने नामस्मरणाला महत्त्व दिले असून नामस्मरण शिवाय मानसिक समाधान नाही असे परमपूज्य राजनकाका यांनी सांगितले.
संपुर्ण विश्व स्पंदनशील आहे, विश्वातील प्रत्येक वस्तू म्हणजेच स्पंदनाचा समूह आहे, मनुष्य हा सुध्दा स्पंदनाचा समूह आहे. .पूर्व जन्मातील कर्मानुसार काही स्पंदन लहरी शुध्द आहेत तर बऱ्याच अंशी अशुध्द आहेत, तर या व्यक्तीच्या मनात नेहमी चांगल्या वाईट विचारांचा गोंधळ उडालेला असेल, तो क्षणात भावुक बनेल तर क्षणात क्रोधी बनेलम्हणून प्राचीन ऋषींनी मानवांना ईश्वर भक्ती म्हणजे नामस्मरण, स्तोत्र पठण,ग्रंथ वाचन, ध्यान, चिंतन व संत सहवास करण्याचा आग्रह केलेला आहे.
या गोष्टींनी आपली स्पंदने शुध्द होत असतात, आपल्यातील दोष निघून जाऊ लागतात व आपण शुध्द पवित्र बनतो. प्रसन्नता, सदगुण, सदविचार यांची प्राप्ती होते.श्रीसदगुरु भक्ताची अशुध्द स्पंदने (पाप व दु:खे) खेचून घेत असतात म्हणून श्रीसदगुरुंच्या सहवासाची आस धरावी.नामस्मरणामुळे परमशांती मिळते.
निरंतर नामस्मणामुळे कुळाची परंपरा शुध्द होते. नामस्मरण करण्यासाठी विशिष्ट काळ-वेळेचे बंधन नाही. नामाचे महात्म्य इतके अपूर्व आहे की,नाम उच्चारणारा व ते ऎकणारा दोघेही उध्दरून जातात. भक्ताचे सर्व दोष हरणकरुन नाम त्याला दोष मुक्त करते, म्हणून जड- जीवांना तारणारे नामस्मरणच आहे.