फलटण- कांदा-मुळा-भजी, अवघी विठाई माझी’, असे म्हणत कामाला प्रतिष्ठा देणारे आणि कामातून देव शोधण्याचे काम संत सावता माळी यांनी केले. अगदी यालाच अनुसरून माउलींच्या पालखी सोहळ्यात दमलेल्या वारकऱ्यांना फिजिओथेरपीचा उपचार देऊन त्यांच्यात ऊर्जा निर्माण करण्याचे काम फलटण येथील डॉ. तेजल नितीन खाडे यांनी केले. पालखी सोहळा फलटण नगरीत विसावल्यानंतर तेजल व त्यांच्या सहकाऱ्यांनी वारकरी थांबलेल्या ठिकाणी पालखी तळावर, निर्मलादेवी हायस्कूल याठिकाणी वारकऱ्यांना फिजिओथेरपी दिली.
पाठ दुखी, मणके दुखी, पाय दुखत होते, कोणाच्या टाचा तर कोणाचे गुडघे दुखत होते. या सगळ्या बाबींचा विचार करून डॉ. तेजल यांनी वारकऱ्यांचा पुढील प्रवास सुखकर व्हावा, त्यांच्यातील ऊर्जा कायम राहावी यासाठी त्यांना अत्याधुनिक मशनरीद्वारे तसेच विविध व्यायामाद्वारे त्यांच्यावर उपचार केले. डॉ. तेजल खाडे व त्यांच्या सहकाऱ्यांनी केलेल्या या उपक्रमाबद्दल वारकऱ्यांनी त्यांचे कौतूक केले.