फलटण – सातारा येथे झालेल्या दिशा समितीच्या बैठकीत फलटण तालुका काँग्रेसचे अध्यक्ष महेंद्र सूर्यवंशी बेडके यांनी फलटण तालुक्यातील विविध प्रश्न सोडवण्याची जोरदार मागणी केली.
सातारा येथे माढा लोकसभा खासदार धैर्यशील मोहिते पाटील यांच्या अध्यक्षतेखाली जिल्हा विकास समन्वय व संनियंत्रण समिती (दिशा) ची बैठक झाली या बैठकीत केंद्र सरकारच्या विविध योजनांचा सविस्तर आढावा घेण्यात आला.
यावेळी दिशा समिती सदस्य महेंद्र सुभाषराव सूर्यवंशी (बेडके) यांनी फलटण शहरातील स्व.यशवंतराव चव्हाण साहेब यांच्या पुतळ्याच्या सुशोभीकरण बाबत मुद्दा उपस्थित केला.
फलटण तालुक्यात पासपोर्ट ऑफिस, सुरवडी येथील औद्योगिक वसाहतीत कार्गो लॉजिस्टिक सेवा सुरू करण्याबाबत प्रस्ताव पाठवण्यात यावा, ज्या गावात पोस्ट ऑफिस नाही त्या ठिकाणी नवीन पोस्ट ऑफिस सुरू करण्याबाबत प्रस्ताव त्वरित पाठवावेत,याचबरोबर ग्रामीण भागात मोबाईल नेटवर्क आणि इंटरनेट सुविधा अधिक सक्षम करण्यासाठी BSNL च्या अधिकाऱ्यांना तातडीने उपाययोजना कराव्यात, ज्ञानेश्वर महाराज पालखी महामार्ग, जलजीवन प्रकल्पाच्या संबंधित काही सूचना मांडल्या तसेच फलटण तालुका क्रीडा संकुल बंद अवस्थेत असून तातडीने चालू करावे. फलटण तालुक्यात मुलींसाठी नवीन हॉकीचे मैदान तयार करावे अशी मागणी केली.
बैठकीस राज्यसभा खासदार नितीन पाटील, सातारा जिल्हाधिकारी, जि.प. मुख्याधिकारी तसेच विविध विभागांचे वरिष्ठ अधिकारी व निमंत्रित सदस्य उपस्थित होते.