फलटण – उषःकाल प्रतिष्ठान,फलटण आयोजित कै सौ उषा. दाणी विभुते यांच्या स्मृती प्रित्यर्थ उषःकाल सन्मान पुरस्कार सोहळा 2025 चे सोमवार दि. 23 जून रोजी सकाळी 10.30 वाजता नवलबाई मंगल कार्यालय येथे होणार आहे.
यावेळी माऊली फाउंडेशनच्या वतीने करण्यात आलेल्या विविध सामाजिक कार्याबद्दल मुंबई उच्च न्यायालयातील विधीतज्ञ ॲड विश्वनाथ टाळकुटे, शेतीपूरक उद्योग बांबू लागवड प्रचार आणि प्रसाराबद्दल हेमंत बेडेकर यांचा सन्मान भाजपचे प्रदेश सरचिटणीस राजेश पांडे यांच्या हस्ते करण्यात येणार आहे. यावेळी शोधक संशोधक धनश्री बेडेकर , प्रसिद्ध अस्थिरोगतज्ञडॉ प्रसाद जोशी उपस्थित राहणार आहेत.
अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेच्या फलटण शाखेच्या मार्गदर्शक कार्यकर्त्या व परिषदेच्या माजी महाराष्ट्र प्रदेश उपाध्यक्षा कै. सौ. उषा दाणी-विभुते यांच्या स्मरणार्थ ‘उषःकाल प्रतिष्ठान’ च्या वतीने दरवर्षी शैक्षणिक, सामाजिक व सांस्कृतिक चळवळीतील एका मान्यवर व्यक्तीस ‘उषःकाल सन्मान’ पुरस्काराने सन्मानीत करण्यात येते. रोख रक्कम, सन्मानचिन्ह, शाल व श्रीफळ असे या पुरस्काराचे स्वरूप आहे.
कै. सौ.उषा दाणी-विभुते या मुधोजी हायस्कूल, फलटण च्या विद्यर्थीनी होत्या. तेथेच त्यांना शिक्षिका होण्याची संधी मिळाली तद्नंतर त्याच संस्थेत त्या प्राचार्यपदी सेवा करून निवृत्त झाल्या. त्यांनी अनेक विद्यार्थ्यांना सामाजिक बांधिलकीचे शिक्षण, विद्यार्थी परिषदेसारख्या संघटनेच्या माध्यमातून दिले. त्यांचे अनेक विद्यार्थी आज उच्च पदस्थ डॉक्टर, वकील ही पदे भुषवित आहेत.
विद्यार्थी परिषद, लायनेस क्लब ऑफ, फलटण, विज्ञान शिक्षक संघ आणि ब्राह्मण संघटना अशा विविध माध्यमातून दाणी बाईनी सामाजिक कार्य केले होते. सामाजिक बांधीलकी त्यांनी आयुष्यभर त्यांनी जोपासली होती. कुठलेही काम त्यांनी फळाची अपेक्षा न करता केले. नोकरीमध्ये असताना पगार किती आहे याचा विचार त्यांनी केला नाही. विद्यार्थी तयार करणे हेच त्यांचे ध्येय होते. निवृत्ती नंतरही त्यांनी सामाजिक कामामध्ये सहभाग घेतला होता. काही वेळा त्या आजारी असताना सुध्दा एखादी व्यक्ती सल्ला विचारण्यास आल्यास दाणी बाईना त्रास होत असताना सुध्दा त्यांनी प्रकृतीची काळजी न करता त्यास योग्य सल्ला दिला होता.
विद्यार्थी चळवळीतून तयार झालेले श्रीपाद विभुते, संजय श्रीखंडे, संजय चिटणीस, संजय पालकर, जयंत सहस्त्रबुद्धे, रविंद्र फडतरे, हेमंत रानडे, मकरंद लेले, ॲड. बाळ पंडीत, प्रा.श्रीकांत काशिकर, डॉ. प्रसाद जोशी, मंगेश दोशी, आणि सौ. मृदुहासिनी भिडे, सौ. धरित्री जोशी यांनी एकत्र येवून या प्रतिष्ठानची स्थापना केलेली आहे.
दिनांक २३ जून २०१६ रोजी त्यांचे दुःखद निधन झाले. त्यांच्या विद्यार्थांनी, हितचिंतकानी व कुटुंबियांनी एकत्रित येऊत त्यांच्या नांवाने सामाजिक उपक्रम राबविण्यासाठी ‘उषःकाल प्रतिष्ठान’ची स्थापना केली. या माध्यमातून आजवर डॉ. माधवराव पोळ (आर्ट ऑफ लिव्हींग मधील उल्लेखनिय कार्य), डॉ. अविनाश, पोळ, (पाणी फौंडशनचे कार्यातील विशेष सहभाग), डॉ. प्रियदर्शिनी कर्वे (अपारंपारीक उर्जा क्षेत्रातील संशोधन व विकास कार्य) आणि मा.अरूण करमरकर (पत्रकारीकेतील उल्लेखनिय कार्य) आणि अंजलीताई देशपांडे, पुणे (महिला सबलीकरण) यांना सन्मानीत करण्यात आले.
गत वर्षीचा पुरस्कार ॲड विश्वनाथ टाळकुटे आणि या वर्षीचा पुरस्कार डॉ हेमंत बेडेकर यांना देण्यात येणार आहे.