Uncategorized

राजर्षी शाहू महाराजांनी सामाजिक समतेचा पाया रचला – दादासाहेब सोनवणे ; दलित स्वयंसेवक संघ आणि अण्णा भाऊ साठे स्मारक संस्थेच्या वतीने आदरांजली

पुणे :-राजर्षी छत्रपती शाहू महाराज हे दूरदृष्टीचे, समाजोद्धारक आणि खऱ्या अर्थाने लोकनेते होते. त्यांना फक्त ५० वर्षांचे आयुष्य लाभले. परंतु त्यांनी सामाजिक न्याय, शिक्षण, खेळ, शेती आणि औद्योगिक विकास यांसारख्या क्षेत्रात अमूल्य योगदान दिले. त्यामुळे कर्तव्यदक्ष लोकराजा, पराक्रमी राजयोगी, रसिक कलेचा आश्रदाता, बहुजनांचा आधार, कुशल व्यवस्थापक म्हणून त्यांची जगाच्या इतिहासात नोंद आहे. त्यांनी शिक्षण, सिंचन, उद्योग, आरोग्य याद्वारे जनतेच्या प्रगतीचा पाया रचला. त्यांना नवी दिशा दाखविली. महाराष्ट्रासह देशाच्या भूमीवर त्यांच्या कर्तृत्वाची मुद्रा आजही कायम आहे. कारण, त्यांनी उपेक्षित, वंचित घटकांना माणूसपणाची वागणूक देऊन समतेचा पाया अधिक भक्कम केला, असे प्रतिपादन दलित स्वयंसेवक संघाचे माजी संघप्रमुख तथा जेष्ठ सामाजिक कार्यकर्ते दादासाहेब सोनवणे यांनी केले.

पुणे शहरातील नेहरू स्टेडियम येथील साहित्यरत्न अण्णा भाऊ साठे ग्रंथालयात राजर्षी शाहू महाराज यांची जयंती साजरी करण्यात आली. त्यावेळी उपस्थितांना मार्गदर्शन करताना ते बोलत होते. त्यांनी आपल्या भाषणात शाहू महाराजांच्या शैक्षणिक व सामाजिक कार्याचे महत्त्व आधोरेखित करताना युवा पिढीने त्यांच्यापासून प्रेरणा घेण्याचे आवाहन केले. याप्रसंगी राजर्षी शाहू महाराजांसह डॉ.बाबासाहेब आंबेडकर आणि साहित्यरत्न अण्णा भाऊ साठे यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले. कार्यक्रमाचे औचित्य साधून पुणे जिल्हा मातंग समाजाचे सचिव तथा युवा ह.भ.प.सनी डाडर यांनी राजर्षी शाहू महाराजांचा वैज्ञानिक दृष्टीकोन मांडणारा अभंग सादर करून अभिवादन केले. दलित स्वयंसेवक संघ आणि अण्णा भाऊ साठे स्मारक संस्थेच्या वतीने या अभिवादन कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.

पुढे बोलताना दादासाहेब सोनवणे म्हणाले की, राजर्षी छत्रपती शाहू महाराज हे केवळ शिक्षणाचे समर्थक नव्हते. त्यांनी खेळांनाही पाठिंबा दिला. कुस्ती हा त्यांच्या आवडत्या खेळांपैकी एक होता आणि त्यांनी त्यांच्या कारकिर्दीत या खेळाला पाठिंबा दिला. तसेच त्यांनी भारतातील पहिले आरक्षण धोरण सुरू केले होते ज्याचा उद्देश दलित, दलित समुदायांना फायदा व्हावा आणि त्यांचे उत्थान व्हावे यासाठी होता. २६ जुलै १९०२ रोजी त्यांनी आपल्या राज्यातील शैक्षणिक संस्थांमध्ये आणि सरकारी नोकऱ्यांमध्ये दलित आणि इतर मागासवर्गीय समुदायांसाठी (ओबीसी) ५०% आरक्षण लागू केले. त्यांची धर्मनिरपेक्षता निर्दोष होती. त्यांनी सर्व धर्म आणि समुदायांसाठी वसतिगृहे उभारली. शाहू महाराजांनी मागास जातींमधील गरीब पण गुणवंत विद्यार्थ्यांसाठी अनेक शिष्यवृत्ती सुरू केल्या. त्यांनी त्यांच्या राज्यात सर्वांसाठी सक्तीचे मोफत प्राथमिक शिक्षण देखील सुरू केले. तसेच दलितांना समाजाच्या मुख्य प्रवाहात सामावून घेण्यासाठी त्यांनी १९२० माणगाव येथे परिषद घेतली होती. त्यामुळे सामाजिक न्याय, समता आणि बंधुत्व हेच शाहू विचारांचे खरे सार होते.

याप्रसंगी युवा व्याख्याते धनंजय झोंबाडे म्हणाले की, राजर्षी शाहू महाराज हे केवळ एक राजा नव्हते, तर समाजसुधारणेचा दीपस्तंभ होते. त्यांनी सामाजिक विषमता, जातीभेद, लिंगभेद आणि अशिक्षा यांविरुद्ध लढा दिला. त्या काळात प्रचलित असलेल्या बालविवाह प्रथेविरुद्ध शाहू महाराजांनी आवाज उठवला. १९१७ साली त्यांनी बालविवाह प्रतिबंधक कायदा लागू केला. या कायद्यामुळे समाजात या अन्यायकारक प्रथेविरुद्ध जनजागृती झाली. तसेच महिलांच्या सन्मानासाठी शाहू महाराजांनी विधवा पुनर्विवाहाला कायदेशीर मान्यता दिली. १२ जुलै १९१९ रोजी त्यांनी ‘आंतरजातीय आणि आंतरधर्मीय विवाह कायदा’ लागू केला. या निर्णयामुळे विधवा महिलांना समाजात पुन्हा स्थान मिळाले आणि त्यांचा आत्मसन्मान वाढला. त्यांच्या कार्यामुळेच महाराष्ट्रात समाजसुधारणेची बीजे रुजली आणि पुढील पिढ्यांना सामाजिक न्यायाची दिशा मिळाली. शाहू महाराजांचे योगदान आजही आपल्याला समानतेचा, शिक्षणाचा आणि सामाजिक न्यायाचा मार्ग दाखवत राहते. त्यामुळे समतेचा दीप प्रज्वलित करणारे, शिक्षणाचा मंत्र देणारे आणि बहुजन समाजाच्या हक्कासाठी अखंड लढा देणारे, सर्वोच्च सामाजिक क्रांतीचे प्रवर्तक, महान समाजसुधारक, आदर्श लोकराजा, समतेचा आणि परिवर्तनाचा योद्धा म्हणूनही त्यांच्याकडे बघितले पाहिजे.

अतिशय उत्साहात संपन्न झालेल्या या अभिवादन कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी दलित स्वयंसेवक संघाचे माजी संघप्रमुख तथा जेष्ठ सामाजिक कार्यकर्ते दादासाहेब सोनवणे, प्रमुख पाहुणे म्हणून युवा व्याख्याते धनंजय झोंबाडे यांच्यासह आरपीआय मातंग आघाडीचे पुणे शहराध्यक्ष विलास पाटोळे, जर्नाधन वाघमारे, दलित स्वयंसेवक संघाचे राज्य प्रवक्ते सुजित रणदिवे, संजय केंचळे, पुणे जिल्हा मातंग समाजाचे सचिव सनी डाडर, ॲड.विशाल लोखंडे, संतोष माने तसेच पदाधिकारी व कार्यकर्ते आदी उपस्थित होते.

चौकट क्रमांक १

…तर राजर्षी शाहूंमुळे महिला सक्षमीकरणाला मोठे पाठबळ मिळाले!

एक राजा, एक प्रशासक आणि एक माणूस म्हणून राजर्षी शाहू महाराज खूप मोठ्या मनाचे व्यक्ती होते. त्यांनी समाजाची गरज ओळखून धोरणे राबवली. सामाजिक समतेची पायवाट बळकट केली. माणसाला माणूस म्हणून ओळख मिळवून दिली. समाजातील विविध घटकांसाठी मोलाचे कार्य केले. तसेच त्यांनी महिलांच्या दर्जा उंचावण्यास प्रोत्साहन दिले आणि महिलांना शिक्षित करण्यासाठी शाळा स्थापन केल्या. त्यांनी महात्मा ज्योतिबा फुले यांचे विचार मांडले, जे त्यांच्या शिकवणीचे पालन करायचे. शाहूजींनी १९१७ मध्ये विधवा पुनर्विवाहाला कायदेशीर मान्यता दिली आणि बालविवाह थांबवण्यासाठी प्रयत्न केले. त्यांनी जाती-अडथळे दूर करण्यासाठी कठोर परिश्रम केले आणि आंतरजातीय विवाहांना प्रोत्साहन दिले. त्यांनी देवदासी प्रथा देखील रद्द केली. त्यामुळे महिला सक्षमीकरणाला मोठे पाठबळ मिळाले, असेही युवा व्याख्याते धनंजय झोंबाडे यांनी स्पष्ट केले.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button