पुणे :-
समाजाचे कायदेविषयक अज्ञान दूर करणे, सर्व प्रकारच्या कायद्याची जनजागृती करणे आणि गरजूंना मोफत कायदेशीर मदत करणे, या तिहेरी हेतूने देशभर कार्यरत असलेल्या नानी पालखीवाला नॅशनल लॉ क्लबच्या वतीने कायदेविषयक मोफत मार्गदर्शन शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे, अशी माहिती सर्वोच्च न्यायालयाचे प्रसिद्ध विधिज्ञ तथा नानी पालखीवाला नॅशनल लॉ क्लबचे विद्यमान अध्यक्ष ॲड.जयप्रकाश सोमाणी पत्र परिषदेत दिली.
२४ जून रोजी दुपारी ठिक ३ वाजता शहरातील पौड फाटा येथील दशभुजा चौकातील बुट्टे पाटील कॉम्प्लेक्सच्या प्रॅक्टिकल ऐज्युस्कील्स सभागृहात ही कार्यशाळा आयोजित करण्यात आली आहे. या कार्यशाळेत सर्वोच्च न्यायालयाचे अनुभवी विधिज्ञ आणि कायदे क्षेत्रातील अतिशय तज्ज्ञ मंडळी मराठी, हिंदी आणि इंग्रजी या तिन्ही भाषेत मार्गदर्शन करणार आहेत. त्यामध्ये प्रामुख्याने वैवाहिक संबंध, मालमत्ता, औद्योगिक, वारसा हक्क यासह इतरही दिवाणी आणि फौजदारी खटले व प्रकरणे या संदर्भात विस्तृत आणि सखोल मार्गदर्शन केले जाणार आहे. तसेच तालुका व जिल्हा सत्र न्यायालये आणि उच्च व सर्वोच्च न्यायालयांमध्ये प्रलंबित असलेल्या दिवाणी व फौजदारी खटल्यांविषयी सुद्धा सखोल मार्गदर्शन होणार आहे. शिवाय, उपस्थित विधिज्ञ आणि तज्ज्ञांना आपले प्रश्न, अडचणी व समस्या सांगून त्यावर सुध्दा सविस्तर संवाद साधता येईल, असेही ॲड.जयप्रकाश सोमाणी यांनी सांगितले.
प्रसिद्ध भारतीय न्यायशास्त्रज्ञ, अर्थशास्त्रज्ञ आणि घटनातज्ज्ञ यांचे सामाजिक योगदान खूप मोठे आहे. त्यांनी सार्वजनिक जीवनात मोलाचे कार्य केले आहे. तसेच विविध क्षेत्रात आपल्या कार्याचा अमित ठसा उमटवला आहे. शिवाय, सामाजिक बांधिलकी जोपासून आयुष्यभर विविध उपक्रम आणि कार्यक्रम राबविले आहेत. त्यामुळे त्यांच्या विचारांचा आणि कार्याचा वारसा पुढे घेऊन जाण्यासाठी सर्वोच्च न्यायालयाचे प्रसिद्ध अधिवक्ते जयप्रकाश सोमाणी यांच्या विशेष पुढाकाराने २०२२ मध्ये नानी पालखीवाला नॅशनल लॉ क्लबची स्थापन करण्यात आली आहे. या क्लबच्या माध्यमातून आजपर्यंत शंभरहून अधिक मोफत मार्गदर्शन शिबिरे यशस्वीपणे घेण्यात आली आहेत. त्याचा फायदा हजारो नागरिकांना झाला आहे. गरजू घटक आणि कायद्याच्या कचाट्यात नाहकपणे अडकलेल्या नागरिकांना मोफत कायदेशीर मदत करणे, हाच एकमेव उद्देश घेऊन क्लबची स्थापन करण्यात आली आहे. त्यामुळे कल्बचा विस्तार दिवसेंदिवस वाढत असून कार्यक्षेत्र सुद्धा व्यापक होत आहे, याचा आनंद वाटतो, असेही ॲड. जयप्रकाश सोमाणी यांनी स्पष्ट केले.
तरी पुणे शहर व ग्रामीण भागातील गरजू नागरिकांनी तसेच विधी क्षेत्रातील विद्यार्थी, प्राध्यापक, विधिज्ञ आणि तत्सम मंडळींनी या शिबिराचा लाभ घ्यावा. तसेच अधिक माहितीसाठी सीमा रॉय यांच्याशी ९३२२१८८७०१ या क्रमांकावर संपर्क साधावा, असेही आवाहन मुख्य आयोजक ॲड. जयप्रकाश सोमाणी यांनी केले आहे.