पुणे :-शहरासह ग्रामीण भागातील अर्थव्यवस्थेला चालना मिळावी, नागरिकांचे आर्थिक व्यवहार सुरळीत व्हावेत आणि त्यांना बॅकिंग सर्व सेवा व सुविधा एकाच ठिकाणी उपलब्ध व्हाव्यात, या उदात्त हेतूने सासवड येथील संत सोपान काका सहकारी बँकेने मोबाईल बॅंकिंग व्हॅन सुरू केली आहे. त्याचा शुभारंभ येत्या २३ जून रोजी सकाळी ठिक ११ वाजता होणार असून या दर्जेदार व पारदर्शक सेवेमुळे शहरी व ग्रामीण भागातील ग्राहकांना ‘अच्छे दिन’ येणार असल्याची माहिती पुरंदर-हवेलीचे माजी आमदार संजय जगताप यांनी पत्रकार परिषदेत दिली.
वाढत्या तंत्रज्ञानाच्या काळात ग्राहकांना चांगल्या व दर्जेदार सेवा उपलब्ध करून देण्यासाठी बॅंकेने हा प्रयोग राबवला असून विशेषतः ग्रामीण भागातील ग्राहकांना याचा चांगला फायदा होईल. त्यामुळे संचालक मंडळ समाधानी आहे. कारण, ग्राहकांच्या सेवेतच आम्हाला आनंद मिळतो. तसेच त्यांची आर्थिक उन्नती आणि प्रगती व्हावी, यासाठी आम्ही कटीबध्द आहोत. या बॅंकिंग व्हॅनच्या माध्यमातून ग्राहकांना रोख रक्कम काढता आणि भरता येईल. तसेच केवायसी आणि सीकेवायसी सुद्धा अपडेट करता येईल. शिवाय, बचत आणि चालू खाते, मासिक आवर्तन ठेव खाते, मुदत ठेव खातेही त्वरीत काढता येतील. सोबतच पासबुक नोंदीसह सर्व प्रकारच्या प्रिंट सहजपणे उपलब्ध होतील, अशीही माहिती माजी आमदार संजय जगताप यांनी दिली.
ग्रामीण भागातील ग्राहकांना बँकिंग व्यवहारासाठी शहरात येणे फारच जिकिरीचे असते. त्यात त्यांचा प्रवास खर्च आणि वेळ सुद्धा जातो. तसेच जेष्ठ नागरिक, दिव्यांग आणि अबालवृद्धांना अनेक अडचणी येतात. याची बँकेच्या संचालक मंडळाला जाणीव आहे. त्यामुळे तंत्रज्ञानाच्या कौशल्याने ग्राहकांची हित जोपासण्यासाठी बँकेने मोबाईल बँकिंग व्हॅन सुरू केली आहे. बँकेच्या शाखेत दिल्या जाणाऱ्या सर्व सेवा आणि सुविधा त्या व्हॅनमध्ये उपलब्ध असणार आहेत. विशेष म्हणजे कोणत्याही ग्राहकाला त्या व्हॅनद्वारे कर्ज फाईल देखील सादर करता येईल. तसेच कर्जाचे वितरण सुद्धा संबंधित व्हॅनद्वारे केले जाईल, असेही माजी आमदार संजय जगताप यांनी आवर्जून नमूद केले.
ग्राहकांच्या सेवेसाठी तत्पर व कटीबध्द असलेल्या या मोबाईल बॅंकिंग व्हॅनचा शुभारंभ संत सोपानकाका महाराज संस्थान देवस्थानचे मालक, ॲड. गोपाळ गोसावी आणि अध्यक्ष ॲड.त्रिगुण गोसावी यांच्या अध्यक्षतेखाली व श्री ज्ञानेश्वर महाराज संस्थान आळंदी देवस्थानचे अध्यक्ष योगीराज निरंजननाथ, पालखी सोहळा प्रमुख हभप डॉ.भावार्थ देखणे यांच्या शुभहस्ते होणार आहे. याप्रसंगी बँकेचे संस्थापक अध्यक्ष तथा पुरंदर-हवेलीचे माजी आमदार संजय जगताप यांच्यासह
डॉ.प्रवीण दबडगांबकर ॲड.राजेंद्र उमग, लानेश्वर महाराज परमान, राजाभाऊ पवार (अरफळकर), श्रीमंत सरदार उर्जितसिंहराजे शितोळे सरकार, माऊलींचे वंश परंपरागत चोपदार राजाभाऊ चोपदार यांची प्रमुख उपस्थिती असणार आहे. तरी या अभूतपूर्व शुभारंभ सोहळ्यास विविध क्षेत्रातील सर्व मान्यवर, ग्रामस्थ व पत्रकार बांधवांनी आवर्जून उपस्थित रहावे, असे आवाहन बँकेचे अध्यक्ष रमणिकलाल कोठडिया आणि व्यवस्थापन मंडळाचे अध्यक्ष प्रकाश पवार यांनी केले आहे.