पुणे :-लग्न म्हणजे दोन जीवांचे मीलन. दोन कुटुंबांचे नातेसंबंध. मात्र, अलीकडच्या काळात लग्नाला इव्हेंटचे स्वरूप प्राप्त झाले आहे. त्यातून वधू आणि वरांसह त्यांच्या पालकांच्या सुद्धा अपेक्षा कमालीच्या वाढल्या आहेत. त्यामुळे अनेक सामाजिक प्रश्न निर्माण झाले आहेत. एकीकडे अपेक्षा वाढत आहेत. तर दुसरीकडे लग्नाचे वय सुद्धा वाढत आहे. देणे आणि घेणे हा व्यवहार मोठ्या प्रमाणात वाढला आहे. त्यामुळे मातंग समाजाने बदल स्वीकारला पाहिजे. सध्या मुली जास्त शिकलेल्या असल्याने त्यांच्या अपेक्षाही मोठ्या झाल्या आहेत. पालकांनीही मानसिकता बदलायला हवी. अवास्तव अपेक्षा न ठेवता लग्न जमवताना मुला मुलींची उद्यमशीलता पहा, त्यांचे कर्तृत्व, स्वभाव आणि संस्कार पहा, असे मत दलित स्वयंसेवक संघाचे माजी संघप्रमुख तथा जेष्ठ सामाजिक कार्यकर्ते दादासाहेब सोनवणे यांनी व्यक्त केले.
शहरातील नेहरू स्टेडियम येथील दलित स्वयंसेवक संघाच्या मुख्य कार्यालयात आयोजित मातंग समाज राज्यस्तरीय वधू-वर मेळाव्यास मार्गदर्शन करताना ते बोलत होते. याप्रसंगी राज्यभरातील २५६ वधू-वर परिचय मेळावा उत्साहात पार पडला. दलित स्वयंसेवक संघ आणि अण्णा भाऊ साठे स्मारक संस्था यांच्या संयुक्त विद्यमाने हा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. कार्यक्रमाचे औचित्य साधून सर्व वधू-वरांनी आपला संपूर्ण परिचय देऊन उपस्थितांशी मनमोकळा संवाद साधला.
पुढे बोलताना सोनवणे म्हणाले की, सध्याच्या काळात मुलाचे लग्न जुळताना आई- वडिलांची चांगलीच दमछाक होत असून, लग्नाची सुपारी फोडण्याचे भाग्य अजून अनेक तरुणांना मिळालेले नाही. प्रयत्नांची पराकाष्ट करून सुद्धा विवाह जुळत नसल्याने हतबल झालेल्या अनेक तरुणांची वाटचाल वयाच्या चाळीशीकडे होत आहे. त्यातच ग्रामीण भागातील मुलगा नको गं बाई अशी भावना मुलींची असल्यामुळे ग्रामीण भागातील मुलांचे लग्न जुळवणे हा मोठा गंभीर प्रश्न निर्माण होऊ लागला आहे. लग्नाचे वय पार करूही लग्न जुळत नसल्यामुळे अनेक तरुण व्यसनांच्या आहारी जाताना दिसत आहेत. त्यामुळे पालकांची चिंता आणखीनच वाढली आहे. थोरलाच बिगर लग्नाचा राहिल्याने धाकट्याचे देखील वय पुढे सरकत असल्याने तो देखील गुडघ्याला बाशिंग बांधून तयार आहे. बायोडाटा सर्वत्र फिरवूनही योग जुळून येत नसल्याने तरुणांपुढे लग्न करणे हा मोठा प्रश्न निर्माण झाला आहे.
लग्नकार्यासाठी लागणारा सर्व खर्च करतो, पण मुलगी द्या आम्हाला, मनधरणी करून देखील अशी लग्न जुळत नसल्याने मुलांच्या वडिलांची मोठी दमछाक होत आहे. मुलींबरोबरच घरच्या मंडळीच्या देखील अपेक्षा वाढल्यामुळे मुलांच्या लग्नाचा प्रश्न गंभीर झाला आहे. मुलींकडील नातेवाईकाकडे अनेक स्थळे चालून येत आहेत. यंदा मुलीचे लग्न करायचे का, अशी विचारणा केली जात असल्यामुळे मुलीसह माता-पित्यांच्या अपेक्षा वाढल्या आहेत, त्यामुळे लग्न जुळवताना मुलाकडील कुटुंबाला अधिक परिश्रम घ्यावे लागत आहेत. तरुणांची निराशा वाढलेली असतानाच लग्नाचे सरासरी वय आणि मुलींच्या आई-वडिलांची बदललेली मानसिकता, यामुळे दिवसेंदिवस ही समस्या अधिकच गंभीर बनत चालली आहे. लग्नासाठी मुलगी मिळत नाही, म्हणून तरूणांचे मानसिक खच्चीकरण होऊ लागले आहे, असेही कार्यक्रमाचे अध्यक्ष अनंतराव भिसे यांनी स्पष्ट केले.
पूर्वी मुला-मुलींचे लग्न जुळवण्यासाठी काही लोकांचा हातखंडा होता. मुला- मुलींचे लग्न जुळवण्यासाठी अशा लोकांच्या कानावर घातल्यानंतरही लग्न जुळवणारी ठराविक मंडळी आपल्या कल्पकतेतून मूला मूलींसाठी स्थळ शोधायची आणि लग्न जुळून आणायची, परंतु हल्लीच्या प्री-वेडिंगच्या जमान्यामध्ये लग्न जुळवणाऱ्यांनी देखील मी या भानगडीत नाही. असे म्हणत कानाला हात लावले असल्याचे चित्र सर्वत्र दिसत आहे, असे वास्तव संघप्रमुख राजाभाऊ धडे यांनी मांडले.
यावेळी कार्यक्रमाचे अध्यक्ष अनंतराव भिसे, प्रमुख मार्गदर्शक माजी संघप्रमुख दादासाहेब सोनवणे, संघप्रमुख राजाभाऊ धडे, माजी संघप्रमुख सोपान चव्हाण, कार्याध्यक्ष विजयकुमार कांबळे, महासचिव संजय केंदळे, डॉ.नारायण डोलारे, कलावती तुपसुंदर, अण्णा शेंडगे, लक्ष्मण लोंढे, संतोष माने, बाळशिराम पाटोळे, सुजित रणदिवे, शामराव चंदनशिवे, राजाभाऊ दोडके, युवा इतिहास संशोधक प्रा.सुहास नाईक, विजय कांबळे आणि अनंत भिसे यांच्यासह शेकडो वधू-वर, पालक तसेच समाजातील प्रमुख पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.
चौकट क्रमांक १
…तर प्री-वेडिंग सुद्धा झाली नकोशी!
मुला-मुलीच्या लग्नकार्याचा मोठेपणा मिरवण्यासाठी अनेकांकडून मोठा खर्च केला जातो. त्यातच प्री-वेडिंग सारखा नवा पॅटर्न पुढे आला असून, सावधान म्हणण्यापूर्वी स्क्रीनवर दाखवली जाणारी प्री-वेडिंग उपस्थितांसाठी नकोशी नकोशी ठरत ठरत आहे. प्री-वेडिंगच्या शूटिंग नंतर अनेक मूला-मुलींचे लग्न सुध्दा मोडली आहेत. त्यामुळे प्री-वेडिंगचा बडेजावपणा काहींच्या अंगलट देखील आला आहे, असाही अनुभव दादासाहेब सोनवणे यांनी मांडून उपस्थित पालकांना काही सल्ला व कानमंत्र दिला.