स्थानिक

फलटणमध्ये पालखी मार्गाची दुरावस्था, प्रशासनाकडून टंगळमंगळ: मंत्री,अधिकारी यांचे पाहणीचे निव्वळ फोटोसेशन, प्रांताधिकारी कोठेच दिसेना, पॅचवर्कची कामे पण निकृष्ट

फलटण – श्री संत ज्ञानेश्वर महाराज पालखी सोहळा तोंडावर आला असताना सुद्धा फलटण शहरांमध्ये रस्त्यांची बिकट अवस्था असून मंत्री व वरिष्ठ अधिकाऱ्यांचा पाहणी दौरा निव्वळ फोटोसेशन दौरा झाला आहे. पालखी मार्गाच्या दुरुस्तीसाठी, स्वच्छतेसाठी प्रशासन टंगळमंगळ करत असून रस्त्याच्या पॅचवर्क आणि दुरुस्तीमध्ये सुद्धा भ्रष्टाचार होत आहे.रस्त्यावर कसेतरी पॅचवर्क केल्याचे दिसत आहेत.  प्रांताधिकारी ऑन फिल्ड कोठेच दिसत नसल्याने यावर्षी प्रशासनाच्या निष्क्रियतेमुळे पालखीची वाट खडतर दिसत आहे. 

फलटण शहराला ऐतिहासिक व पौराणिक महत्त्व असून या ठिकाणी अनेक प्राचीन मंदिरे व ऐतिहासिक वास्तू आहेत त्या प्रमाणात शहराची निगा राखणे गरजेचे आहे.पण काहीच होत नाही . त्याचप्रमाणे दरवर्षी श्री संत ज्ञानेश्वर महाराज पालखी सोहळ्याचे आगमन फलटणमध्ये होत असते या सोहळ्यासाठी प्रशासन जंगी तयारी करत असतात स्वतः प्रांताधिकारी, तहसीलदार ,गटविकास अधिकारी, नगरपालिकेचे मुख्याधिकारी व इतर खात्याचे अधिकारी रस्त्यावर उतरून सोयी सुविधांचा चांगला आढावा घेत असतात. नागरिकांच्या सूचना ऐकून कार्यवाही करतात.प्रशासनाला गती देण्याचे काम प्रांताधिकारी यांचे असते मात्र सध्याचे प्रांताधिकारी एखादा मंत्री किंवा अधिकारी आला तरच त्यांच्या भोवती दिसत असून ऑन फील्ड कामांच्या पाहणीसाठी दिसतच नाहीत अशा प्रतिक्रिया नागरिकांमधून उमटत आहेत.त्यामुळे खालील अधिकारी सुद्धा कसेतरी जबाबदारी पार पाडण्याचा प्रयत्न करत असल्याने फलटण शहरांमधील पालखी मार्गाची अत्यंत वाईट आणि दयनीय अवस्था झालेली आहे. 

   पालखी मार्गासाठी माजी खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर यांनी मोठ्या प्रमाणात निधी आणला पालखी मार्ग चांगला व्हावा रस्त्याची कामे चांगली व्हावी ही त्यांची भावना मात्र ही कामे झाली उशिरा सुरू याच्यावर देखभाल करण्यासाठी प्रशासनाला लक्ष देता येईनासे झाले कामे लांबली तरी अधिकारी वर्ग लक्ष  देत नव्हते त्यामुळे नियोजन नीट झालेले नाही. सध्या अनेक ठिकाणी रस्त्यांची कामे अर्धवटच असून ज्या ठिकाणी पॅचवर्क ची कामे केली आहेत ती कामे सुद्धा निकृष्ट झालेली आहेत.रस्त्यांचे डांबरीकरण चांगले झालेले नसल्याने पुन्हा खड्ड्यांचे साम्राज्य दिसू लागलेले आहेत. ज्या मार्गावरून पालखी येणार आहे त्या मार्गावर प्रचंड खड्डे आजूबाजूला घाणीचे साम्राज्य व अस्वच्छता दिसून येत आहे. पालखी सोहळा आठ दिवसावर आला तरी यामध्ये कधी सुधारणा होणार असा प्रश्न नागरिकांमधून उपस्थित होत आहे. 

   फलटण शहरात पिण्याच्या पाण्याचा खेळ अनेक महिन्यांपासून सुरू असून अनेक भागात अद्यापही नीट पाणीपुरवठा होत नाही तसेच काही वेळा अस्वच्छ पाणी येत असल्याने अनेकांना विविध आजार जडत आहे. काही सखल भागात पाणी साचून राहत असून तेथे मच्छर वाढलेले आहेत. शहरात पालखी सोहळ्याच्या निमित्ताने लाखोंच्या संख्येने भाविक येतात अनेकांच्या घरी जेवणासाठी जातात त्यामुळे त्यांना चांगल्या सुविधा देणे आवश्यक आहे. मात्र यावर्षी प्रशासनच ढिम्म झालेले असल्याने सोयी सुविधाचा अभाव दिसत आहे. 

 पालखीच्या पार्श्वभूमीवर ग्रामविकास मंत्री जयकुमार गोरे, विभागीय आयुक्त, जिल्हाधिकारी, जिल्हा पोलीस प्रमुख यांनी दौरे केले.सूचना केल्या मात्र यांचे दौरे सध्याची परिस्थिती बघता निवळ फोटोसेशनपुरतेच मर्यादित होते की काय अशी शंका आता नागरिकांना येऊ लागली आहे.

माजी खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर आणि आमदार सचिन पाटील यांनी पालखी मार्गासंदर्भात कडक सूचनाही केल्या होत्या.सोहळा प्रमुखांनी पण सूचना केल्या होत्या मात्र त्यांच्या सूचनांचे पण पालन झाल्याचे दिसत नाहीत त्यामुळे आ.सचिन पाटील यांनी आता कडक भूमिका घेण्याची गरज आहे

यापूर्वी पालखी सोहळ्याच्या निमित्ताने कार्यक्षम प्रांताधिकारी असलेले सचिन ढोले हे ऑन द स्पॉट उतरून पाहणी करत होते.नागरिकांमधून, पत्रकारांकडून ज्या सूचना येतील त्याची दखल घेऊन सुधारणा करत होते तसेच कामाप्रती त्यांची निष्ठा असल्याने ते जनतेमध्ये लोकप्रिय होते त्यांची बदली झाल्यानंतर त्यांच्या जागी आलेल्या नूतन प्रांताधिकारी यांना अद्याप आपली छाप पडता आलेली नाही. अनेकांना प्रांताधिकारी कोण आहेत हेच माहिती पडेनासे झाले आहे. प्रांताधिकारी ऍक्टिव्ह मोडमध्ये नसल्याने खालचे अधिकारी सुद्धा गांभीर्याने लक्ष देईनासे झाले आहे. त्यामुळे पालखी सोहळा आठवड्यावर आला तरी सोयी सुविधांचा अभाव दिसत असल्याने पालखी मार्गाची वाट शहरात बिकट दिसत आहे.

पालखी सोहळा कित्येक वर्षापासून फलटण मध्ये येत असतो मात्र आ.सचिन पाटील यांच्या आमदारकीच्या काळात प्रथमच सोहळा येत असल्याने या सोहळ्याचे जंगी स्वागत होण्याबरोबरच भाविकांची कोणतीही गैरसोय होणार नाही यासाठी आता स्वतः आ.सचिन पाटील यांनी कडक भूमिका घेऊन प्रशासनाला समज देण्याची गरज आहे अशी अपेक्षा नागरिकांमधून व्यक्त होत आहे.

 

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button