फलटण : गेली ३० वर्षे अहोरात्र मेहनत घेऊन शेतकरी व सर्वसामान्य माणसाचे सुख, शांती, समाधानासाठी निर्माण केलेल्या संस्कृतीवर आलेले संकट राजकीय नाही, तथापि संस्कृती संपविणारे हे संकट दूर करण्यासाठी साथ करा, घाबरु नका आम्ही तिघे भाऊ तुमच्या समवेत आहोत असा विश्वास आ. श्रीमंत रामराजे नाईक निंबाळकर यांनी सर्वसामान्यांना दिला आहे.
कृषी उत्पन्न बाजार समिती फलटणच्या नियोजित तरडगाव उप बाजार आवारात बाजार समितीच्या कृषी देव पेट्रोलियम योजनेतील १२ पैकी ५ व्या पेट्रोल पंपाचे उद्घाटन आणि राष्ट्रीय कृषी विकास योजनेतून मंजूर असलेल्या एक हजार मे. टन साठवणूक क्षमतेच्या गोदाम बांधकामाचा शुभारंभ आ. श्रीमंत रामराजे नाईक निंबाळकर यांच्या हस्ते समारंभपूर्वक करण्यात आला, त्यानंतर उपस्थितांना मार्गदर्शन करताना ते बोलत होते. यावेळी माजी आमदार दिपकराव चव्हाण, सातारा जिल्हा परिषद माजी अध्यक्ष श्रीमंत संजीवराजे नाईक निंबाळकर, कृषी उत्पन्न बाजार समिती फलटणचे चेअरमन श्रीमंत रघुनाथराजे नाईक निंबाळकर, व्हा. चेअरमन भगवानराव होळकर व संचालक मंडळ, महाराष्ट्र राज्य कृषी पणन मंडळ कोल्हापूर विभाग उपसरव्यवस्थापक डॉ. सुभाष घुले, बाजार समिती सचिव शंकरराव सोनवलकर व त्यांचे सहकारी अधिकारी, कर्मचारी, माजी सभापती वसंतराव गायकवाड व शंकरराव माडकर, प्रा. भीमदेव बुरुंगले यांच्यासह तालुक्यातील विविध संस्थांचे पदाधिकारी आणि शेतकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

*पक्ष कोणता,* *राजकारणाची दिशा कोणती हे माझ्यावर सोडा*
घाबरणारे कार्यकर्ते असतील तर यापुढे राजकारण होणार नाही, प्रत्येकाने आपले गाव ताब्यात ठेवले, तेथील मतदान व्यवस्थित करुन घेतले तर राजकारण अवघड नाही, पक्ष कोणता, राजकारणाची दिशा कोणती हे माझ्यावर सोडा, गाव सांभाळा मग विजय आपलाच असेल आणि दिशा योग्यच असेल याची ग्वाही आ. श्रीमंत रामराजे नाईक निंबाळकर यांनी दिली.
*पाण्यासाठी साथ करेल तो आपला पक्ष हे धोरण यशस्वी झाले*
या तालुक्यातील दुष्काळ कायमचा हटवून संपूर्ण तालुका १०० टक्के बागायत करण्याचे आपले उद्दीष्ट होते, ते आपण पूर्ण केले, आपले भाजपशी भांडण नाही ते या प्रवृत्तीशी असल्याचे स्पष्ट करताना
जो पाण्यासाठी साथ करेल तो आपला पक्ष ही भूमिका घेऊन ३० वर्षे सत्तेचे राजकारण केले, पाणी आणले आणि म्हणून तालुक्यात ५/७ लाख मे. टन असलेला ऊस आज २० लाख मे. टनाहुन अधिक आहे, तालुक्यात असलेले २ साखर कारखाने नीट चालत नव्हते आता ४ ही कारखाने मोठ्या क्षमतेने चालतात, शेतकरी समाधानी आहे आणि हे म्हणतात पाणी बारामतीला दिले, आता हे त्याच बारामतीचे पाय चाटतात असा घणाघात आ. श्रीमंत रामराजे नाईक निंबाळकर यांनी केला.
*इथली गरज भागवून इतराना पाणी द्या*
धरण झाले नसते तर पाणी कोठून आणले असते असा सवाल करीत धरणे झाली, पाणी अडले अगदी नीरा – देवघर सुद्धा पूर्ण झाले, ६६ कि. मी. वाघोशी पर्यंत पाणी आणले, त्यानंतर बंदिस्त पाईप द्वारे पाणी पुढे नेण्याचा निर्णय झाला, त्याची टेंडर्स निघाली यांनी स्थगिती आणली आणि आता पाणी आम्ही आणल्याचे सांगतात, आयत्या पिठावर रेघोट्या ओढण्याचे हे काम असल्याचे सांगत आपला विदर्भ, मराठवाडा किंवा अन्य जिल्ह्यात पाणी देण्याला विरोध नाही पण इथले पाणी इतरत्र देताना इथली गरज अगोदर भागविली पाहिजे ही आपली भूमिका असल्याचे आ. श्रीमंत रामराजे नाईक निंबाळकर यांनी स्पष्ट केले.
*अखेरपर्यंत* *लोकहितासाठी काम करणार*
आपण अखेरपर्यंत तालुक्याच्या हितासाठी, इथल्या सर्वसामान्यांसाठी काम करणार, तीच शिकवण आपले आजोबा श्रीमंत मालोजीराजे राजेसाहेब आणि नंतरच्या पिढीने दिली असल्याने त्या प्रमाणे काम करीत राहणार त्यासाठी बाहेर पडलो असून गावागावात जाऊन लोकसंपर्क वाढवीत आहे जे आपल्यातून गेले त्यांच्या मागे किती लोकमत आहे हे आगामी निवडणुकांमध्ये स्पष्ट होईल असे मत ही आ. श्रीमंत रामराजे यांनी व्यक्त केले.
*बाजार समितीला शुभेच्छा*
श्रीमंत रघुनाथराजे आणि त्यांचे सहकारी बाजार समिती उत्तम प्रकारे चालवित आहेत, तरडगाव आणि बरड उप बाजार आवार त्यांच्या कर्तृत्वाला अधिक गती देतील अशी अपेक्षा व्यक्त करीत आ. श्रीमंत रामराजे यांनी बाजार समितीच्या लोकाभिमुख कामकाजासाठी शुभेच्छा दिल्या.
*शेतकऱ्यांच्या जीवनात कायापालट घडविणाऱ्या योजना राबविल्या*
कृषी उत्पन्न बाजार समिती फलटणने श्रीमंत रघुनाथराजे नाईक निंबाळकर यांच्या नेतृत्वाखाली गेल्या १७ वर्षात त्यांचे निर्धारित काम तर केलेच पण त्या पलिकडे जाऊन शेतकऱ्यांच्या जीवनात क्रांती घडवून त्यांचे जीवन अधिक समृद्ध कसे होईल, त्यांच्या जीवनात कायापालट कसा होईल हे उद्दीष्ट समोर ठेवून काम केले, हॉस्पिटल, पेट्रोल पंप, शेतमाल साठवणूक गोदाम व तारण कर्ज योजना आणि आता थ्री स्टार हॉटेल सुरु करण्याचा निर्णय घेऊन एकेका योजनेतून उत्पन्न वाढ आणि वाढलेल्या उत्पन्नातून शेतकऱ्यांना सुविधा यासाठी केलेले यशस्वी प्रयत्न निश्चित कौतुकास्पद असल्याचे गौरवोदगार माजी आमदार दिपक चव्हाण यांनी व्यक्त केले.
*आगामी काळात फलटण बाजार समिती पहिल्या १० मध्ये असेल*
केंद्र व राज्य शासनाच्या विविध योजना प्रभावी रीतीने राबवून त्याचा लाभ जास्तीत जास्त शेतकऱ्यांना मिळाला पाहिजे यासाठी प्रयत्नशील असलेली फलटण बाजार समिती आगामी काळात राज्यातील ३०५ बाजार समित्यांमध्ये पहिल्या १० मध्ये असेल असा विश्वास महाराष्ट्र राज्य कृषी पणन मंडळ उप सरव्यवस्थापक डॉ. सुभाष घुले यांनी व्यक्त केला.
*बाजार समितीने कौतुकास्पद काम केले* गेल्या १६/१७ वर्षात श्रीमंत रघुनाथराजे व त्यांच्या संचालक मंडळाने बाजार समिती स्थापनेचा मूळ उद्देश पूर्ण करुन उपलब्ध अधिकच्या उत्पन्नातून शेतकरी, व्यापारी, हमाल, मापाडी वगैरे विविध घटकांच्या हिताला प्राधान्य देवून राबविलेल्या योजना निश्चित उपयुक्त आणि फलदायी ठरल्याचे आवर्जून सांगत श्रीमंत संजीवराजे नाईक निंबाळकर यांनी बाजार समिती संचालक मंडळ व अधिकाऱ्यांचे कौतुक केले.
*मुख्य रस्त्यावरील जागेमुळे नामी संधी मिळाली*
स्व. के. टी. गायकवाड यांनी आळंदी – पंढरपूर – मोहोळ राष्ट्रीय महामार्गावर (पालखी महामार्ग) जागा उपलब्ध करुन दिल्याने बाजार समितीला एक नामी संधी उपलब्ध झाली असून येथे पेट्रोल पंप, थ्री – स्टार हॉटेल, शेतमाल साठवणूक गोदाम, जनावरे व कांदा बाजार सुरु केल्याने शेतकऱ्यांची सोय करताना बाजार समितीचे वाढते उत्पन्न शेतकरी योजनांसाठी राबविण्याची योजना कौतुकास्पद असल्याचे मत श्रीमंत संजीवराजे नाईक निंबाळकर यांनी व्यक्त केले.
*गाई खरेदीसाठी पंजाब बंगलोर नव्हे फलटण*
येथील दूध उत्पादक शेतकऱ्यांना गोविंदच्या माध्यमातून सुरु असलेल्या गोवंश सुधार योजनेतून उपलब्ध दर्जेदार गाई खरेदीसाठी कृषी उत्पन्न बाजार समिती फलटण मुख्य बाजार आवारात सुरु होत असलेल्या जनावरे बाजार उपयुक्त ठरेल आणि म्हणून आता चांगल्या गाई खरेदीसाठी पंजाब किंवा बंगलोर येथे जाण्याची गरज राहिली नसल्याचे श्रीमंत रघुनाथराजे नाईक निंबाळकर यांनी निदर्शनास आणून दिले.
*भाड्याच्या उत्पन्नात बाधा पोहोचविणारे शत्रू*
तरडगाव व बरड उप बाजार आवारात लवकरच कांदा, शेळी मेंढी बाजार सुरु करण्याची ग्वाही देत बाजार समितीला कोणतेही शासकीय अनुदान नसल्याने शेतकरी हिताच्या योजना राबविण्यासाठी समितीच्या मालकीच्या इमारतीचे भाडे हे उत्पन्नाचे एकमेव साधन असल्याने त्यामध्ये बाधा पोहोचविणारे शेतकरी विरोधी असल्याचे स्पष्ट प्रतिपादन श्रीमंत रघुनाथराजे नाईक निंबाळकर यांनी केले.
प्रारंभी बाजार समितीचे उपसभापती भगवानराव होळकर यांनी सर्व उपस्थितांचे स्वागत व मान्यवरांचे सत्कार केल्यानंतर सचिव शंकरराव सोनवलकर यांनी प्रास्ताविकात बाजार समितीच्या कामकाजाचा आढावा सादर केला.
चौकट :
*कृषी उत्पन्न बाजार समिती ५ वा पेट्रोल पंप सोमवार दि. २३ रोजी सुरु झाला, पहिल्याच दिवशी ६०५.३४ लिटर पेट्रोल आणि २०८७.२१ लिटर डिझेल विक्रीतून ३ लाख ४ हजार ८३७ रुपयांची भरीव विक्री झाली.*
*कृषीदेव पेट्रोलियम योजनेंतर्गत एकूण १२ पेट्रोल पंप तालुक्याच्या विविध भागात मंजूर असून त्यापैकी ५ सुरु झाले आहेत. अगोदरच्या ४ पंपातून गतवर्षी बाजार समितीने ३२ लाख रुपयांचा नफा मिळविला आहे.*
Back to top button
