फलटण – विडणी (तालुका फलटण ) गावामध्ये थेट नळाद्वारे पाणीपुरवठा गेल्या पाच ते सहा दिवसापासून बंद असून तातडीने येथे शासकीय टँकर सुरू करावेत अशी मागणी फलटण तालुका काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष आणि दिशा समितीचे सदस्य महेंद्र सूर्यवंशी बेडके यांनी तहसीलदार व गटविकास अधिकारी यांच्याकडे निवेदनाद्वारे केली आहे.
विडणी (तालुका फलटण) येथे पाणीपुरवठा योजनेमध्ये पावसाचे गढूळ आणि अस्वच्छ पाणी शिरल्यामुळे पाणी स्वच्छ करण्यासाठी गावातील पाणीपुरवठा तात्पुरता बंद ठेवण्यात आलेला आहे. तात्पुरत्या स्वरूपात खाजगी टँकरची व्यवस्था करण्यात आली असली तरी हे पाणी लोकांना पुरेनासे झाले आहे. विडणी गाव मोठ्या लोकसंख्येचे गाव आहे. अनेक ठिकाणी पाण्याची मागणी वाढत चाललेली आहे. अनेक ग्रामस्थ पाण्याबाबत मागणी करत आहेत.एक ते दोन दिवसात पाणीपुरवठा योजनेमधील पाणी स्वच्छ होण्याची शक्यता आहे. तरीसुद्धा ग्रामस्थांना मुबलक पाणीपुरवठा व्हावा म्हणून तहसीलदार व गटविकास अधिकारी यांनी तातडीने शासकीय टँकर विडणी गावांमध्ये सुरू करावेत आणि नागरिकांना दिलासा द्यावा अशी मागणी महेंद्र सूर्यवंशी बेडके यांनी केली आहे.