लातूर (प्रतिनिधी) :-अरे कसा आहेस. अय्या ओळखलंच नाही. तब्येत काय म्हणतेय. अगं कुठे असतेस. मिस्टर काय करतात. मुले किती आहेत. दहावीनंतर पुढे काय केले. ती आली नाही का. तो कुठे असतो. ती सध्या काय करतेय. नोकरी काय म्हणतेय. भावोजी काय करतात. वहिनी कुठल्या आहेत आणि त्या काय करतात. तुझा व्यवसाय कसा चालला आहे. शेती काय म्हणतेय. गावाकडे आल्यावर कोणी भेटतं का. सध्या काय चाललंय. तुला तो आठवतो का. हा तोच तो. असे एक ना अनेक प्रश्न एकमेकांना विचारत आणि सुख-दुःखाचे प्रसंग एकमेकांना सांगत निलंगा तालुक्यातील मौजे.पानचिंचोली येथील लोकमान्य माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालयाचे माजी विद्यार्थी व निवृत्त शिक्षकांनी तब्बल चोवीस वर्षांनी एकत्र येत आनंदोत्सव साजरा केला. निमित्त होते शाळेच्या २००२ मधील दहावीच्या विद्यार्थ्यांच्या स्नेह मेळाव्याचे. यावेळी सर्वांनी एकमेकांची आस्थेने विचारपूस केली.
शहरातील संजय क्वालिटी रेस्टॉरंट येथे काही माजी विद्यार्थ्यांच्या पुढाकाराने स्नेहमेळाव्याचे आयोजन करण्यात आले होते. नोकरीच्या निमित्ताने विविध ठिकाणी वास्तव्यास असलेले माजी विद्यार्थी आणि लग्न होऊन सासरी गेलेल्या व राज्यातील विविध जिल्ह्यांमध्ये स्थायिक झालेल्या माजी विद्यार्थिनी यांनी आपापल्या गावी असलेल्या शिक्षकांना संपर्क करून हा स्नेहमेळावा आयोजित केला होता. त्यामध्ये लातूर, परभणी, हिंगोली, धाराशिव, छत्रपती संभाजीनगर, अहिल्यानगर, सोलापूर, कोल्हापूर, सांगली, सातारा, मुंबई, नाशिक व पुणे जिल्ह्याच्या परिसरातून सुमारे ७० माजी विद्यार्थी व विद्यार्थिनी आणि २९ शिक्षक सहभागी झाले होते. कार्यक्रमाचे औचित्य साधून उपस्थित सर्व गुरूजनांचा शाल, श्रीफळ, पुष्पगुच्छ आणि सन्मानचिन्ह देऊन येथोच्छित सन्मान करण्यात आला. याप्रसंगी अनेकांनी शाळेसह जीवनातील अनुभव ते आजपर्यंतचा जीवन प्रवास शब्दात उलगडला. तसेच जुन्या आठवणींना उजाळा दिल्याने अनेकजण गहिवरले होते.
‘अशी पाखरे येती… आणि स्मृती ठेवूनी जाती’ या काव्य पंक्ती प्रमाणे शालेय जीवनात अनेक बॅचनी पाचवी ते दहावीपर्यंत एकत्र शिक्षण घेतले. कोणी पुढच्या शिक्षणासाठी, नोकरी किंवा व्यवसायासाठी पुण्या, मुंबईला निघून गेले. तरीही शालेय जीवनातील मित्रांसोबतच्या आठवणी मात्र काढत राहिले. याच जुन्या आठवणींना पुन्हा नव्याने उजाळा देण्यासाठी शाळेच्या माजी विद्यार्थ्यांनी तब्बल २४ वर्षांनी एकत्र येत हा आठवणीपर स्नेहमेळावा आयोजित केला. एक महिना अगोदर बॅचच्या व्हाटसअप ग्रुपवर तारीख ठरवून आपल्या नोकरी, व्यवसायाच्या व्यापातून वेळ काढून कोणी मुंबई, पुणे, सांगली, सातारा, कोल्हापूर जिल्ह्यातून आतुरतेने शाळेत जुन्या विद्यार्थ्यांना भेटण्यासाठी हजर राहिले. प्रारंभी सर्वांनी फेटे बांधून कार्यक्रमाचा आनंद लुटला. तसेच पूर्ण दिवस आनंदात घालवला. यावेळी शालेय जीवनातील शिक्षकांप्रती आदरभाव व्यक्त करुन विद्यार्थ्यांनी ऋणानुबंध अधिक घट्ट केले.
दरम्यान, या दहावीच्या बॅचने केलेल्या उत्कृष्ट स्नेहमेळावा सोशल मीडियावर व्हायरल झाल्यामुळे इतरही बॅचच्या माजी विद्यार्थी स्नेहमेळावा घेण्यासाठी प्रवृत्त झाले आहेत. यावेळी कार्यक्रमाचे अध्यक्ष श्रीरंग सोमानी, शिक्षक रामराव देगुरे, रमेश मोरे, रामकिशन भंडारे, दिलीप वाघमारे, कारभारी कराड, प्रभावती साळुंके, ज्ञानोबा साबणे, व्यंकट काळे, उर्मिला जाधव, उमाकांत कुलकर्णी, लता काळगे, श्रीमंत जाधव, शिवाजी जाधव, विक्रम पाटील, वैजनाथ स्वामी, सुभाष जोशी, अनंत दिवे पाटील, प्रमोदकुमार वाघ, आमपटेल पठाण, किसनराव दळवे तसेच शिक्षकेत्तर कर्मचारी अयुब शेख, संजय दिवे, पांडुरंग कांबळे, चांदपाशा सय्यद, माधव भांडेकरी यांच्यासह माजी विद्यार्थी व विद्यार्थिनी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
चौकट क्रमांक १
जुन्या मित्र-मैत्रिणींच्या भेटीसाठी यांनी घेतला पुढाकार!
काही वर्षांपूर्वी माजी विद्यार्थ्यांनी व्हाटसअप ग्रुप काढला. यामध्ये जवळपास सर्व माजी विद्यार्थी सामील झाले. या माध्यमातून संवाद साधत होते. एकमेकांच्या सुख दुःखात सोबत होते. परंतु नोकरीच्या, व्यवसायाच्या व्यापामुळे स्नेहमेळाव्याचे नियोजन होत नव्हते. यावर्षी एक महिना अगोदर तारीख ठरवून सर्वांनी एकत्र भेटायचे ठरवले. त्यामुळे बाळासाहेब पाटील, रफिक पठाण, आनंद दिवे, कैलास (काका) पाटील, शार्दुल साळुंके, राम काळे, बळीराम जाधव, रमेश जाधव, संगीता सूर्यवंशी, हेमा हणमंते, दीपा सूर्यवंशी, पुष्पा जाधव, निखत शेख आणि दिलशाद शेख यांनी पुढाकार घेतला. परिणामी, तब्बल २४ वर्षांनी त्याच जुन्या मित्र-मैत्रिणींना भेटण्याचा योग आला.
चौकट क्रमांक २
विद्यार्थ्यांची भावुक मनोगते, सन्मानामुळे शिक्षक भारावले!
शिक्षकांचे मार्गदर्शन आणि उत्तम ज्ञानदानामुळे हे सर्व विद्यार्थी उद्योग-धंदा, सामाजिक, शैक्षणिक, राजकीय, शेती, शासकीय, खासगी कंपन्यांमध्ये सेवारत आहेत. तसेच आपापल्या क्षेत्रात यशस्वी झाले आहेत. त्यांच्या जडणघडणीत महत्त्वपूर्ण योगदान असल्याने शिक्षकांचा सन्मान यावेळी करण्यात आला. त्यामुळे शिक्षक सुद्धा अगदी भरावून गेले होते.
चौकट क्रमांक ३
…तर गुलाब जामुनाने आणली भोजनात रंगत, गोड झाली पंगत!
स्नेहमेळाव्याच्या निमित्ताने सर्वांसाठी गरमागरम पुरी, पनीर, भजी, जिरा राईस, पापड आणि स्वीटमध्ये गुलाब जामुन असे स्वादिष्ट व रूचकर भोजणाची व्यवस्था करण्यात आली होती. त्यामुळे मनोगते व्यक्त करताना पाणावलेल्या डोळ्यांना गुलाब जामुनाच्या गोडव्याने दिलासा दिला. परिणामी, सर्वांना गुलाब जामुनांचा भरपेट आस्वाद घेतला. त्यामुळे गुलाब जामुनाने आणली भोजनात रंगत, गोड झाली पंगत! असे बाळासाहेब पाटील यांनी म्हणताच त्यांना सर्वांनी हसून दाद दिली.