महाराष्ट्र
सातारा जिल्ह्याला चार मंत्री पण एकाची पण होईना फलटण मध्ये एन्ट्री
फलटण तालुक्यात अतिवृष्टीने नुकसान झाले असताना जिल्ह्यातील चारही मंत्र्यांनी पाठ फिरवून तालुक्याचा केला अपमान

फलटण(नसीर शिकलगार) – अतिवृष्टीमुळे फलटण तालुक्यात प्रचंड नुकसान होऊन पण एकाही मंत्र्याला पाहणीं दौरा करण्याची फुरसत मिळेनाशी झाली आहे.”सातारा जिल्ह्याला चार मंत्री पण एकाची पण होईना फलटण मध्ये एन्ट्री” अशी अवस्था असून अडचणीच्या काळात जिल्ह्यातील चारही मंत्र्यांनी पाठ फिरवल्याने तालुक्याचा अपमान झाल्याच्या भावना जनतेतून व्यक्त होत आहेत.
फलटण तालुक्यात झालेल्या अतिवृष्टीमुळे तालुक्याचे प्रचंड मोठे नुकसान झाले आहे. अनेक घरात आणि शेतात अद्यापही पाणी असून अनेकांचे संसार उघड्यावर पडलेले आहेत. फलटण तालुक्याची जी वार्षिक सरासरी आहे त्या सरासरीचा पाऊस तीन दिवसातच मे महिन्यात पडल्याने तालुक्यातील अनेक रस्ते, पूल वाहून गेले आहेत. शेती पिकाचे मोठे नुकसान झाले रस्त्यांची बिकट अवस्था झाली आहे.फलटण पूर्व भागात तर प्रचंड नुकसान झाले आहे. संपूर्ण सातारा जिल्ह्यात फलटण तालुक्यात प्रचंड अतिवृष्टी झाल्याने झालेल्या नुकसानीची पाहणी करण्यासाठी मंत्र्यांनी येणे गरजेचे होते मात्र एकही मंत्री फिरकेनासा झाला आहे. कधी नव्हे एवढे चार मंत्री सातारा जिल्ह्याला यावेळी मिळालेले आहे त्यामुळे जिल्ह्याचा विकासाचा वारू प्रचंड वेगाने धावेल,अडचणीच्या वेळी मंत्री पाठीशी उभे राहतील असे लोकांना वाटत होते. मात्र अडचणीच्या काळात एकही मंत्री मदतीला धावेनासा झाला आहे.
सातारा जिल्ह्याला पालकमंत्री म्हणून पर्यटन मंत्री शंभूराज देसाई, सार्वजनिक बांधकाम मंत्री म्हणून शिवेंद्रराजे भोसले, ग्रामविकास मंत्री म्हणून जयकुमार गोरे आणि मदत पुनर्वसन मंत्री म्हणून मकरंद पाटील ही चार मंत्रिपद आहेत. चारही मंत्रीपदे तोला मोलाची आणि महत्त्वाची आहेत आणि जनतेशी निगडित आहेत.मात्र मोठे नुकसान होऊन चार दिवस उलटून सुद्धा या चार पैकी एकाही मंत्र्याला दौरा करण्याची गरज भासलेली नाही. चारही मंत्र्यांनी खरे तर तातडीने येणे गरजेचे होते.नाही त्या वेळेस फिरकतात गरजेच्या वेळेस येत नाहीत अशी स्थिती आहे. अडचणीच्या काळात त्यांनी पाठ फिरवून फलटण तालुक्यातील जनतेचा घोर अपमान केला आहे अशा प्रतिक्रिया आता जनतेतून उमटत आहेत.
दुसरीकडे मंत्र्यांवर विसंबून न राहता फलटण तालुक्यातील सर्व गटाच्या नेते मंडळींनी आपापल्या कार्यकर्त्यांसहित आपतग्रस्त जनतेला दिलासा देण्याचे चांगले काम केले आहे. प्रत्येक गावापर्यंत जाण्याचा प्रयत्न नेतेमंडळी करीत आहेत व आपापल्या परीने मदत सुद्धा करत आहे. तालुक्यातील नेतेमंडळींबद्दल जनतेतून चांगल्या प्रतिक्रिया उमटत आहेत या नेते मंडळींना मंत्र्यांनी साथ देणे गरजेचे होते मात्र मंत्र्यांनी पाठ फिरवल्याने जनतेतून नाराजी व्यक्त होत आहे.
या मंत्र्यांसंदर्भात ‘वरुण राजा कोपला, संसार माझा उघड्यावर पडला, ढिगभर मंत्री असूनही आधार नाही त्यांचा साधा’ अशा भावना व्यक्त होत आहे.