Uncategorized

फलटण नगरपालिकेत प्रशासकीय राजवट की इंग्रज राजवट

काही अधिकारी वर्गाचे टक्केवारी कडे लक्ष,रस्ते,पाणी,आरोग्यकडे दुर्लक्ष नागरिक संतप्त

फलटण (नसीर शिकलगार)- फलटण नगरपालिकेच्या कारभारावर सर्वसामान्य जनतेकडून नाराजी व्यक्त होत असून नगरपालिकेवर प्रशासकीय राजवट आहे की इंग्रज राजवट आहे असा प्रश्न निर्माण होत आहे. प्रशासनाकडून टक्केवारीकडे लक्ष देताना रस्ते पाणी आरोग्य याकडे दुर्लक्ष होत आहे. नागरिकाबरोबर सर्वच राजकीय नेतेमंडळी नाराजी व्यक्त करत असल्याने प्रशासकांनी आत्मचिंतन करण्याची गरज आहे.

    फलटण नगरपालिकेचा कारभार कधी नव्हे ते एवढा चव्हाट्यावर आला असून सर्वसामान्य नागरिक या कारभाराला वैतागलेले आहेत. फलटण नगरपालिकेवर गेल्या तीन वर्षापासून प्रशासकीय राजवट आहे. मागील काही नगरसेवकांच्या नाही त्या उचापतीमुळे नागरिक वैतागले होते त्यामुळे प्रशासकीय राजवटीत चांगला कारभार होईल अशी आशा नागरिकांना होती मात्र गत दीड दोन वर्षातील शासकीय कारभार पाहता नागरिकांचा हिरमोड झाला आहे. प्रशासक नगरपालिकेत बसले तर ठराविक जण त्यांचे केबिन मध्ये येऊन वारंवार बसतात. त्यामुळे प्रशासक पण वैतागून बाहेर राहणे पसंद करत असल्याचे बोलले जात असले तरी सुध्दा कार्यालयीन कामकाज वेळेत उपस्थित राहणे आवश्यक आहे.रिकामटेकडे येऊन कोण बसत असतील तर त्यांना समज देण्याचे काम पण त्यांचे आहे.

फलटण नगरपालिकेत सध्या कोणाचाच कोणाला मेळ बसेनासा झाला आहे.नागरिकांच्या रस्ते आरोग्य संदर्भात तक्रारी असतात फोन केला तर काही अधिकारी फोनच उचलत नाहीत. प्रत्यक्ष जाऊन भेटले तर करतो बघतो अशी उत्तर दिले जातात काही वेळा कामे केली जातात, काही वेळा दुर्लक्ष केले जाते. नागरिकांना हेलपाटे मारायला लावले जातात. फलटण शहरात पिण्याच्या पाण्याची टंचाई गंभीर झाली असून अनेक भागात दूषित पाणी येत आहे. काही भागात कमी दाबाने पाणी येत असल्याच्या तक्रारी वाढल्या आहेत मात्र या तक्रारीच्या दखल घ्यायला वेळ मिळेनासा झाला आहे. 

सध्याचे प्रशासक तथा मुख्याधिकारी हे नगरपालिकेत क्वचितच दिसतात. मुख्याधिकारी हे महत्त्वाचे पद असल्याने त्यांच्यासाठी स्वतंत्र निवासस्थान आहे मात्र या निवासस्थानी सध्याचे प्रशासक राहतच नाहीत नगरपालिकेत सुद्धा भेटत नसल्याच्या तक्रारी वाढलेल्या आहे. नगरपालिकेत कमी मात्र एका कॅफेमध्ये बसून कारभार हाकण्याच्या चर्चा नागरिकांमध्ये आहे. अनेक वेळा ठेकेदार अनेक अधिकाऱ्यांबरोबर बराच वेळ बसलेले दिसून येतात कामे मिळवण्यासाठी काही ठेकेदार टक्केवारी सुद्धा देत असल्याचे बोलले जात आहे.

नगरपालिकेच्या घरपट्टी बाबत नागरिकांमध्ये पूर्णतः नाराजी आहे मात्र याकडे दुर्लक्ष करून जबरदस्तीने घरपट्टी वसुली केली जात आहे. मागील आठवड्यात झालेल्या अतिवृष्टीमुळे फलटण शहराचे प्रचंड नुकसान झाले आहे पाण्याच्या पाईपलाईन तुटल्या असून सर्वत्र घाणीचे साम्राज्य निर्माण झाले आहे अनेक ठिकाणचे रस्ते उखडले असून अतिक्रमणामुळे अनेकांच्या घरात पाणी शिरले आहेत.पंचनामा संदर्भात नागरिकांच्या मोठ्या तक्रारी आहेत. अतिवृष्टीच्या काळात चांगले काम करून दाखवण्याची संधी त्यांना होती मात्र त्यांनी केवळ शरीराने हजेरी दाखवून पाट्या टाकण्याचे काम केल्याचे नागरिकांमधून केल्याचे बोलले जात आहेत. दैनंदिन समस्या बाबत नागरिकांच्या अनेक तक्रारी आहेत मात्र अधिकारीच उपस्थित राहत नसल्याने भ्रमनिरास झाला आहे त्यामुळे नगरपालिकेत प्रशासकीय राजवट आहे की इंग्रज राजवट अशा नागरिकांमधून प्रतिक्रिया उमटत आहे.आज नागरिक तक्रारी करत असताना सर्वच पक्षाची नेतेमंडळी प्रशासकाच्या कारभारावर बोट ठेवत असल्याने प्रशासकांनी आपले काय चुकते आहे याचे आत्मचिंतन करण्याची गरज आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button