स्थानिक

बाळशास्त्रींना घराघरात पोहचवण्याचा प्रयत्न करु : उदय दूदवडकर पोंभुर्ले येथे स्मृतीदिनानिमित्त बाळशास्त्री जांभेकरांना अभिवादन

फलटण – ‘‘महाराष्ट्र पत्रकार कल्याण निधीने ‘दर्पण’कार आचार्य बाळशास्त्री जांभेकर यांच्या स्मरणकार्याची गेली ३५ वर्षे जोपासलेली चळवळ अभिमानास्पद आहे. परंतू ही चळवळ पत्रकारांपूर्ती मर्यादित आहे असे वाटते. इथून पुढच्या काळात विद्यार्थी व पालक वर्ग यांच्या माध्यमातून बाळशास्त्रींना घराघरात पोहचवण्याचा आपण महाराष्ट्र पत्रकार कल्याण निधीच्या सहकार्याने प्रयत्न करु’’, अशी अपेक्षा तळेरे पंचक्रोशी पत्रकार संघाचे अध्यक्ष तथा ज्येष्ठ पत्रकार उदय दूदवडकर यांनी व्यक्त केली.

महाराष्ट्र पत्रकार कल्याण निधीच्यावतीने पोंभुर्ले (ता.देवगड, जि.सिंधुदुर्ग) येथील ‘दर्पण’ सभागृहात मराठी वृत्तपत्रसृष्टीचे जनक ‘दर्पण’कार आचार्य बाळशास्त्री जांभेकर यांच्या १७९ व्या पुण्यतिथीनिमित्त (दि. १७ मे) उदय दूदवडकर यांच्या हस्ते अभिवादन करण्यात आले. त्यावेळी ते बोलत होते. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी महाराष्ट्र पत्रकार कल्याण निधीचे अध्यक्ष रविंद्र बेडकिहाळ होते. तर प्रमुख पाहुणे गुरुकुल करिअर अ‍ॅकॅडमीचे प्रमुख बाजीराव जांभेकर उपस्थित होते. यावेळी व्यासपीठावर सेवानिवृत्त जिल्हा माहिती अधिकारी दिलीप घाडगे, ज्येष्ठ कवी व गझलकार सुभाष सरदेशमुख, महाराष्ट्र पत्रकार कल्याण निधीचे कार्यकारी विश्‍वस्त विजय मांडके होते.

‘‘पोंभुर्ले ही बाळशास्त्रींच्यामुळे पावनभूमी आहे. महाराष्ट्र पत्रकार कल्याण निधीच्या इथल्या पहिल्या कार्यक्रमापासून मी या चळवळीत सहभागी आहे. या ‘दर्पण’ सभागृहाच्या व्यासपीठावर एक ना अधिक लोक आले आणि मोठे झाले. परंतू बाळशास्त्रींच्या कार्याची व्याप्ती पाहता त्या तुलनेत आजही ते उपेक्षितच आहेत असे म्हणावे लागेल. विद्यार्थ्यांच्या मार्फत बाळशास्त्री घराघरात पोचवण्यासाठी तरळे पंचक्रोशी पत्रकार संघाने उपक्रम सुरु केले आहेत. महाराष्ट्र पत्रकार कल्याण निधीचे व्यापक कार्य पाहता त्यांनी या उपक्रमांना सहकार्य करावे’’, असे सांगून ‘‘आज मराठी भाषेचा र्‍हास होताना दिसत आहे. लेखक आणि पत्रकार यांनी मराठी भाषा जिवंत ठेवण्याची गरज आहे. लेखकांपेक्षा पत्रकारांचा समाजाशी व्यापक संबंध येतो. त्यामुळे पत्रकारांनी मराठीच्या संवर्धनाचे काम अधिक जबाबदारीने करावे’’, अशी अपेक्षाही उदय दूदवडकर यांनी व्यक्त केली.

उदय दूदवडकर यांच्या अपेक्षेला प्रतिसाद म्हणून अध्यक्षीय भाषणात रविंद्र बेडकिहाळ यांनी, ‘‘बाळशास्त्रींचे कार्य इतके मोठे आहे की केवळ स्मारक उभारणीतून त्यांचे कार्य लोकांपर्यंत पोचणार नाही. तळेरे पंचक्रोशी पत्रकार संघाची सूचना आम्हाला मान्य असून त्यांच्या सहकार्याने महाराष्ट्र पत्रकार कल्याण निधी विद्यार्थ्यांसाठी विविध उपक्रम राबवेल’’, असे सांगून ‘‘आज कॉपी – पेस्ट जर्नालिझमची नवीन प्रथा पत्रकारितेत दिसत असून पत्रकारांना योग्य प्रशिक्षणाची आवश्यकता आहे. पत्रकारिता शिक्षणासाठी उपयुक्त अभ्यासक्रम उभारण्याची गरज आहे. यादृष्टीने पोंभुर्ले परिसरात राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय स्तरावरील वृत्तपत्रविद्या विद्यालय सुरु होण्यासाठी शासनाकडे आमचा पाठपुरावा सुरु आहे. खरं तर हीच बाळशास्त्रींची कृतीशील स्मृती राहील. यासाठी नवीन पिढीकडून प्रयत्न व्हावा’’, असेही बेडकिहाळ यांनी नमूद केले.

दिलीप घाडगे म्हणाले, ‘‘1993 साली आपण पोंभुर्लेला भेट दिली होती. गेल्या 32 वर्षात महाराष्ट्र पत्रकार कल्याण निधीने याठिकाणी उभारलेले बाळशास्त्रींचे स्मारक विलक्षण आहे.’’

बाजीराव जांभेकर म्हणाले, ‘‘बाळशास्त्रींनी प्रबोधनाची चळवळ सुरु केली. त्यांच्यावरील प्रेमापोटीच आपण सर्वजण पोंभुर्लेत येत असता. बाळशास्त्रींचा आदर्श घेवून आपण वाटचाल करुयात हीच त्यांना योग्य श्रद्धांजली ठरेल.’’

सुभाष सरदेशमुख यांनी ‘‘महाराष्ट्र पत्रकार कल्याण निधीचे कार्य अभिमानास्पद आहे’’, असे सांगून ‘निरपेक्ष राहणे जमले नाही मजला’ ही गझल व देशभक्तीपर गीताचे सादरीकरण केले.

कार्यक्रमास सुधाकर जांभेकर, विक्रम जांभेकर, राजेंद्र वाकडे, श्रावणी काँप्युटर्सचे प्रमुख सतीश मदभावे, तळेरे पंचक्रोशी पत्रकार संघाचे निकेत पावसकर, महाराष्ट्र पत्रकार कल्याण निधीच्या विश्‍वस्त सौ. अलका बेडकिहाळ, अमर शेंडे, रोहित वाकडे, सौ.निलम वाकडे यांच्यासह पोंभुर्ले ग्रामस्थ उपस्थित होते.

कार्यक्रमाचे प्रास्ताविक व मान्यवरांचे स्वागत विजय मांडके यांनी केले. आभार अमर शेंडे यांनी मानले.

——————————————————————————————-

फोटो – ‘दर्पण’कार आचार्य बाळशास्त्री जांभेकर यांना अभिवादन करताना उदय दूदवडकर, रविंद्र बेडकिहाळ, बाजीराव जांभेकर, दिलीप घाडगे, सुभाष सरदेशमुख, विजय मांडके, सुधाकर जांभेकर, सतीश मदभावे, सौ. अलका बेडकिहाळ, सौ. निलम वाकडे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button