लोणी काळभोर (प्रतिनिधी):-आजच्या पिढीला पालकांकडून मागेल ते मिळत आहे. पाल्यांच्या गरजा पूर्ण करणे म्हणजे पालकत्व नव्हे. सध्या भौतिक सुविधांपेक्षा चांगल्या संस्काराची गरज आहे. संस्कारानेच आदर्श पिढी घडत असते. आपल्या पाल्यावर संस्कार करणाराच खरा पालक असतो. म्हणून आजच्या युगात केवळ गुणपत्रके महत्त्वाची नाहीत, तर विद्यार्थ्यांनी कौशल्ये विकसित करणे आवश्यक आहे. समाज आणि उद्योग क्षेत्राला उत्तम तंत्रज्ञानाची जाण असलेले तज्ञ हवे आहेत. विद्यार्थ्यांनी नोकरीच्या शोधात वेळ घालवण्याऐवजी स्वतःचा व्यवसाय सुरू करण्यावर भर द्यावा. मोबाईल आणि सोशल मीडियाच्या अतिवापरामुळे विद्यार्थ्यांच्या यशामध्ये अडथळे निर्माण होत आहेत, त्यामुळे वेळेचा योग्य उपयोग करावा. तसेच फक्त एका विषयात पदवी घेऊन भागणार नाही, तर विविध क्षेत्रांमध्ये कौशल्ये आत्मसात करणे आवश्यक आहे. नोकरी मागणारे न होता नोकरी देणारे बना, असे प्रतिपादन श्री स्वामी विवेकानंद शिक्षण संस्थेचे कार्याध्यक्ष प्राचार्य अभयकुमार साळुंखे यांनी व्यक्त केले.
समाजभूषण गणपतराव काळभोर महाविद्यालय येथे आयोजित आंतर महाविद्यालयीन राज्यस्तरीय वक्तृत्व स्पर्धेचे पारितोषिक वितरण प्राचार्य साळुंखे यांच्या शुभहस्ते पार पडले. त्यावेळी ते प्रमुख पाहुणे म्हणून बोलत होते. या भव्य स्पर्धेचे आयोजन तालुका प्रिंट व डीजिटल मीडिया पत्रकार संघ आणि महाविद्यालय यांच्या संयुक्त विद्यमाने करण्यात आले होते. स्पर्धेत राज्यभरातील जवळपास १०० हून अधिक स्पर्धकांनी सहभाग नोंदविला. स्पर्धेत प्रथम क्रमांक सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाचा विद्यार्थी तेजस दिनकर पाटील याने पटकावला. त्याला ५१ हजार रुपयांचे रोख बक्षीस, प्रशस्तीपत्र व चषक देऊन गौरविण्यात आले. द्वितीय क्रमांक पनवेल येथील महात्मा फुले महाविद्यालयाचा विद्यार्थी यश रवींद्र पाटील, तर तृतीय क्रमांक पुण्यातील संस्कार मंदिर कला व वाणिज्य महाविद्यालयाचा विद्यार्थी रोहन ज्योतिराम कवडे याने पटकाविला. या स्पर्धेत उत्तेजनार्थ पारितोषिक कोल्हापूर येथील श्री स्वामी विवेकानंद महाविद्यालयाची विद्यार्थिनी अक्षता शिवाजी घरळ व सातारा येथील लालबहादूर शास्त्री महाविद्यालयाचा विद्यार्थी मिथुन दत्तात्रय माने यांना देण्यात आला.

पुढे बोलताना प्राचार्य साळुंखे म्हणाले की, मनातील भावना स्पष्टपणे व्यक्त करता येणे म्हणजेच उत्तम वक्तृत्व होय. विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी वक्तृत्व खूप महत्वाचे असते. ही गरज ओळखून प्रिंट व डीजिटल मीडिया पत्रकार संघाने राज्यस्तरीय वक्तृत्व स्पर्धा आयोजित केली आहे. त्यामुळे महाविद्यालयीन विद्यार्थ्यांना एक चांगले व्यासपीठ मिळाले आहे. कारण उद्याच्या भारताचे भवितव्य हे याच तरुणांच्या हातात असणार आहे. परिणामी, शिक्षणामुळे डोळसपणा आणि व्यवहारिक ज्ञान मिळाले पाहिजे. त्यातून विद्यार्थ्यांनी करिअरवर लक्ष केंद्रित करून अमर्यादित संधींमध्ये वाटचाल करणे गरजेचे आहे. विद्यार्थ्यांनी सुध्दा आपले करिअर निवडताना भविष्यातील ध्येय निश्चित करून तसेच करिअर गुणांवर न ठरवता आपल्यातील क्षमता ओळखून करिअर ठरवावे. जिद्द, चिकाटी आणि समर्पण या त्रिसूत्रीच्या माध्यमातून विद्यार्थी जीवनात आपले ध्येय गाठू शकतो. परंतु त्यासाठी विद्यार्थ्यांनी भविष्यात आपल्याला काय व्हायचे आहे, हे निश्चित करावे व त्याच्या प्राप्तीसाठी अथक परिश्रम करावे. तसेच विद्यार्थ्यांमध्ये महत्वाकांक्षा असेल तर, आहे त्या परिस्थितीतही ध्येय प्राप्ती करून यशस्वी होता येते.
याप्रसंगी प्रास्ताविक करताना प्राचार्य डॉ.अंबादास मंजुळकर म्हणाले की, मोबाईलपेक्षा पुस्तकात असणाऱ्या ज्ञानाचा स्वतःसाठी आणि मुलांसाठी फायदा करून घेणे चांगले. पालकांनी मुलांच्या भवितव्याचा विचार करून मोबाईल बाजूला ठेवून मुलांना वाचनाची गोडी लावण्याचा प्रयत्न केला पाहिजे. शिवाय विद्यार्थ्यांनी आपली योग्यता, कौशल्य, सामर्थ्य, आवड ओळखून व विविध पर्यायांची माहिती घेऊन करिअर निवडावे. इंजिनिअरिंग व मेडिकल या व्यतिरिक्त करिअरच्या असंख्य शाखा आहेत, त्यांचा ही विद्यार्थ्यांनी करिअर निवडताना विचार करावा. आपल्या गुणवत्तेचा उपयोग समाजसेवेसाठी करावा. तसेच आपले जीवन कृतार्थ ठरण्यासाठी मोठी स्वप्न पहा ध्येय ठरवा. विद्यार्थी जीवन हे अत्यंत सुखकारक असून महाविद्यालयीन काळातले दिवस हे सर्वात उत्कृष्ठ असतात. याच दिवसांमध्ये आपण आपल्या व्यक्तीमत्वामध्ये नैतिकता विकसित करायची असते आणि आयुष्यभर ती जपायची सुध्दा असते. विद्यार्थी दशेतूनच पुढे चालून डॉक्टर, इंजिनिअर, आयपीएस, आयएएस आणि राजकारणी तयार होतात. मात्र, या क्षेत्रातून येणारे व्यक्ती इमानदार असेल, तर ते क्षेत्र चांगले अन्यथा वाईट ठरते. त्यामुळे आपापल्या क्षेत्रात काम करताना प्रत्येकाने आपली नैतिकता पाळाली पाहिजे.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक प्राचार्य डॉ.अंबादास मंजुळकर यांनी, तर सूत्रसंचालन शाहीर महेश खुळपे यांनी केले. आभार संदीप बोडके यांनी आभार मानले. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी लोणी काळभोरचे सरपंच भरत काळभोर होते. यावेळी कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती दिलीप काळभोर, स्थानिक शिक्षण सल्लागार मंडळाचे अध्यक्ष सुभाष काळभोर, यशवंत सहकारी साखर कारखान्याचे अध्यक्ष सुभाष जगताप, उपाध्यक्ष किशोर उंद्रे, माजी उपाध्यक्ष मोरेश्वर काळे, संचालक संतोष कांचन, सुशांत दरेकर, कुंजीरवाडीचे माजी सरपंच सचिन तुपे, एसजीए ग्रुपचे अध्यक्ष शंकर गायकवाड, साधना बँकेच्या संचालिका वंदना काळभोर, राजकुमार काळभोर, अभिनव चेतना नागरी पतसंस्थेचे अध्यक्ष हेमंत हाडके, युवराज काकडे, रूप ज्वेलर्सचे रुपराज काळभोर, प्राचार्य सिताराम गवळी, प्राचार्य अंबादास मंजुळकर, प्राचार्या संजीवनी बोरकर, पौर्णिमा शेवाळे, प्रिंट व डिजिटल मीडिया पत्रकार संघाचे राज्याध्यक्ष सुनील जगताप, कार्याध्यक्ष जनार्दन दांडगे, जिल्हाध्यक्ष राजेंद्र काळभोर आदी मान्यवरांसह शिक्षकवृंद, शिक्षकेत्तर कर्मचारी, पत्रकार ग्रामस्थ व विद्यार्थी उपस्थित होते. स्पर्धा यशस्वी करण्यासाठी मुख्य संयोजक प्रा.डॉ.विजयकुमार घोडके, प्रा.परमजित खनोजा, डॉ.स्नेहा बुरगुल, प्रा.सतिश कुदळे, प्रा.सिध्दारूड आयवळे, प्रा.निलिमा हेमाडे, प्रा.सुहास नाईक, प्रा.नितेश महाले यांच्यासह महाविद्यालयीन सर्व प्राध्यापक व शिक्षकेत्तर कर्मचारी तसेच तालुका प्रिंट व डीजिटल मीडिया पत्रकार संघाचे पदाधिकारी यांनी विशेष परिश्रम घेतले.
चौकट क्रमांक १
…तर मुलांना रील्स स्टार बनवयाचे की रिअल स्टार?
तुम्हाला आयुष्यात भलेही काही मोठे होता आले नाही, तरी चालेल पण एक उत्तम नागरिक बना. केवळ वयाने मोठे होऊन चालणार नाही, तर कर्तृत्वाने मोठे व्हावे लागेल. यासाठी पालकांनी मुलांच्या पंखामध्ये संस्काराचे बळ भरावे लागेल. यासाठी आईवडिलांनी जबाबदारी घेतली पाहिजे. कर्णबधिर असणाऱ्या मुलाला एका शाळेने प्रवेश नाकारला. आईने घरी शिक्षण देऊन त्याला जागतील पातळीवरचा शास्त्रज्ञ बनवले, आज सर्वाधिक पेटंट नावावर असलेले बल्बचा शोध लावणारे थॉमस एडिसन हे त्या शास्त्रज्ञांचे नाव आहे. त्यामुळे अफाट संपत्ती कमविण्यापेक्षा संस्कारित संतती घडवा. सुसंस्कारित संतती हीच खरी संपत्ती आहे. त्यामुळे आपल्या मुलांना रील्स स्टार बनवायचे की रिअल स्टार बनवायचे याचे चिंतन रील्स बघणाऱ्या पालकांनी करण्याची आज गरज आहे, असे आवाहन परीक्षक धनंजय झोंबाडे यांनी केले.
चौकट क्रमांक २
…म्हणून विद्यार्थी सुसंस्कृत कसा होईल, हे आजच्या शिक्षकांपुढील आव्हान!
स्पर्धेचे युग दिवसेंदिवस अधिक गतिमान होत आहे. त्यामुळे पालक, विद्यार्थी आणि शिक्षक यांच्यासामोर अनेक प्रश्न निर्माण होत असतात. तरीही विषय शिकविण्यापेक्षा माणूस कसा निर्माण करावा, याकडे विशेष लक्ष देणे काळाची गरज आहे. विद्यार्थी शिक्षित करण्यापेक्षा तो सुसंस्कृत कसा होईल, यादृष्टीने जर सकारात्मक आणि प्रामाणिक प्रयत्न झाले, तर उद्याची पिढी सुसंस्कृत आणि विवेकशील बनेल. त्यामुळे अभ्यासक्रमांच्या पलीकडे जावून विद्यार्थी घडविणे, हे शिक्षक म्हणून आपले कर्तव्य आहे, याचीही आपल्याला कायम जाणीव असायला हवी, असे मत प्राचार्य डॉ.अंबादास मंजुळकर यांनी व्यक्त केले.
चौकट क्रमांक ३
पारदर्शक निकाल, तब्बल १० परीक्षकांनी केले परीक्षण
महाविद्यालयीन युवकांच्या सुप्त गुणांना वाव देण्याच्या उद्देशाने आयोजित ही भव्य स्पर्धा नियोजित आणि उत्स्फूर्त अशा दोन फेरींमध्ये घेण्यात आली. दोन्ही फेरींच्या गुणांची गोळाबेरीज करून अंतिम विजय घोषित करण्यात आले. त्यामुळे स्पर्धेचा निकाल अत्यंत पारदर्शकपणे लागला. यासाठी तब्ब्ल १० तज्ञ परीक्षकांची टीम कार्यरत होती. त्यामध्ये डॉ.बाबा शेख, डॉ.राजेंद्र थोरात, डॉ.जया कदम, डॉ.समीर अबनावे, डॉ.अजितकुमार जाधव, प्रा.शौकत आत्तार, प्रा.संदीप वाकडे, डॉ.राहूल जगदाळे, प्रा.संजय काटकार, प्रा.दिलीप पवार आणि पत्रकार धनंजय झोंबाडे यांचा समावेश होता.
Back to top button
