पुणे: पुण्यात धार्मिक ध्रुवीकरणाला छेद देणारी घटना समोर आली आहे. एका हिंदू महिलेच्या भावाचं निधन झाल्यानंतर एका मुस्लीम व्यक्तीने त्या मृतदेहाला अग्नी दिला. त्याचबरोबर सर्व विधी पार पाडला. याबाबतचा एक व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत असून मुस्लीम व्यक्तीच्या कृतीचं नेटकऱ्यांकडून कौतुक केलं जातं आहे. हिंदू व्यक्तीवर अंत्यसंस्कार करणाऱ्या पुण्यातील जावेद खान यांच्या या कृतीचं सर्वत्र कौतुक होताना दिसत आहे. त्यांचा हा व्हिडिओ सोशल मिडियावर मोठ्या प्रमाणावर व्हायरल झाला आहे. त्याचबरोबर माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंनी देखील जावेद खान यांचं कौतुक केलं आहे.
याबाबत मिळालेल्या माहितीनुसार, पुण्यातील रास्ता पेठ भागात जयश्री किंकळे आणि त्यांचे 70 वर्षीय बंधू सुधीर किंकळे वास्तव्यास आहेत. त्यांना जास्त नातेवाईक नाहीत. भाऊ आणि बहीण दोघेचं एकमेकांच्या सोबत होते. अशातच बुधवारी सायंकाळी सुधीर यांचं निधन झालं. सख्ख्या भावाचं निधन झाल्यानंतर जयश्री यांच्यावर दु:खाचा डोंगर कोसळला. जीवनाचा एकमेव आधार हरवल्याने जयश्री एकट्या पडल्या होत्या. मात्र, त्यांचा एक भाऊ त्यांना सोडून गेला तरी नियतिने त्यांच्या पदरात दोन भाऊ टाकले. मायकेल साठे आणि जावेद खान यांनी जयश्री यांच्या मदतीला धावत, भाऊ सुधीर यांच्या चितेला अग्नी दिला. जावेद खान हे उम्मत सामाजिक संस्थेचे अध्यक्ष आहेत. त्यांनी फेसबूकवर पोस्ट करत याबाबतची सविस्तर माहिती दिली आहे.
जावेद यांनी ‘पवित्र रमजान महिन्यात केलेले पवित्र कार्य’ अशी शीर्षकाने ही पोस्ट लिहिली आहे. त्यात त्यांनी म्हटलं की, ‘काल मला माझे मित्र मायकल साठे यांनी कॉल केला की, त्यांच्या शेजारच्या बिल्डिंग मध्ये राहणारे सुधीर किंकळे (वय : 70 पत्ता 286 रास्ता पेठ , पुणे) हे राहत्या घरी मृत पावले आहेत. त्यांना फक्त त्यांची बहीणच आहे जयश्री किंकळे. त्यांना कोणीही नातेवाईक नाहीत त्यामुळे तुम्ही त्यांचा अंत्यविधी करता का? संपूर्ण माहिती घेऊन मी ससून रुग्णालयातील डेडहाउसमध्ये पोहोचलो. तिथे जयश्री ताई आणि पोलीस हवालदार होळकरसाहेब भेटले. पंचनामा सुरु होता. या कार्यवाहीसाठी संध्याकाळ होणार होती. चौकशी केली असता मृतदेह मिळण्यास रात्र होणार अशी माहिती मिळाली. मी जयश्रीताईंना बोललो आपण अंत्यविधी करुन टाकुयात. पण त्या बोलल्या आम्ही ब्राह्मण आहोत आणि सूर्यास्त झाल्यावर आम्ही अंत्यविधी करत नाही. आपण सकाळी अंत्यविधी करूयात प्लीज. त्यांची विनंती आणि रडणं मला सहन होत नव्हते. रमझान महिना चालू असताना दुसऱ्या दिवशी म्हणजे आज (गुरुवार) आमची सर्वात मोठी रमझान रात्र आणि नमाज माझ्यासाठी मोठा धार्मिक दिवस पण मनात विचार केला की,हे कार्य करण्यासाठी अल्लाहने तुला निवडले असेल कदाचित #जात_धर्म बाजूला ठेऊन सकाळी लवकरच उठलो. आज खूप काम होती, पण सगळी कामं बाजूला ठेऊन ससूनला शुभम आणि शेरू या दोघांना पाठवले. त्यांना अजून एका शुभमची साथ लाभली. मायकल कॉल करत होता त्याला बोललो वैकुंठ येथे पोहोच आणि तिथे आम्ही सगळेच त्या सुधीर काकाचे नातेवाईक झालो आणि त्यांचा अंत्यसंस्कार केले.
उध्दव ठाकरेंनी केला जावेद खान यांना फोन
हिंदू व्यक्तीवर अंत्यसंस्कार करणाऱ्या पुण्यातील जावेद खान यांच्या या कृतीचं उद्धव ठाकरेंनी देखील कौतुक केलं आहे. उद्धव ठाकरेंनी स्वतः फोन करून जावेद खान यांचं कौतुक केला आहे. जावेद खान यांच्या या कार्याचं सर्वत्र कौतुक होत असताना उद्धव ठाकरेंनी देखील स्वतः त्यांना फोन करून त्यांनी खूप चांगलं काम केलं आहे. तुम्हाला दीर्घायुष्य लाभो असं म्हणत कौतुक केलं आहे.
सुषमा अंधारेंचा राणेंना टोला, जावेद खान यांचं केलं कौतुक
सुषमा अंधारेंनी राणेंना टोला लगावत जावेद खान यांच्या या कृतीचं कौतुक केलं आहे. त्यांनी सोशल मिडियावरती याबाबतची पोस्ट शेअर केली आहे. पोस्टमध्ये त्या लिहतात,”नितेश राणे सारखी काही माणसं घसा फोडून हिंदू मुस्लिम करत राहतील. इथली गाव गाड्याची वीण उसवण्याचा प्रयत्न करतील. पण ही माती इतकी कमजोर नाही की अशा फुटीरतावादी प्रयत्नांना खतपाणी घालेल. झाले असे की, 286 रास्ता पेठ पुणे येथील 70 वर्षाचे सुधीर किंकळे हे मृत्यू पावले. घरात फक्त ते आणि त्यांचे बहीण जयश्री किंकळे. त्याही थकलेल्या. अंत्यविधी कोणी करायचे. सायंकाळी इफ्तारीच्या वेळेत ही बातमी जावेदभाई न कळते… काय करावं… नमाज साठी थांबावं की मानवतेचा हा धर्म पाळावा… जावेद भाई थेट डेडबॉडी घेण्यासाठी ससून हॉस्पिटल ला गेले. मात्र आम्ही ब्राह्मण आहोत आणि सूर्यास्ता नंतर अंत्यविधी करता येत नाही असे जयश्रीताई किंकळे यांनी सांगितले. अत्यंत एकाकी पडलेल्या त्या माय माऊलीला रडू कोसळले. जावेदभाई च्या समोरचा प्रश्न की रमजानच्या महिना चालू आहे आणि सकाळी अंत्यविधी करायचे म्हणजे आता सकाळची नमाजही जाणार आहे. परंतु क्षणाचाही न विचार करता जावेद भाईंनी आणि त्यांच्या उमत या सामाजिक संस्थेने दुसऱ्या दिवशी सकाळी च्या अंत्यविधीची सगळी तयारी केली आणि जयश्रीताईंचे कुटुंबीय म्हणून या अंत्यविधीतले हिंदू धर्म पद्धतीनुसार चे सगळे सोपस्कार पार पाडले… जावेद भाई , तुमची बहीण म्हणून मला तुमचा प्रचंड अभिमान आहे…!”.