स्थानिक

आपल्याला चेअरमनपद, संचालकपद काहीही नको केवळ सभासदांचे हित जोपासण्यासाठी श्रीराम कारखाना ताब्यात पाहिजे : रणजितसिंह नाईक निंबाळकर

श्रीराम कारखाना सभासदांच्या मालकीचा ठेऊन स्वबळावर चालविणार

फलटण  : श्रीराम सहकारी साखर कारखाना लि., फलटणच्या संस्थापक सभासदांच्या वारसांसह सर्वच मयत सभासद शेतकऱ्यांच्या वारसांना मतदानाचा हक्क मिळावा आणि हा साखर कारखाना सभासदांच्या माध्यमातून त्यांचे प्रतिनिधी म्हणून निवडून आलेल्या संचालकांनी चालवावा आणि सभासद शेतकऱ्यांना परिसरातील अन्य सहकारी साखर कारखान्यांच्या तुलनेत अधिक ऊस दर द्यावा यासाठी ही लढाई सुरु केली असून त्यामध्ये निश्चित यश मिळेल असा विश्वास माजी खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर यांनी व्यक्त केला आहे.

श्रीराम सहकारी साखर कारखाना लि., फलटणच्या संचालक मंडळ निवडणूक पार्श्वभूमीवर मतदार यादी बाबत निर्माण झालेले वाद तपासून घेण्यासाठी या कारखान्यावर प्रशासक नियुक्त करण्याच्या मागणीला यश आल्यानंतर त्याबाबत माहिती देण्यासाठी आयोजित पत्रकार परिषदेत माजी खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर बोलत होते. यावेळी ज्येष्ठ नेते प्रल्हादराव साळुंखे पाटील, श्रीमंत शिवरुपराजे खर्डेकर, निवृत्त सनदी अधिकारी विश्वासराव भोसले, ॲड. नरसिंह निकम, हणमंतराव मोहिते, स्वराज पतसंस्थेचे चेअरमन अभिजित नाईक निंबाळकर, भाजप जिल्हा सरचिटणीस जयकुमार शिंदे, कृष्णा खोरे विकास महामंडळाचे संचालक माणिकराव सोनवलकर, संतकृपा उद्योग समुहाचे विलासराव नलवडे, माजी पंचायत समिती सदस्य सचिन रणवरे, संजय कापसे यांच्यासह भाजप पदाधिकारी, कार्यकर्ते उपस्थित होते.
श्रीराम सहकारी साखर कारखाना, फलटण तालुका सहकारी दूध पुरवठा संघ, कृषी उत्पन्न बाजार समिती, फलटण तालुका सहकारी खरेदी विक्री संघ, श्रीमंत मालोजीराजे सहकारी बँक वगैरे संस्था लोकांनी विश्वासाने यांच्याकडे सुपूर्द केल्या, गेल्या ३० वर्षात या संस्थांच्या माध्यमातून सभासदाना अधिक लाभ मिळणे अपेक्षित होते, पण त्या ऐवजी सुस्थितीतील या संस्था यांनी संकटात आणल्या, सभासद शेतकऱ्यांना लाभ मिळणे दूरच त्यांचे नुकसान करण्यात या संस्था कार्यरत असतील तर ते थांबवून या संस्था सभासद शेतकऱ्यांच्या तरुण मुलांच्या ताब्यात देऊन त्या माध्यमातून सभासद शेतकऱ्यांसह परिसराचा विकास या संस्थांच्या माध्यमातून झाला पाहिजे ही आपली भूमिका असल्याचे रणजितसिंह नाईक निंबाळकर यांनी स्पष्ट केले.
आपल्याला श्रीराम साखर कारखाना किंवा यापैकी अन्य कोणत्या संस्थेचे चेअरमन, संचालक काही ही नको आहे, केवळ या संस्था लोकांच्या आहेत, त्या लोकांच्या ताब्यात राहिल्या पाहिजेत आणि लोकांसाठी त्या योग्य पद्धतीने कार्यरत राहिल्या पाहिजेत यासाठी आपला प्रयत्न असल्याचे रणजितसिंह नाईक निंबाळकर यांनी आवर्जून सांगितले.
श्रीराम साखर कारखाना आणि जवाहर शेतकरी सहकारी साखर कारखाना या सहकारी संस्थांच्या माध्यमातून निर्माण करण्यात आलेल्या श्रीराम जवाहर शेतकरी सहकारी साखर उद्योग या संस्थेच्या माध्यमातून चालविण्यात येत असल्याचे १५ वर्षे सांगितले, २ सहकारी संस्थांच्या माध्यमातून तिसरी संस्था स्थापण्याचा आणि त्या माध्यमातून श्रीराम चालविण्याचा अभिनव उपक्रम असे सांगण्यात आले, पण प्रत्यक्षात या संस्थेच्या नावे गाळपाचा परवाना नाही, त्या संस्थेचे बँक खाते नाही, हिशेब नाही, ताळेबंद नाही, नफा तोटा पत्रक नाही मग या संस्थेच्या माध्यमातून झालेल्या नफ्याच्या पैशाचे काय किंवा तोटा झाला असेल तर का दाखविला नाही असा सवाल करीत सारेच गौड बंगाल असल्याचा आरोप ॲड. नरसिंह निकम यांनी यावेळी केला.
त्यानंतर आता कल्लाप्पा आण्णा आवाडे जवाहर शेतकरी सहकारी साखर कारखान्याला हा कारखाना चालविण्यास देण्यात आला, पूर्वी प्रति टन १२० रुपये श्रीरामला मिळत असत आता प्रति हंगाम दीड कोटी म्हणजे साधारण प्रति टन ३० रुपये मिळतील असे सांगत म्हणजे अशा व्यवहारात नेहमी होणारी वाढ येथे १२० रुपयांवरुन ३० रुपयांपर्यंत कमी झाली हे न समजणारे गणित असल्याचे ॲड. नरसिंह निकम यांनी निदर्शनास आणून दिले.
आपण सनदी अधिकारी म्हणून प्रशासनात उत्तम काम केले, वखार महामंडळ, शेती महामंडळ या शासकीय संस्था अधिक फायद्यात चालवून दाखविल्या, प्रशासनात अन्य ठिकाणी उत्तम काम केले म्हणून शासनाने आपला गौरव केला, अनेक पुरस्कार दिले असताना उच्च शैक्षणिक गुणवत्ता, सर्वोच्च सत्ता स्थान लाभलेले, राजघराण्यातील हे सन्मानीय गृहस्थ आपल्या गावात येऊन आपल्यावर खालच्या पातळीवर जाऊन टीका करतात हे दुर्दैवी असल्याचे विश्वासराव भोसले यांनी आ. श्रीमत रामराजे यांचे नाव न घेता त्यांच्यावर निशाणा साधला.
श्रीराम कारखाना मतदार यादी बाबत आपण घेतलेले आक्षेप कायद्याचा पूर्ण अभ्यास करुन घेतले असल्याने त्याबाबत आता प्रशासकाच्या माध्यमातून योग्य निर्णय होईल आणि मयत सभासदांच्या वारसांना मतदानाचा हक्क नक्की मिळेल असा विश्वास व्यक्त करताना वास्तविक सभासद अर्जावर नॉमिनी (वारसाचे) नाव नमूद असल्याने सभासद मयत झाल्यानंतर सदर नॉमिनी व्यक्तीस योग्य सूचना देऊन आवश्यक कागद पत्रांची पूर्तता करुन घेऊन सदर शेअर त्यांच्या नावावर ट्रान्स्फर करण्याची जबाबदारी कारखान्याने पार पाडली नसल्याने हा गंभीर प्रश्न निर्माण झाल्याचे विश्वासराव भोसले यांनी निदर्शनास आणून दिले.
आपल्या हातून श्रीरामची सत्ता काढून घेऊन या मंडळींना श्रीराम बंद पाडायचा आहे आणि श्रीराम बंद पडल्यावर यांना मुबलक ऊस हव्या त्या दरात उपलब्ध होईल हे भविष्य सांगण्यापेक्षा गेली २०/२२ वर्षे कारखान्याची अनिर्बंध सत्ता तुमच्याकडे आहे तुम्ही ऊस उत्पादक शेतकऱ्यांना शेजारच्या सोमेश्वर, माळेगाव कारखान्याइतका ऊस दर, त्यांच्या प्रमाणे शैक्षणिक, वैद्यकीय, सामाजिक, सांस्कृतिक सेवा सुविधा का दिल्या नाही असा सवाल श्रीमंत शिवरुपराजे खर्डेकर यांनी उपस्थित केला.
न्यू फलटण शुगर बाबत त्यांनी आकसाने भूमिका घेऊन तो कारखाना बंद पाडल्याचा आरोप करीत वास्तविक जी बँक एन सी एल टी मध्ये गेली त्यांचे कर्ज केवळ १५ कोटी आणि ११५ कोटीची मालमत्ता तारण असताना एन सी एल टी मध्ये जाण्याचे कारण नव्हते मात्र ते जाणीव पूर्वक घडवून आणल्याचा आरोप प्रल्हादराव साळुंखे पाटील यांनी केला.

चौकट : श्रीराम मधील व्यवहार, कारखाना चालवायला देण्याची प्रक्रिया, चुकीचे करार, सत्ता अबाधित ठेवण्यासाठी मतदार यादीत केलेले घोटाळे, मयत वारस डावलने वगैरे सर्व प्रकरणे शोधून काढून, त्याची कायदेशीरपणे मांडणी करणे, न्याय्य बाजू समजावून घेणे ही संपूर्ण प्रकिया निवृत्त सनदी अधिकारी विश्वासराव भोसले, ॲड. नरसिंह निकम यांनी मोठ्या कौशल्य व मेहनतीने गेल्या ६ महिन्यांपासून यशस्वी केल्याने शासनाने निवडणूक स्थगित केली, प्रशासक नियुक्त केला याचे संपूर्ण श्रेय या दोघांचे असल्याचे रणजितसिंह नाईक निंबाळकर यांनी आवर्जून सांगितले.
ही प्रक्रिया शासन स्तरावर पूर्ण करण्यासाठी त्यांना आ. सचिन पाटील आणि श्रीमंत शिवरुपराजे खर्डेकर यांनी मोठी मेहनत घेतल्याचे निदर्शनास आणून देत त्यांचे योगदान मोठे असून आ. सचिन पाटील यांचे सत्तेतील वर्चस्व यावेळी स्पष्ट झाले असल्याचे रणजितसिंह नाईक निंबाळकर यांनी सांगितले.

चौकट : श्रेय कोणाचे हे
सर्वश्रुत आहे. त्यामुळे रणजितसिंह यांना यातून बाहेर पडता येणार नाही तर महायुती पुरस्कृत रणजितसिंह नाईक निंबाळकर पॅनल या नावाने ही निवडणूक लढविण्याची घोषणाच प्रल्हादराव साळुंखे पाटील यांनी केली.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button