स्थानिक

आ. श्रीमंत रामराजे यांना राष्ट्रवादीत कोणाला प्रवेश देण्याचा अधिकार कसा : श्रीमंत शिवरुपराजे खर्डेकर 

    फलटण  : गत विधानसभा निवडणुकीनंतर राष्ट्रवादी काँग्रेस सभासद नोंदणी कार्यक्रम जिल्हा स्तरावर झाला, त्यानंतर जिल्ह्यातील विविध तालुक्यात अध्यक्ष निवडी झाल्या यापैकी कोणत्याही कार्यक्रमांना उपस्थित नसलेल्या आ. श्रीमंत रामराजे नाईक निंबाळकर यांना राष्ट्रवादी पक्षात कोणाला प्रवेश देण्याचा अधिकार कसा असा सवाल राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे फलटण तालुकाध्यक्ष श्रीमंत शिवरुपराजे खर्डेकर यांनी पत्रकार परिषदेत उपस्थित केला आहे.

    राष्ट्रवादीचे आ. सचिन पाटील, श्रीमंत शिवरुपराजे खर्डेकर, राहुल निंबाळकर यांनी आ. सचिन पाटील यांच्या संपर्क कार्यालयात आयोजित पत्रकार परिषदेत विविध विषय ठामपणे मांडून आपली भूमिका स्पष्ट केली. त्यावेळी श्रीमंत शिवरुपराजे बोलत होते.

    फलटण मतदार संघात राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष व उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी महाराष्ट्रात सर्वप्रथम तत्कालीन आमदार दिपक चव्हाण यांना पुन्हा उमेदवारी दिली पण ती नाकारुन तुम्ही त्यांचा एकप्रकारे अपमान केला, आणि आपण राष्ट्रवादीत होता तर त्यावेळी राष्ट्रवादीने दिलेल्या उमेदवाराच्या प्रचारातही आपण सक्रिय झाला नसल्याचे श्रीमंत शिवरुपराजे खर्डेकर यांनी निदर्शनास आणून दिले.

   अजित पवारांचा उमेदवार येथे विजयी होईल याची खात्री नसल्यानेच तिकीट नाकारुन तुम्ही दुसऱ्या पक्षाची उमेदवारी घेऊन अजित पवार यांच्या उमेदवाराला विरोध केला पण अजित पवारांनी त्यांचा उमेदवार निवडून आणल्यानंतर आता तुम्हाला या पक्षात कोणाला प्रवेश कसा देता येईल असा सवाल श्रीमंत शिवरुपराजे खर्डेकर यांनी उपस्थित केला आहे.

    दि. २२ मार्च रोजी डी. एड. चौक फलटण येथे राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष बाळासाहेब सोळसकर, तालुकाध्यक्ष श्रीमंत शिवरुपराजे खर्डेकर, मंत्री मकरंद जाधव पाटील, सातारा जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे अध्यक्ष खा. नितीन जाधव पाटील वगैरे मान्यवरांच्या उपस्थितीत राष्ट्रवादी काँग्रेस सभासद नोंदणी मेळावा आयोजित करण्यात येत असून मोठ्या प्रमाणावर सभासद नोंदणी करण्याचा मनोदय यावेळी आ. सचिन पाटील यांनी व्यक्त केला. 

   आमचे नेते अजित पवार यांनी विश्वासाने उमेदवारी देऊनही त्यांनी ती नाकारली कारण दिपक चव्हाण व त्यांच्या नेत्यांना या मतदार संघात अजित पवारांच्या पक्षाला लोकांचा पाठिंबा मिळेल याची खात्री नसल्याने त्यांनी निर्णय घेतला आणि अजित पवारांच्या उमेदवाराला विरोध केला हे सर्वश्रुत असताना आता ते इतराना या पक्षात प्रवेश देतात हे आश्चर्यजनक असल्याचे आ. सचिन पाटील यांनी स्पष्ट केले.

    काळेश्वर जिनिंग फॅक्टरी बंद पडल्याचा आरोप निराधार असल्याचे सांगत या भागात कापूस पिक प्रचंड असल्याने फलटण, गुणवरे, गोखळी येथे सहकारी ३ आणि फलटण येथे खाजगी ३ अशा ६ जिनिंग फॅक्टरी होत्या, त्या सर्व कापूस पिकावर पडलेल्या रोगाने येथील पीक नामशेष झाल्याने बंद पडल्या ही वस्तुस्थिती असल्याचे स्पष्ट करताना फलटण तालुका सहकारी दूध पुरवठा संघ दूध उपलब्ध असताना बंद का पडला, त्याची जमीन विक्रीस का काढली याचा खुलासा आ. श्रीमंत रामराजे यांनी सर्वप्रथम करावा मग काळेश्वरवर बोलावे अशी मागणी श्रीमंत शिवरुपराजे खर्डेकर यांनी केली.

    श्रीराम सहकारी साखर कारखाना कर्जमुक्त झाला असे सांगताना जवाहरचे १०० कोटींचे देणे असून आगामी १२ वर्षात परत करण्याचे सूत्र कारखान्याचे चेअरमन पत्रकार परिषदेत सांगतात वास्तविक कारखाना कर्ज मुक्त झाल्यानंतर तो ऊस उत्पादक सभासदांच्या प्रतिनिधींनी – संचालकांनी चालवावा ही सभासदांची अपेक्षा असताना तो चालवायला देता हे पटणारे नसल्याचे सांगत जागा, इमारत, मशिनरी सह नवा साखर कारखाना २००/२२५ कोटी मध्ये उभा रहात असताना जवाहरने जुनी मशिनरी आणून केवळ गाळप क्षमता वाढ केली त्याला १०० कोटी खर्च हे सभासदांना पटणारे नसल्याने नवीन मशिनरी आणून तुम्ही संचालक मंडळाने हा कारखाना दिमाखात चालविला असता तर लोकांचा उत्स्फूर्त पाठिंबा मिळाला असता असे स्पष्ट प्रतिपादन श्रीमंत शिवरुपराजे खर्डेकर यांनी केले.

       श्रीराम बंद पडण्याचा कोणाचाही प्रयत्न नाही, म्हणूनच आगामी निवडणूक लढवून सभासदांच्या मालकीचा हा कारखाना सभासदांच्या माध्यमातून चालविण्याचा आमचा प्रयत्न असल्याचे श्रीमंत शिवरुपराजे खर्डेकर यांनी स्पष्ट केले.

    माजी खासदार आमचे नेते रणजितसिंह नाईक निंबाळकर यांनी स्वतःच्या हिमतीवर साखर कारखाना आणि फळ प्रक्रिया उद्योग सुरु केले, तरुणांना रोजगाराच्या संधी दिल्या, या कारखान्यासाठी कर्जे काढली, ती ही स्वतःच्या हिमतीवर काढली असून त्याची परत फेड ही तेच करणार आहेत, आपल्याला करावी लागणार नसल्याचे ठणकावून सांगत आपण व्यक्तिगत टीका टाळावी अन्यथा आम्हालाही उत्तर द्यावे लागेल, आमच्या नेत्यावर टीका आम्ही सहन करणार नाही असा स्पष्ट इशारा आ. सचिन पाटील यांनी यावेळी दिला.

   स्वतःच्या हिमतीवर कर्ज काढून, कारखाने उभारुन ते उत्तम चालवतात, कर्जाची परतफेड करतात आपण असा एकादा कारखाना काढून तो चालवून तरुणांना रोजगाराच्या संधी दिल्या का याचा शोध घ्यावा अशी अपेक्षा आ. सचिन पाटील यांनी यावेळी व्यक्त केली.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button