फलटण – स्वच्छता आणि सुरक्षितता तसेच नैसर्गिक वातावरण जपल्यामुळे फलटण शहरातील माळजाई उद्यान परिसरात आबाळवृद्धांची गर्दी वाढली असून रात्रीच्या वेळेस कौटुंबिक स्नेहभोजन करण्यासाठी गर्दी होत आहे.गप्पाटप्पा होत आहेत.महिला आणि मुलींना येथे सुरक्षित वाटत असल्याने त्यांचेही आवडीचे हे ठिकाण झाले आहे.
फलटणच्या माळजाई परिसरात रात्रीच्या वेळेस प्रचंड गर्दी होत असते लहान मोठे मुले वृद्ध येथे येत असतात. हा परिसर फलटणकरांच्या आवडीचा परिसर आहे. मोठ्या प्रमाणात याचा विस्तार झाल्याने येथे नेहमी गर्दी असते मात्र माळजाई मंदिराच्या आतील माळजाई उद्यानामध्ये पहिल्यांदा ठराविक जणच बसलेले असायचे नवरात्र च्या दिवसात महिलांची गर्दी व्हायची. इतर वेळी उडान टप्पू मुले येथे बसलेले असायचे काहीजण व्यसने करण्यासाठी सुद्धा येत होती. येथील खेळणी सुद्धा तुटलेली होती सर्वत्र घाणीचे साम्राज्य पसरलेले होते.प्रेमी युगलांचा सुळसुळाट वाढला होता.त्याचा त्रास येथे रात्री अभ्यासासाठी येणाऱ्या मुलांना व्हायचा. छेडछाडीचे प्रकार वाढले होते.त्यामुळे माळजाईकडे पाठ फिरवली जाऊ लागली.या परिसरात येणे अनेक जन टाळू लागले.
मात्र या परिसराची धुरा फलटणमधील मोनिका उद्योगाचे प्रमोद निंबाळकर या बांधकाम व्यावसायिकांकडे आल्यानंतर त्यांनी या परिसराचा चेहरा मोहरा बदलण्यासाठी कंबर कसली प्रथमतः येथील सुरक्षितेला प्राधान्य देताना येथे सुरक्षा रक्षक नेमले परिसराची चांगली साफसफाई करून घेतली येथे पुरेसा उजेड असेल याची खबरदारी घेतली. चांगले लॅम्प बसविले.वृक्षारोपण केले त्यामुळे येथील परिसर हिरवागार झालेला आहे. आज येथे स्वच्छता आणि सुरक्षितता योग्यरीत्या दिसून येते त्यामुळे येथे कौटुंबिक छोटे-मोठे कार्यक्रम होऊ लागले असून हा परिसर गजबजू लागला आहे. रात्रीच्या वेळेस अनेक कुटुंब डबे घेऊन येथे जेवणासाठी येत आहेत.हिरवाई पक्षांचा किलबिलाट आणि खारूताईचा वावर सर्वाँना सुखावत आहे.बसण्यासाठी ठिकठिकाणी चांगली व्यवस्था ठेवण्यात आली आहे. शासकीय कामासाठी आलेल्या ग्रामीण भागातील महिला मुली येथे विश्रांतीसाठी थांबत आहेत महिला आणि मुलींसाठी हे सुरक्षित ठिकाण झाल्याने वर्दळ वाढलेली आहे.शालेय मुला मुलींच्या सहली येत आहेत.आत मध्ये खेळण्यासाठी खेळणी दुरुस्त करण्यात आली असून बालचमुंची गर्दी वाढली आहे. छोट्या छोट्या बैठका आणि कार्यक्रम वाढले आहेत.येथे आता फक्त पिण्याच्या पाण्याची सोय होणे गरजेचे आहे.
संपूर्ण परिसराचा चेहरा मोहरा प्रमोद निंबाळकर यांनी त्यांच्या सहकाऱ्यांच्या मदतीने बदललेला आहे.आता या परिसरात पाऊल ठेवल्यानंतर मन प्रसन्न वाटते.या परिसराचा चेहरा मोहरा बदलल्याने फलटणकर नागरिक समाधान व्यक्त करीत आहेत.
Back to top button
