(नसीर शिकलगार) भाग 2
फलटण – पार्किंगच्या समस्येमुळे तसेच न परवडणाऱ्या गाळे भाड्यामुळे रिंग रोड वरील अनेक व्यावसायिक दुसरीकडे आपले व्यवसाय नेत असल्याने अनेक गाळे व फ्लॅट मोकळे पडू लागले आहेत.अनेक बिल्डिंगच्या कामांच्या तक्रारी वाढल्याच्या पार्श्वभूमीवर गाळ्यांचे भाडे आणि फ्लॅटचे दर कमी होणार का? याकडे अनेकांचे लक्ष लागले आहे.
फलटणचे सर्वात वर्दळीचे ठिकाण असलेल्या रिंग रोडची वाहतूक दिवसेंदिवस वाढत असली तरी काही बिल्डरांनी वाढविलेले गाळ्यांचे भाडे आणि फ्लॅटचे किमती यामुळे या रोडवरील अनेकांचे व्यवसाय थंड पडले आहेत. काहींनी दुसरीकडे दुकान थाटून तेथे आपले बस्तान चांगल्या पद्धतीने बसवायला सुरुवात केली आहे. काही बिल्डरांनी पार्किंग साठी जागा व्यवस्थित न सोडल्याने वाहने रस्त्यावर लावावी लागत आहेत. काहींचे गाळे रस्त्यावर आले आहेत अशा विरोधात तक्रारीचा पाढा सुरू आहे त्यामुळे पार्किंगची समस्या ज्यांचे बांधकामे सुरू आहेत त्यांनी जाणून उपाययोजना केल्या पाहिजेत. पार्किंगची बोंब असल्याने जे गाळे विकत किंवा भाड्याने घेत आहेत त्यांनी सुद्धा पुढे कायदेशीर अडचणी निर्माण होऊ शकतात हे जाणून गुंतवणूक केली पाहिजे
याबाबत काल रक्षक रयतेचाने परखड वृत्त प्रसिद्ध केले होते या वृत्ताचे अनेक व्यावसायिकांनी स्वागत केले केले होते तसेच वाढीव भाडे आणि फ्लॅटचेे वाढीव दर पार्किंग समस्या यामुळेच धंदा परवडत नसल्याचे स्पष्ट केले होते. रिंग रोडवरील अनेक बांधकामासंदर्भात तक्रारी असल्याने अनेकजण येथे गुंतवणूक करण्यास तयार होत नाही काही गाळे 30 ते 40 लाख रुपये दराने विक्रीसाठी उपलब्ध आहेत मात्र एवढे पैसे जर बँकेत गुंतवले तर त्याच्या व्याजावर संसार चालू शकतो अशा भावना काही व्यवसायिकांच्या असल्याने एवढी मोठी गुंतवणूक करण्यास कोणी तयार होत नाही.एकीकडे रिंग रोडवर व्यवसाय चालत नसताना दुसरिकडे फलटण बाजारपेठेत सुद्धा काहींनी अवास्तव भाडे आकारणी सुरू केली आहे. डिपॉझिट मध्ये सुद्धा वाढ केली आहे यामुळे बाजारपेठेतील व्यापारी हैरान होत चाललेले आहेत. फलटणच्या बाजारपेठेपेक्षा बारामतीच्या बाजारपेठेत नेहमी वर्दळ दिसत असते.अनेक जण बारामती मध्ये खरेदीसाठी जात असतात फलटणमधील अनेक व्यावसायिकांनी बारामती मध्ये सुद्धा व्यवसाय सुरू केला आहे. फलटणमधील गाळ्यांच्या आणि फ्लॅटचे दर याची बारामतीची तुलना केली असता निश्चितच ते बारामती पेक्षा जास्त असल्याचे दिसते त्यामुळे फलटणच्या बाजारपेठेत रस्त्यावर विक्री करणारे अनेकजण दिसतात आणि त्यांचा धंदा चांगला होतो मात्र ज्यांनी महागडे गाळे कर्ज काढून घेतले त्यांची मुद्दल निघणे सुद्धा काही वेळेस अडचणीचे होते. या काही गोष्टी मध्ये जर सुधारणा झाल्या आणि पार्किंग साठी जागा उपलब्ध झाल्या तर फलटणची बाजारपेठ आणि रिंग रोडवरील व्यवसाय भरभराटीस येऊ शकतो.