छत्रपती संभाजीनगर (औरंगाबाद) :-मुंबई येथे मंत्रालयीन अवर सचिव म्हणून कार्यरत असलेल्या विशाखा आढाव यांनी अल्पसंख्यांक आयुक्तपदाचा कार्यभार नुकताचा स्विकारला आहे. शहरातील हज हाऊस येथील मुख्यालयात त्यांनी पदभार घेतला. त्यामुळे गेली अनेक दिवस रिक्त असलेले ते पद कार्यरत झाले आहे. परिणामी, अल्पसंख्यांक विभागाचा प्रशासकीय कारभार पुन्हा गतिमान होणार असल्याचे म्हटले जात आहे. या विभागातंर्गत अल्पसंख्यांक समाजाच्या सर्वांगीण प्रगतीसाठी सातत्याने नावीन्यपूर्ण उपक्रम राबवले जातात. तसेच विविध योजना आणि उपक्रमांमुळे हा विभाग नेहमी चर्चेत असतो. त्यामुळे आगामी काळात सुध्दा या विभागाचा कारभार अधिक गतिमान व पारदर्शक पध्दतीने होईल, अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे. तसेच विविध संघटना व कार्यकर्त्यांनी त्यांचा सत्कार करून शुभेच्छा दिल्या आहेत.
विशाखा आढाव यांची सन २००९ च्या महाराष्ट्र राज्य लोकसेवा आयोगाच्या सरळसेवेतून कक्ष अधिकारी या पदावर मंत्रालय, मुंबई येथे नियुक्ती झाली होती. त्यांनी ग्रामविकास व जलसंधारण विभाग, सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभाग येथे यशस्वीरित्या सेवा केली आहे. आता त्यांची जलसंपदा विभाग, मंत्रालय मुंबई या विभागात अवर सचिव पदावर पदोन्नती झाली आहे. विशेष प्राविण्यासह एम.ए.बी.एड, पुणे विद्यापीठाची सेट इत्यादी पदव्या प्राप्त केल्या आहेत. तसेच अभ्यासू आणि मितभाषी स्वभावाच्या व्यक्ती म्हणून त्यांची विशेष ख्याती आहे. त्यामुळे अल्पसंख्यांक विभागाच्या आयुक्त पदाचा अतिरिक्त कार्यभार सांभाळून त्या पदाला साजेशी कामगिरी करतील, असा विश्वास त्यांच्या सहकाऱ्यांनी व्यक्त केला आहे. त्या मुळच्या गुणवरे (तालुका फलटण) येथील आहेत.
शासकीय सेवेत कार्यरत असतानाच स्पर्धा परिक्षेचे विनामुल्य मार्गदर्शन, बचत गटातील महिलांसाठी मार्गदर्शनपर व्याख्याने, विविध सामाजिक उपक्रमांमध्ये सातत्याने सहभाग, समाजातील गरजू आणि होतकरू घटकांना मदतीचा आधार, शैक्षणिक उपक्रमांना विशेष सहकार्य, जेष्ठांशी आपुलकीने संवाद, अशा विविध गोष्टींमुळे त्यांची वेगळी ओळख आहे. सध्या त्या अल्पसंख्यांक विकास विभाग, मंत्रालय येथे अवर सचिव म्हणून कार्यरत आहेत. शासना कडून आयुक्तपदाचा अतिरिक्त कार्यभार सोपविण्याचे आदेश काढण्यात आले होते. विशाखा आढाव यांची मंत्रालयातील अत्यंत कर्तबगार, अनुभवी व कार्यक्षम अधिकारी म्हणून ओळख आहेत. या पूर्वी त्यांनी ग्रामविकास,सामान्य प्रशासन, जलसंपदा व समाज कल्याण विभागात कार्य केले. त्यामुळे त्यांना समाजातील अडीअडचणींची चांगलीच जाण आहे. त्यांच्या नियुक्तीमुळे राज्य शासनाकडून अल्पसंख्यांक समाजासाठी राबविण्यात येणाऱ्या योजनांची प्रभावीपणे अंमलबजावणी होईल.
दरम्यान, अल्पसंख्यांक आयुक्तालय स्थापन झाल्यानंतर शासनाकडून एकूण ३६ अधिकारी व कर्मचाऱ्यांची भरतीसाठी मंजुरी मिळाली आहे. त्यावर तातडीने अमलबजावणी व्हावी यासाठी मी प्रयत्न करणार असल्याचे विशाखा आढाव यांनी सांगितले. पद भरती झाल्यास आयुक्तालय पूर्ण क्षमतेने सुरू होईल, अशी अपेक्षाही त्यांनी व्यक्त केली. आज त्यांनी कामकाजाचा आढावा घेतला. यावेळी आयुक्तालयचे सहआयुक्त प्रशांत अंधारे व इतर कर्मचाऱ्यांची उपस्थिती होती.