पुणे – शिस्तबद्ध संचालनामध्ये निकोप स्पर्धा हवी, यासाठी सर्वांनी प्रयत्न करावे आणि खेळाडूंनी खेळाडू होती दाखवावी असे प्रतिपादन दिव्यांग कल्याण आयुक्त प्रवीण पुरी यांनी केले.
समाज कल्याण विभाग, पुणे जिल्हा परिषद, पुणे आयोजित जिल्हास्तरीय दिव्यांग शालेय क्रीडा स्पर्धा सन 2024 – 2025 दोन दिवसीय जिल्हास्तरीय दिव्यांग शालेय क्रीडा स्पर्धेचे उद्घाटन करतांना ते बोलत होते.
कै. बाबुराव सणस क्रिडांगण पुणे येथे संपन्न झालेल्या या कार्यक्रम प्रसंगी चंद्रकांत वाघमारे (अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी), वंदना कोचुरे (प्रादेशिक उपायुक्त), विशाल लोंढे (सहाय्यक आयुक्त समाज कल्याण), राधाकिशन देवढे (जिल्हा समाज कल्याण अधिकारी) आदी मान्यवरांच्या बरोबरच शिक्षक व शिक्षकेत्तर उपस्थित होते. मतिमंद व अस्थिव्यंग व कर्णबधीर प्रवर्गातील ४२० विद्यार्थी-विद्यार्थिनींनी यात सहभाग घेतला. या स्पर्धामध्ये १००- २०० मीटर धावणे, गोळाफेक, लांब उडी यांचा समावेश होता. या प्रसंगी बोलतांना चंद्रकांत वाघमारे यांनी विशेष मुलांच्या कौशल्य विकासासाठी आपल्या कुटुंबापेक्षा जास्त वेळ देणाऱ्या शिक्षक वर्गाचे कौतुक केले. या प्रसंगी राष्ट्रीय पुरस्कार प्राप्त दिव्यांग प्रथमेश सिन्हा व प्रियंका दबडे यांचा विशेष सत्कार मान्यवरांच्या शुभहस्ते करण्यात आला. पुणे अंधशाळा मुलांची कोरेगाव पार्क यांनी स्वागतगीत सादर केले, आधार मुकबधीर विद्यालय यांनी योगा कवायत पिरॅमिड सादर केले. रुईया मूकबधिर विद्यालयाच्या विद्यार्थिनींनी कथ्थक नृत्य सादर केले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन आशिष जराड यांनी केले.