फलटण – फलटण शहरामध्ये मोठ्या प्रमाणात खड्ड्यांचे साम्राज्य पसरले असून रस्त्याच्या कामात भ्रष्टाचार होत असल्याने रस्ते टिकत नाहीत त्यामुळे दर्जेदार रस्ते होण्याची आवश्यकता नागरिकांकडून व्यक्त होत आहे. तर सत्ता बदलानंतर रस्त्यांची कामे दर्जेदार राहणार की पूर्व परिस्थिती राहणार याची नागरिकांमध्ये चर्चा आहे. रस्ता कसाही करून सुद्धा ठेकेदाराची बिले निघत असल्याने नगरपालिका प्रशासनाच्या भ्रष्ट कारभारावर प्रश्नचिन्ह निर्माण होत आहे.

फलटण शहराची रस्त्यांच्या बाबतीत कोणीच लक्ष देत नसल्याने मोठी दयनीय अवस्था झालेली आहे. फलटण शहरातील अनेक मुख्य रस्ते उखडले गेलेले आहेत. अनेक रस्त्यांवर खड्डे पडलेले आहेत चांगला रस्ता म्हणता येईल असा एक सुद्धा रस्ता दाखवता येत नाही. इतकी भयानक अवस्था रस्त्यांच्या बाबतीत फलटण शहरांमध्ये झालेली आहे. बाहेरील गावातील लोक रस्त्यांच्या बाबतीत नापसंती व्यक्त करत आहे. नगरपालिकेचे प्रशासन काहीच लक्ष देत नाही नेते मंडळीनी सांगितले की तेवढ्यापुरती मलम पट्टी केली जाते. फलटणचा रथोत्सव काळात सुद्धा फलटण शहरातील अनेक रस्ते खड्ड्याने भरलेले होते काही रस्त्यांवर बिले काढण्यासाठी मुरूम टाकला गेला मात्र हा मुरूम कसाबसा टाकला गेला त्यामुळे टाकलेला मुरूम लगेच उखडला गेला होता याबाबत नागरिकांनी नापसंती व्यक्त करून सुद्धा संबंधित ठेकेदाराचे बिल काढले गेले. नगरपालिकेचे प्रशासन आणि ठेकेदार यांच्यात आर्थिक समझोत्याचे राजकारण चालले आहे की काय अशी शंका यानिमित्ताने उपस्थित होत आहे.
अनेक रस्त्यांची कामे केली जातात मात्र त्या कामांचा दर्जा न पाहता बिले अदा केली जात आहेत.

फलटण शहरात मध्ये रस्त्यांसाठी मोठ्या प्रमाणात निधी राजेगट व खासदार गटाने आणलेला आहे. मात्र मोठ्या प्रमाणात निधी आणून सुद्धा रस्त्यांची कामे दर्जेदार होत नाही एखादा रस्ता केला तर दोन ते तीन महिन्यात त्या रस्त्याला खड्डे पडायला सुरुवात होते रस्ता करताना रस्त्याचा चढ उतार ,त्यावर पावसाळ्यात पाणी साचेल का नाही याचा कसलाच विचार केला जात नाही. एखाद्याला काम मिळाले की तो कसाबसा रस्ता तयार करतो आणि त्याकडे पुन्हा कोणी बघत नाही. कमिशन आणि टक्केवारी देऊन ठेकेदार बिले काढून मोकळा होतो. त्यामुळे नवीन तयार केलेले रस्ते दोन ते तीन महिन्यात उखडले जात आहे. रस्त्यांच्या कामांमध्ये कोट्यावधी रुपयांचा भ्रष्टाचार होत असताना याकडे सत्ताधारी असो किंवा विरोधी असो कोणत्याच नेते मंडळींनी लक्ष दिलेले नाही. खरे तर फलटण शहरातील सर्व रस्त्यांच्या कामाबाबत चौकशी समिती नेमणे गरजेचे आहे. मात्र यावर कोणीच काही बोलत नाही.
दोन महिन्यापूर्वी झालेल्या विधानसभा निवडणुकीत सत्ताबदलानंतर लोकांच्या दर्जेदार कामांच्याबद्दल अपेक्षा वाढलेल्या आहेत. त्या पुऱ्या होणार की जशी पूर्वी परिस्थिती होती तशीच राहणार याची नागरिकांमध्ये चर्चा होत आहे.
Back to top button
