फलटण : फलटण सारख्या निमशहरी गावात गेल्या ७ वर्षापासून डॉ. प्रसाद जोशी, डॉ. सौ. प्राची जोशी आणि त्यांचे सहकारी मॅरेथॉन स्पर्धेचे आयोजन करुन तरुणांना शारीरिक व्यायामाचा संदेश देण्याचा प्रयत्न करत असल्याबद्दल समाधान व्यक्त करतांना त्यांच्या या सामाजिक कार्याला आपला सलाम असे प्रतिपादन प्रसिद्ध अभिनेते महेश मांजरेकर यांनी केले.

जोशी हॉस्पिटल प्रा. लि., आणि फलटण रोबोटीक सेंटर आयोजित आपली फलटण मॅरेथॉन २०२४ – २५ या स्पर्धेचा शुभारंभ ग्रामविकास मंत्री ना. जयकुमार गोरे, माजी खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर, आ. सचिन पाटील, भाजप तालुकाध्यक्ष अमोल सस्ते, तहसीलदार डॉ. अभिजीत जाधव यांनी फ्लॅग ऑफ करुन सकाळी केला,तर स्पर्धेच्या बक्षीस वितरण समारंभ आ. श्रीमंत रामराजे नाईक निंबाळकर यांच्या अध्यक्षतेखालील समारंभात प्रख्यात अभिनेते महेश मांजरेकर, माजी आमदार दिपकराव चव्हाण, श्रीमंत सुभद्राराजे नाईक निंबाळकर, मिलिंद नेवसे, आंतरराष्ट्रीय मॅरेथॉन स्पर्धक सादिया सय्यद, प्रा.शामराव जोशी, डॉ. प्रसाद जोशी, डॉ. सौ. प्राची जोशीयांच्या प्रमुख उपस्थितीत संपन्न झाला, त्याप्रसंगी मांजरेकर बोलत होते.

*शारीरिक तंदुरुस्तीसाठी योग्य आहार आणि व्यायाम ही काळाची गरज*
शारीरिक तंदुरुस्तीसाठी योग्य आहार आणि व्यायाम ही काळाची गरज बनल्याचे स्पष्ट करताना या मॅरेथॉन स्पर्धेमध्ये भाग घेतलेले सर्वच स्पर्धक हे विजेते असल्याचे नमूद करीत आपण स्वतः पुढील वर्षी फलटण मॅरेथॉन स्पर्धेत सहभागी होणार असल्याचे महेश मांजरेकर यांनी सांगितले.
*येथील स्पर्धक राज्य व राष्ट्रीय मॅरेथॉन मध्ये पाठवा*
डॉ. प्रसाद जोशी यांनी सांधेरोपण केलेले ज्येष्ठ स्त्री – पुरुष या स्पर्धेत सहभागी झाले हे कौतुकास्पद असल्याचे सांगत त्यांचेसह स्पर्धेत सहभागी सर्व स्पर्धकांचे महेश मांजरेकर यांनी अभिनंदन केले. फलटण मॅरेथॉन स्पर्धकांनी राज्य व देश पातळीवरील मॅरेथॉन स्पर्धेत सहभाग नोंदवावा असे आवाहन यावेळी महेश मांजरेकर यांनी केले.
*डॉ. जोशी यांची आरोग्य संवर्धनाची प्रेरणा कौतुकास्पद*
उत्तम आरोग्य, शरीर तंदुरुस्त असेल तर मानसिक दृष्ट्या मजबुत राहता आल्याने आपले जीवन सुखकर होते ही संकल्पना घेऊन डॉ. प्रसाद जोशी गेली ७ वर्षे आपली फलटण मॅरेथॉनचे आयोजन करतात आणि तरुणासोबत सर्व वयोगटातील स्त्री – पुरुष नागरिकांना आरोग्य संवर्धनाची प्रेरणा देतात हे कौतुकास्पद असल्याचे आवर्जून सांगत ग्रामीण विकास मंत्री ना. जयकुमार गोरे यांनी सर्वांना धन्यवाद दिले.
*व्यायाम करा, लवकर झोपा, लवकर उठा*, *आवश्यक तेवढेच खा*
सर्वजण चरितार्थासाठी आपला उद्योग, व्यवसाय करताना, धकाधकीचे जीवनात सतत संघर्ष करतो त्यामध्ये नियमीत व्यायामासाठी थोडा वेळ काढा, लवकर झोपा, लवकर उठा, आवश्यक तेवढेच खा हा मंत्र डॉ. जोशी या मॅरेथॉनचे माध्यमातून देतात त्याचे पालन करा असे आवाहन ना. गोरे यांनी केले.
*गड चढून उतरण्याच्या स्पर्धांचे आयोजन करा*
फलटण शहरानजिक असलेल्या संतोषगड, वारुगड, जरंडेश्वर व इतर गड चढून उतरण्याच्या स्पर्धेचे आयोजन करावे अशी अपेक्षा व्यक्त करताना तरुणांनी भरपूर व्यायाम करावा, निरोगी आरोग्य जगावे असे आवाहन आ. श्रीमंत रामराजे नाईक निंबाळकर यांनी अध्यक्षीय भाषणात केले.
*फलटण मॅरेथॉन आंतरराष्ट्रीय पातळीवर न्या*
डॉ. प्रसाद जोशी व त्यांच्या सहकाऱ्यांनी गेली ७ वर्षे सातत्य राखून प्रत्येक वर्षी या स्पर्धेला अधिक चांगले स्वरुप देण्याचा केलेला प्रयत्न आणि त्यांना मिळणारा प्रतिसाद निश्चित कौतुकास्पद असल्याचे सांगताना सातारा मॅरेथॉन ही जिल्ह्यात प्रसिद्ध आहे. त्या पार्श्वभूमीवर फलटण मॅरेथॉन स्पर्धेत राज्य, देश व आंतरराष्ट्रीय पातळीवरील स्पर्धकांचा सहभाग नोंदवून डॉ. प्रसाद जोशी यांनी फलटण मॅरेथॉन आंतरराष्ट्रीय पातळीवर घेऊन जाण्याकरता प्रयत्न करावेत यातच आपल्याला खरा आनंद असल्याचे आ. श्रीमंत रामराजे नाईक निंबाळकर यांनी आवर्जून सांगितले.
*प्रत्येक वर्षी स्पर्धकांची संख्या वाढते आहे*
प्रारंभी डॉ. प्रसाद जोशी यांनी सर्व उपस्थितांचे स्वागत केल्यानंतर प्रास्ताविकात गेल्या ७ वर्षात आपली फलटण मॅरेथॉन मध्ये विविध वयोगटातील स्पर्धक, विशेषतः आपण ज्यांचे सांधे रोपण केले ते वयोवृध्द स्त्री – पुरुष स्पर्धक आत्मविश्वासाने या स्पर्धेत सहभागी होतात, नव्याने रोबोटीक यंत्रणेद्वारे सांधे रोपण केलेले स्पर्धक ही यामध्ये उत्स्फूर्तपणे सहभागी झाले हे प्रेरणादायी असून त्यामुळेच प्रतिवर्षी स्पर्धकांची संख्या वाढत असल्याचे डॉ. प्रसाद जोशी यांनी निदर्शनास आणून दिले.
*मान्यवरांचे आदर्श व विचार तरुणांसमोर ठेवण्याचा प्रयत्न*
स्पर्धेचे उद्घाटन व बक्षीस वितरण समारंभाच्या निमित्ताने विविध क्षेत्रातील नामवंतांना पाचारण करुन त्यांचे विचार, त्यांचे आदर्श समाजासमोर विशेषतः तरुण पिढी समोर ठेवण्याचा प्रयत्न आपण या निमित्ताने करीत असल्याचे डॉ. प्रसाद जोशी यांनी यावेळी निदर्शनास आणून दिले.
आपली फलटण मॅरॅथॉन स्पर्धेमध्ये फलटण,
सातारा, कराड, वाई, कोल्हापूर, अहमदनगर, अमरावती, अकोला, नागपूर, पुणे आणि मुंबई येथून विविध वयोगटातील सुमारे १३०० हून अधिक स्पर्धकांनी सहभाग घेतल्याचे डॉ. प्रसाद जोशी यांनी निदर्शनास आणून दिले.
डॉ. सौ. प्राची जोशी यांनी समारोप आभार प्रदर्शन, नवनाथ कोलवडकर यांनी सूत्रसंचालन केले.
गटनिहाय प्रथम ३ क्रमांकांचे विजेते स्पर्धक खालील प्रमाणे….
१ ) ५ कि. मी. १८ ते ३० वयोगट पुरुष –
अतुल बर्डे, कृष्णात अलगुडे, नवनाथ दडस.
२) ५ कि. मी. १८ ते ३० वयोगट महिला – रुतुजा जगताप, प्रतिक्षा शिंदे, पल्लवी लबडे.
३) ५ कि.मी. ३१ ते ४५ वयोगट पुरुष – चिंतामण गायकवाड, प्रशांत अल्डर, श्रीकांत इंगळे.
४) ५ कि.मी. ३१ ते ४५ वयोगट महिला – सुरेखा कांबळे, कृष्णात अलगुडे, मनीषा तावरे.
५) ५ कि. मी. ४६ ते ६४ वयोगट पुरुष – अरविंद नलवडे, रमेश लोखंडे, माणिक जाधव.
६) ५ कि. मी. ४६ ते ६४ महिला – सुनिता अरगडे, पद्मा म्हेत्रे, सुनंदा बागल.
७) १० कि. मी. १८ ते ३० वयोगट पुरुष – निशांत सावंत, मनोज मोरे, सोहम लावंड.
८) १० कि. मी. १८ ते ३० वयोगट महिला – निकिता मोरे, स्वराज माने.
९) १० कि. मी. ३१ ते ४५ वयोगट पुरुष – योगेश जाधव, चिंतामणी देशमुख, पंकज जाधव.
१०) १० कि. मी. ३१ ते ४५ वयोगट महिला – स्मिता शिंदे, नेहा गलांडे, धनश्री तोडकर.
११) १० कि. मी. ४६ ते ६४ वयोगट पुरुष – रमेश चिविलकर, विठ्ठल अरगडे, माणिक कांबळे.
१२) १० कि. मी. ४६ ते ६४ वयोगट महिला – नेहा पंडीत, अनिता माने, संगीता सातव.
१३) १५ कि. मी. १८ ते ३० वयोगट पुरुष – विकास पोळ, गौरव पवार, वैभव गायकवाड.
१४) १५ कि. मी. १८ ते ३० वयोगट महिला – आकांक्षा सोनिया, बुशारा काजी.
१५) १५ कि. मी. ३१ ते ४५ वयोगट पुरुष –
विशाल कांबीरे, धोंडिबा गिरडवाड, किशोर शिंदे.
१६) १५ कि. मी. ३१ ते ४५ वयोगट महिला – अलमस मुलाणी, डॉ. सोनिया शहा, स्वागता शिंदे.
१७) १५ कि. मी. ४६ ते ६४ वयोगट पुरुष – रविंद्र जगदाळे, अतुल गायकवाड, मिस्टर मिजार.
१८) १५ कि. मी. ४६ ते ६४ वयोगट महिला – संगीता उबाळे, मंजुषा शिंगाडे, निलिमा झारगड.
१९) ३ कि. मी. ६४ च्या पुढील वयोगट महिला – कल्पना जाधव, सुमन जाधव, श्रध्दा जाधव.
प्रत्येक गटातील पहिल्या ३ विजेत्या स्पर्धकांना अनुक्रमे १० हजार, ७ हजार, ५ हजार रोख आणि स्मृतिचिन्ह देऊन मान्यवरांच्या हस्ते सन्मानित करण्यात आले.
Back to top button
