फलटण- फलटणकरांची शान असलेल्या रिंग रोडवरील अनेक व्यवसायिकांच्या व्यवसायाला उतरती कळा लागली असून अवास्तव जागे भाडे,पार्किंगची समस्या, फ्लॅटचे अनावश्यक वाढवलेले दर ,अनेकांच्या जागा संदर्भात असलेल्या तक्रारी यामुळे अनेक जण या रिंगरोडवरील जागांमधून काढता पाय घेत आहेत. रिंग रोड व्यावसायिकांसाठी अभिशाप?तर ठरत नाही ना अशा वावड्या उठत आहेत.
फलटण शहराला सुंदर असा रिंग रोड आहे. या रिंग रोडवर गेल्या चार ते पाच वर्षापासून चांगली डेव्हलपमेंट झाली आहे अनेक बिल्डरांनी पार्किंगची सुसज्ज सोय न करता बिल्डिंग उभारल्या आहेत . त्याच सोबत व्यापारी गाळे सुध्दा उभे केले आहेत. मात्र पार्किंगसाठी काहींनी योग्य व्यवस्था न केल्याने अनेक गाळ्यांच्या पुढे रस्त्यावर वाहने उभी राहतात त्यामुळे सतत या रस्त्यावर ट्रॅफिक जाम होत आहे.
या रिंग रोडवर चार पाच वर्षापूर्वी अनेक जण व्यवसायात उतरू लागल्याने गाळे भाड्याने देण्यासाठी अनेकांमध्ये स्पर्धा सुरु झाली ज्या गाळ्यांचे भाडे दहा ते पंधरा हजारच्या आसपास पाहिजे ते गाळे वीस हजार ,पंचवीस हजार,तीस हजार रुपये भाड्याने दिले जाऊ लागले. काहीनी महागडे गाळे घेतले मात्र या गाळ्यामध्ये चार-पाच महिन्यानंतर धंदा हळूहळू कमी होत गेला. गाळे भाडे सुद्धा निघू शकले नाही. त्यामुळे अनेकांनी गाशा गुंडाळून इतरत्र आपला व्यवसाय सुरू केला. अनेकांचे गाळे बंद अवस्थेत आहे.
फलटणचा रिंग रोड क्रांतीसुर्य नाना पाटील चौकापासून सुरू होऊन तो गिरवी नाक्यापर्यंत समाप्त होतो या रिंग रोडवर वाहतुकीचे प्रमाण सर्वात जास्त आहे मात्र अनेक गाळेधारकांनी पार्किंगची व्यवस्था न केल्याने गाळेधारकांना अनेक समस्यांना सामोरे जावे लागत आहे. या रस्त्यावर सराफी व्यवसाय, चहा, हॉटेल मोबाईल,हॉस्पिटल,जिम,इतर दुकाने असे व्यवसाय आहेत मात्र अनेक हॉटेल व मोबाईल दुकाने बंद पडले आहेत तर काहींचे चांगले चालले आहे.आज जर रस्त्यावरील व्यवसायांचा आढावा घेतला तर अनेक हॉस्पिटल सुध्धा व्यवस्थित चालेनाशी झाली आहेत. फक्त सराफ व्यावसायिक , शोरूम आणि जिम चांगल्या पद्धतीने चालू आहे. काही किराणा दुकानदारांची व्यवसाय चांगले चालले आहे.
रिंगरोडवर काही बिल्डरांनी अवास्तव जागांचे दर वाढविलेले आहेत. पार्किंग सुद्धा व्यवस्थित नाही .त्यामुळे अनेकांचे फ्लॅट आणि गाळे तसेच पडून आहेत. या फ्लॅटला भाडे मिळत नसल्याने अनेक जण भाव कमी करण्याच्या विचारात आहे. बिल्डिंगमध्ये पार्किंग साठी व्यवस्थित जागा उपलब्ध नसल्याने किंवा काही बिल्डरानी बिल्डिंगच्या खाली बोगद्या प्रमाणे पार्किंगची सोय केल्याने या भागात राहण्यासाठी किंवा व्यवसाय करण्यासाठी येण्यास अनेकजण धजावत आहेत. ज्यांचे नवीन कन्स्ट्रक्शन सुरू आहे त्यातील काहींना खरेदी साठी काहीच प्रतिसाद मिळत नाही.
रिंग रोडवरील अनेक बिल्डरांच्या गाळ्यापुढे गाड्या पार्किंग करण्यासाठी सुद्धा जागा नसल्याने त्यांच्यावर नगरपालिका काहीच कारवाई करताना दिसत नाही भविष्यात जर कोणी तक्रारी केल्या तर ज्याने गाळा विकत घेतला आहे त्याला आर्थिक फटका बसण्याची शक्यता आहे.त्यामुळे नगरपालिकेने सुद्धा या परिसरात दिलेल्या बांधकाम परमिशन तपासून पाहणे गरजेचे आहे.ज्यांनी पार्किंगसाठी जागा सोडलेली नाही त्यांच्यावर कारवाई करणे गरजेचे आहे. रिंग रोडवरील अनेक बिल्डिंगच्या विरोधात विविध तक्रारी दाखल आहेत.
या रिंग रोडवर सध्या तरी ठराविक व्यावसायिकांचे व्यवसाय चालत आहेत तर अनेकांना आर्थिक फटका बसल्याने रिंग रोडवर सध्या नवीन व्यावसायिक व्यवसाय करण्यासाठी येण्यास भित आहेत.
त्यामुळे रिंग रोड हा शाप आहे की वरदान आहे अशा भावना अनेकांच्या मनामधून व्यक्त होत आहे.