फलटण – सातारा जिल्ह्यातील इतर कारखान्यांनी 3000 च्या वर दर जाहीर केला असताना फलटण तालुक्यातील चारही साखर कारखान्यांनी 2800 रुपयांच्या आसपास दर जाहीर करून त्यांच्यातील एकीचा संदेश दिल्याने ऊस उत्पादक संतप्त झालेले आहे दराबाबतीत इतर कारखान्यांच्या तुलनेत फलटण तालुका मागे राहत असल्याने नाराजीचा सुरू आहे.
फलटण तालुक्यामध्ये श्रीराम सहकारी साखर कारखाना ,लोकनेते हिंदुराव नाईक निंबाळकर स्वराज साखर कारखाना, शरयू साखर कारखाना आणि श्रीदत्त इंडिया प्रायव्हेट लिमिटेड हे चार कारखाने असून यातला श्रीराम वगळता इतर सर्व खाजगी कारखाने आहेत.
या कारखान्यांमध्ये खरे तर दराबाबत संघर्ष होणे गरजेचे होते मात्र या चारही साखर कारखान्यांनी 2800 रुपयांच्या आसपास दर जाहीर करून ऊस उत्पादकांची कोंडी केली आहे. सातारा जिल्ह्यातील इतर कारखान्यांनी 3000 च्या वर दर जाहीर केला आहे तसेच फलटण तालुक्यात शेजारी इतर कारखान्यांनी सुद्धा 3000 च्या वर दर जाहीर केला असताना फलटणमध्ये दर कमी दिला जात असल्याने ऊस उत्पादकामध्ये नाराजी व संतप्त भावना पसरत चालली आहे.
साखरेसह इतर उप उत्पादनांची निर्मिती साखर कारखान्यांकडून केली जात आहे. मात्र शेतकर्यांना त्या प्रमाणात भाव दिला जात नाही. यंदाच्या गाळप हंगामात या कारखान्यांनी 2800 रुपये च्या आसपास प्रती टनाला भाव देण्याचे जाहीर केले आहे. यंदाच्या हंगामात 3200 च्या आसपास दर जाहीर होईल अशी अपेक्षा ऊस उत्पादक शेतकऱ्यांना होती मात्र ती सध्या तरी फोल ठरताना दिसत आहे. ऊस उत्पादक शेतकऱ्यांनी आता एकी दाखविल्यास त्यांना दर वाढवून मिळू शकतो नाहीतर आहे त्याच दरावर त्यांची बोळवण होण्याची शक्यता आहे.